कृष्णाचे ऐतिहासिक पुरावे!

ज्या विविध देवतांचे कृष्णरूपात एकत्रीकरण झाले, त्यापैकी सर्वात प्राचीन पुरावा वासुदेव या देवतेचा आहे. हा पुरावा म्हणजे हेलिओडोरस स्तंभावरील शिलालेख.
[gspeech type=button]

हिंदू धर्मातील वैष्णव पंथातील एक प्रमुख देवता म्हणजे कृष्ण. विष्णूचा आठवा अवतार म्हणून त्याची पूजा केली जाते. त्याला संरक्षण, करुणा, कोमलता आणि प्रेम यांचे प्रतीक मानले जाते. कृष्णाच्या जीवनातील गोष्टी व कथांना कृष्णलीला असे म्हटले जाते. महाभारत, भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि भगवद्गीता  यांसारख्या ग्रंथांमध्ये कृष्णलीलांचे वर्णन आढळते. मात्र आजचा लेख विशेष करुन कृष्णाच्या ऐतिहासिक पुराव्यांबद्दल आहे.

 

वृष्णी आणि यदुवंशी कुळाच्या संगमातून कृष्णाची निर्मिती

अभ्यासकांच्या मते प्राचीन भारतातील अनेक स्वतंत्र देवतांच्या एकत्रीकरणाचे अंतिम रूप म्हणजे कृष्ण. याचा थोडक्यात सारांश असा की – वृष्णी कुळचा अधिपती किंवा वीरपुरुष वासुदेव होता. तसेच यदुवंशाचा अधिपती म्हणके कृष्ण होता. नंतरच्या काळात वृष्णी आणि यदुवंशी या दोन कुळांचा संगम झाला असावा. त्यावेळेस वासुदेव आणि कृष्ण या दोन देवतांचे मीलन होऊन एकच देवता निर्माण झाली. ती म्हणजे सध्याचा कृष्ण. यदुवंशातील देवतेचे नाव ह्या नवीन देवतेला प्राप्त झाले, आणि वृष्णींच्या देवतेचे नाव ‘वासुदेव’ त्याचे एक विशेषण म्हणून प्रसिध्द झाले. नंतरच्या काळात आभीर कुळातील गोपाल-कृष्ण  परंपरेचे कृष्ण परंपरेत विलिनीकरण झाले असे मानले जात. हे आभीर ‘गोपालक’ होते आणि त्यांचा अधिपती गोपाल-कृष्ण गायींचे रक्षण करणारी देवता म्हणून प्रसिध्द होता. पुढे महाभारत, भगवद्गीता  आणि हरिवंश या ग्रंथांमुळे कृष्णाचे वैष्णवीकरण झाले.

 

वासुदेवाचा उल्लेख असणारा सर्वात प्राचीन पुरावा, इ.स.पू. 125 ते 100 वर्षामधील हेलिओडस स्तंभ, विदिशा, मध्यप्रदेश

 

इंडो-ग्रीक राजदूताच्या हेलिओडोरस स्तंभावरील उल्लेख

ज्या विविध देवतांचे कृष्णरूपात एकत्रीकरण झाले त्यापैकी सर्वात प्राचीन पुरावा वासुदेव या देवतेचा आहे. हा पुरावा म्हणजे हेलिओडोरस स्तंभावरील शिलालेख. हेलिओडोरस स्तंभ एक दगडी स्तंभ असून त्यावर ब्राह्मी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. मध्यप्रदेशमधील बेसनगर, विदिशा इथं वसाहत काळात पुरातत्वशास्त्रज्ञांनी हा स्तंभ शोधून काढला. शिलालेखातील अंतर्गत पुराव्यांच्या आधारे त्याची तारीख इ.स.पू. 125 ते 100 वर्ष दरम्यानची मानली जाते. हा स्तंभ हेलिओडोरस या इंडो-ग्रीक राजदूताच्या नावाने ओळखला जातो. हेलिओडोरस हा ग्रीक राजा अँटिअल्सिडसचा दूत म्हणून भारतीय राजा काशिपुत्र भगभद्र याच्या दरबारात आला होता. हेलिओडोरस स्तंभावरील शिलालेख हे हेलिओडोरस राजदूताने वासुदेवाला केलेले वैयक्तिक धार्मिक समर्पण आहे.  शिलालेखातील नोंदीनुसार हा स्तंभ भगवतः हेलिओडोरसने  बांधला असून तो एक गरुडस्तंभ आहे. यातील भगवतः आणि गरुडस्तंभ ह्या दोनही संज्ञा विष्णू-कृष्णाशी संबंधित आहेत हे सर्वश्रुत आहे. महत्वाची बाब म्हणजे या शिलालेखात महाभारताच्या (11.7) अध्यायातील कृष्णाशी निगडित एक श्लोक दिलेला आहे. त्याचा सारांश असा की – अमरत्व आणि स्वर्गप्राप्तीचा मार्ग म्हणजे दम (स्वसंयम), त्याग (उदारता) आणि अप्रमत (सावधानता) या तीन सद्गुणांनी जीवन जगणे होय.

 

कृष्ण-वासुदेव यांच्या भक्तीचा भक्कम प्राचीन पुरावा हेलिओडोरस स्तंभ

1960 च्या दशकात पुरातत्त्वज्ञांनी हेलिओडोरस स्तंभाच्या स्थळाचे उत्खनन केले. या उत्खननातून विटांची पायाभरणी असलेले, गर्भगृह, मंडप आणि सात अतिरिक्त स्तंभ असलेले मोठे प्राचीन दीर्घवृत्ताकार मंदिरसंकुल असल्याचे उघड झाले. हेलिओडोरस स्तंभ शिलालेख आणि तेथील उत्खनित मंदिर हे दोन प्राचीन भारतातील कृष्ण-वासुदेव भक्ती आणि वैष्णव धर्माच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात प्राचीन पुराव्यांपैकी महत्वाचे पुरावे मानले जातात.

 

अफगाणिस्तानातील इ.स.पू. 180 वर्षांपूर्वीची संकर्षण-बळरामांची प्रतिमा असणारी नाणी

याच सुमारास छापलेली काही नाणीसुध्दा यासंदर्भातील महत्वाची पुरावा मानली जातात.  इ.स.पू. सुमारे 180 वर्षांपूर्वीच्या सुमारास, इंडो-ग्रीक राजा आगथोक्लीसने काही नाणी जारी केली. ही नाणी सध्याच्या अफगाणिस्तानातील ऐ-खानूम येथे सापडली होती. या नाण्यांवर कोरलेल्या देवतांच्या प्रतिमांचा संबंध भारतातील वैष्णव पंथातील प्रतिमाशास्त्राशी जोडला जातो.  या नाण्यांवर दिसणाऱ्या देवतांपैकी एक म्हणजे संकर्षण-बळराम. या प्रतिमेच्या हातात गदा आणि नांगर (हल) अशी आयुधे आहेत. दुसरी प्रतिमा वासुदेव-कृष्णाची म्हणून ओळखली जाते. ह्या वासुदेव-कृष्णाच्या प्रतिमेच्या हातात शंख आणि सुदर्शनचक्र आहे.

 

अफगाणिस्तानमध्ये सापडलेली संकर्षण-बळीरामांची प्रतिमा असलेली इ.स.पू. सुमारे 180 वर्षांदरम्यानची इंडो-ग्रीक राजा आगथोक्लीसची नाणी

 

इ.स. पूर्व 100 वर्षादरम्यानचे संस्कृतमधील शिलालेख सर्वात प्राचीन

याशिवाय इतर सापडणा-या पुराव्यांपैकी एक महत्वाचा पुरावा म्हणजे राजस्थान राज्यात सापडलेले हथीबडा-घोसुंडी शिलालेख. अभ्यासकांच्या मते हे शिलालेख इ.स.पू. 100 वर्षांदरम्यानचे आहेत. हे चार शिलालेख संस्कृतभाषेमधील सर्वात प्राचीन शिलालेखांपैकी मानले जातात. या शिलालेखांमध्ये संकर्षण आणि वासुदेव या देवतांचा  उल्लेख आहे. शिलालेखातील नोंदीनुसार ते स्थळ संकर्षण आणि वासुदेव यांच्या उपासनेसाठी नारायण या सर्वोच्च देवतेच्या संलग्नतेने बांधले गेले होते.

 

मथुरामधील पहिल्या शतकातील ब्राह्मी शिलालेख

कृष्णाशी संबंधित प्रसिध्द स्थळ म्हणजे उत्तरप्रदेशातील मथुरा आणि वृंदावन. येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननात सापडलेल्या मोरा शिलाफलकावर ब्राह्मी शिलालेख आहे. या शिलालेखाचे नाव मोरा हे तो सापडलेल्या मोरा गावावरून पडले आहे. हा शिलालेख  इ.स. पहिल्या शतकातील असून त्यात संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि सांब अशा पाच वृष्णी वीरांचा उल्लेख आहे. हा शिलाफलक सध्या मथुरा संग्रहालयात जतन केलेला आहे.

 

मथुरामधील मोरा गावात सापडलेला पहिल्या शतकातील ब्राह्मी भाषेतील शिलालेख

 

कृष्ण या नावाचा शिलालेखीय पहिला उल्लेख

आगथोक्लीसची नाणी आणि हेलिओडोरस स्तंभ यांपासून वासुदेव देवतेचे शिलालेखीय पुरावे इ.स.पू. दोनशे वर्षांपासून मिळण्यास सुरुवात होते. मात्र, कृष्ण या नावाचा शिलालेखीय उल्लेख नंतरच्या काळात आढळतो. उत्तर-पश्चिम पाकिस्तानातील म्हणजेच अफगाणिस्तान सीमेजवळील, इ.स. पहिल्या शतकातील  चिलास नावाच्या  पुरातत्त्वीय स्थळावर झालेल्या उत्खननात दोन पुरुषांच्या कोरीव प्रतिमा मिळाल्या आहेत. यांपैकी आकाराने मोठ्या असलेल्या पुरुषाच्या हातात नांगर आणि गदा आहे. त्यासोबतच्या मिळालेल्या खरोष्ठी लिपीतील शिलालेखाचे वाचन शास्त्रज्ञांनी राम-कृष्ण असे केले आहे आणि त्यांचा अर्थ बळराम आणि कृष्ण या दोन भावंडांच्या प्राचीन प्रतिमा असा लावला आहे.

 

अफगाणिस्तानातील चिलास इथं सापडलेल्या इ.स.पू. 200 वर्षांपूर्वीच्या बलराम आणि कृष्णाच्या प्रतिमा

 

कृष्णाच्या जीवनाशी ओळख पटवणारी पहिली प्रतिमा

कृष्णाच्या जीवनाची ओळख पटवणारी पहिली प्रतिमा तुलनेने उशिराच्या काळात आढळते. मथुरेत सापडलेल्या इ.स. पहिल्या–दुसऱ्या शतकातील एका शिल्पखंडात  एका टोकाला सात फणांचा नाग नदी पार करीत आहे, मगर पाणी उडवीत आहे आणि दुसऱ्या टोकाला डोक्यावर टोपली उचललेला मनुष्य दिसतो. हा प्रसंग म्हणजेच वासुदेवाने, म्हणजेच कृष्णाच्या वडीलांनी बाळकृष्णाला टोपलीत बसवून यमुना नदी पार करून नेण्याचा प्रसंग आहे.

यानंतरच्या काळात मात्र वासुदेव कृष्णाचे पूर्णपणे वैष्णवीकरण झालेले आढळते. त्यानुसार भारतात विविध ठिकाणी शिलालेख आणि शिल्पे यास्वरुपातील विविध पुरावे आढळून येतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

विष्णूचा घोड्याचे मुख असलेला अवतार म्हणजेच हयग्रीव. त्याला ज्ञान आणि प्रज्ञेचा देव मानले जाते. भागवत पुराणाच्या दशम स्कंधातील चाळीसाव्या अध्यायात
श्रावण महिन्यात काही विशिष्ट वनौषधी आणि पवित्र वनस्पती आपल्याला नैसर्गिकरित्या रानात किंवा अंगणात आढळतात. या वनस्पतींना धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही
हिंदू धर्मामधील शीतला देवता भारतीय उपखंडात गेल्या शतकात विशेष प्रसिद्ध झाली आहे. तिच्या शीतला नावाची व्युत्पत्ती संस्कृतमधील शीतल या शब्दावरून

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ