गाव विकास म्हटला की, अनेक लहानसहान बाबींचा विचार होणे महत्वाचे असते. त्याची प्रेरणा कुठल्याही प्रसंगातून घेता येते.अगदी स्मशानभूमीतूनही. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही गाव. सर्वत्र भातशेतींनी समृद्ध असा हा परिसर आहे. उन्हाळ्याचे दिवस होते.अपघातात जवळचा मित्र दगावला होता. हा मित्र सामाजिक कार्यात सतत सहभागी होत असल्याने, त्याच्या अंत्ययात्रेला बरेच लोक जमले होते. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू झाले होते. स्मशानभूमीची जागा ही नेहमी लहानशी आणि भकास असते. गावातील काही श्रीमंतांनी बांधलेल्या पाच सहा समाध्या गवतांनी,रानटी झुडुपांनी वेढलेल्या होत्या. तिथं आजूबाजूला सावली देणारं एकही झाड नाही. अंत्यविधीला जमलेले लोक सावलीचा आसरा शोधत दूरदूर उभे राहिले. दहन झालं,लोक घरी गेले. मात्र मन अस्वस्थ झालं. जिथे आपल्या प्रिय व्यक्तीला आपण अखेरचा निरोप देतो ती जागा एवढी भीतीदायक, अस्वच्छ का असावी?
स्मशानभूमीत वृक्षारोपणाची कल्पना
त्या कमी जागेत देखील, ती जागा आपली नसतांना पैसा आहे म्हणून काही जण नातलगांच्या समाध्या बांधणार? समाध्यांची संख्या अशीच वाढत गेली तर इतरांनी अंत्यसंस्कार करायचे कुठे? जवळच अड्याळ टेकडीवर तुकारामदादा गिताचार्य राहायचे. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सहकारी होते. त्यांच्याशी चर्चा केल्यावर स्मशानभूमी ते पेट्रोल पंप असा वृक्ष लागवडीचा एक कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरलं. आणि त्यात तुकाराम दादांनी योग्य ते मार्गदर्शन करावे असा कार्यक्रम मग निश्चित केला. कार्यक्रमाची तारीख ठरली. इकडे आम्ही तयारीला लागलो. “सिंदेवाही जेसीस” चे सहकार्य घेतले.
नातेवाईकांची मनधरणी आणि सहकार्य
स्मशानभूमीत ज्यांच्या समाध्या होत्या त्या कुटुंबातील व्यक्तींच्या अगोदर भेटी घेतल्या. त्यांना विश्वासात घेऊन सांगितले की, तुमच्या आप्तांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रामगीताचार्य तुकाराम दादांच्या हस्ते आपण स्मशानभूमीत एक झाड लावू या. हे कुटुंबीय याकरता तयार झाले. रोपाचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडेच लोखंडी ट्री गार्ड तयार करून मागितले. त्यावर त्या मृत व्यक्तीचे नाव,जन्मतिथी, मृत्यू तिथी टाकून घेतली. एक सुंदर फलक तयार करून घेतला. त्यावर ग्रामगीतेतील “जिवंत मानवा नाही घर! कष्टाळूला नाही वावर! तिथे समाधीचे अवडंबर ! मृतांसाठी कासयाशी!!” या ओवी लिहिल्या.
सरकारी जागेत प्रत्येकाच्या समाध्या बांधल्यास जागेचा अपुरी
पहिल्याच वृक्षरोपण कार्यक्रमाला तहसीलदार, गटविकास अधिकारी, इतर मान्यवर व होमगार्ड पथक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सरकारी जागेत अशा समाध्या नकोत. प्रत्येकाने आपापल्या नातलगांच्या स्मृतिप्रित्यर्थ अशा समाध्या बांधायचे ठरविले तर गावात राहायला आणि शेतीला जागा अपुरी पडेल. यावर सर्वांचे एकमत झाले. समाध्या दूर करून त्या जागी त्या मृत व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ तुकाराम दादांच्या हस्ते एक झाड लावण्यात आले.
स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवण्यास गाव एकवटला
अनेक कुटुंबातील व्यक्तीच्या स्मृति प्रित्यर्थ वृक्ष लागवड करून स्मशानभूमीचे स्मृती उद्यान करायचे ठरविले. मात्र त्यावेळी जागा फारच लहान होती. मग गावातीलच एका व्यक्तीनं ही जागा लहान नसून दोन एकर आहे. यावर काहींनी अतिक्रमण केलं असल्याचं लक्षात आणून दिलं. ते हटविण्यात यावं म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या व्यक्तीनेच पुढाकार घेतला. अनेकांनी त्याला समर्थन दिले. लोकसहभाग असा वाढत होता.
स्मृतीउद्यानाची प्रेरणा गावागावात
कालांतरानं नव्या दमाचे तरुण नगराध्यक्ष सिंदेवाहीला मिळाले.आणि काही अंतरावर दुसऱ्या स्मृतिउद्यानाची नव्याने निर्मिती झाली. आज असंख्य गावात सरपंच आणि गावकरी मंडळींच्या कृतीपूर्ण सहकार्यातून तो गावागावात ‘स्मृतिउद्यान’च्या रूपाने आकार घेतो आहे. आणि हे लोण हळूहळू इतर जिल्ह्यांमध्येही पसरू लागलं. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) तालुक्यातील तीवरा गावीही आपल्या प्रिय व्यक्तीला ज्या जागेवर अखेरचा निरोप देतो ती जागा रमनीय,भीतीमुक्त, सुंदर असायला हवी हा विचार गावकऱ्यांमध्ये रुजवला. वृक्षारोपण करून तो परिसर हिरवागार करावा असा सर्वांनी मिळून निर्णय घेतला.
नव्या रोपांचं संरक्षण करण्याची जबाबदारी
केवळ झाडे लावून होणार नाही ती वाचविणे देखील महत्वाचे असते. गुरांपासून संरक्षण होण्यासाठी त्याला कठडे लावणे गरजेचे होते. त्यासाठी काही पैसा लागणार होता. तो कुठून आणायचा? विचारांती मार्ग निघाला. “स्मृती वृक्ष” लावायचे आणि वृक्ष संरक्षणासाठी लागणारा खर्च त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी करावा. या कल्पनेला गावात उत्तम प्रतिसाद मिळाला. त्या जागेवर गावातील अनेक कुटुंबातील मृतांच्या आठवणींना उजाळा देणारी झाडे त्याचं कुटुंबातील व्यक्तीच्या हस्ते लावण्यात आली. त्या प्रत्येक संरक्षक लोखंडी कठड्यावर त्या मृत व्यक्तीचे नाव,जन्मतिथी, मृत्यू तिथी नमूद केल्याने त्या कुटुंबाच्या भावना त्या झाडाशी एकवटल्या. हळूच त्या परिसराचे “स्मृतीउद्यान” असे नामकरण केले. गावकऱ्यांनी त्याला साथ दिली. ग्रामपंचायतने तसा ठराव पारित केला. त्या ठिकाणी निवांत बसता यावे यासाठी लोकसहभागातून बेंच बसविण्यात आले. तुळस,बोगणवेली, मोगरा,चाफा या झाडांनी सौंदर्यात आणि पावित्र्यात भर घातली.
स्मशानभूमीत भाजीपाला लागवड
पाणी, रस्ता, आवश्यक शेड यासाठी शासकीय योजनांची मदत घेण्यात आली. बघता बघता ती भयान जागा आता उद्यानात परावर्तित झाली. हाच कित्ता तिथून जवळ असलेल्या वाढोना गायकवाड या गावाने गिरवला. तिथल्या चार एकर स्मशानभूमीच्या परिसरात असंख्य झाडे आज डौलाने उभी आहेत. त्या गावी तरुणांसोबत 94 वर्षीय रूपराव बुटके, त्र्यंबकराव गायकवाड स्मृती उद्यानातील झाडांना पाणी द्यायचे आणि स्वच्छता सांभाळण्याचे काम न थकता करतात. इथली झाडे डेरेदार झाली आहेत. परिसर मोठा असल्याने या गावातील स्मशानभूमीत काही तरुणांनी भाजीपाला लागवड करण्याची कल्पना मांडली आणि लवकरच ती कृतीत आणली. पालक, मेथी, टोमॅटो, वांगी यांची रोपे तरारुन वर आली असताना, ‘तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? आम्ही स्मशानातील भाजीपाला खायचा का? असा दम देत गावातील एकाने त्यावर वखर फिरविला.तरुण नाराज झाले. गावात नवीन कल्पना, विचार रुजवायला जरा वेळ लागणारच. संयम, प्रबोधन, सातत्य हाच त्यावर मार्ग असतो.
हेही वाचा – ऋषी आणि कृषी सत्संग!
स्मृतीउद्यानांकरता एक लाखाचे पारितोषिक
काटोल तालुक्यातील खुरसापार, नरखेड तालुक्यातील एनीकोणी, वरुड तालुक्यातील जरूड,कामठी तालुक्यातील खसाळा,वर्धा जिल्ह्याती वायगाव निपाणी येथील सरपंचांची कल्पकता आणि लोकपरिश्रमातून साकारलेले स्मृतीउद्यान बघितले की ते एक पर्यटन स्थळ वाटावे इतके सुंदर रूप त्याला आले. तिथे महिला, मुले फिरायला जातात, डबे खातात, वृद्ध पेपर वाचतात, तरुण अभ्यास करतात. परभणी जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी असलेले श्री ओमप्रकाश यादव यांनी ही संकल्पना सर्वप्रथम रामपुरी बुद्रुक या आपल्या गावी प्रत्यक्षात साकारली व नंतर संपूर्ण जिल्ह्यात राबविली. देऊळगाव दुधाटे या गावी गोविंदराव दुधाटे यांनी त्याला अप्रतिम रूप दिले. त्या भागातील कांताराव देशमुख यांनी सुंदर स्मृति उद्यानासाठी स्पर्धा जाहीर करून एक लाखाचे बक्षीस ठेवले.सांगली जिल्ह्यात महादेव माळी नावाचे सद्गृहस्थ यासाठी परिश्रम घेत आहेत.संपूर्ण राज्यात ही संकल्पना गावकऱ्यांच्या भावनेला स्पर्श करीत हिरवं रूप धारण करतेय.
लोकसहभागातून “स्मृतिउद्यान” ही आज एकप्रकारे गाव परिवर्तनाची नांदी ठरत आहे. स्मशानातून उद्यान, उद्यानातून स्वच्छता, निसर्गप्रेम, मुलांसाठी मैदाने, वृद्धांसाठी निवांत जागा असे पायाभूत रूपांतर यातून शक्य आहे.
हेही वाचा – पाणी टंचाई ते पाणी पुरवठादार गावं