मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि या फाल्गुनात साजरा केला जाणारा मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणजे होळी. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेस साजरी केली जाणारी होळी ‘हुताशनी पौर्णिमा’ या नावानेही प्रसिध्द आहे. कोकणात हा सण शिमगा म्हणून ओळखला जातो.
या लेखात आपण वाराणसीत साज-या केल्या जाणा-या होळीच्या प्रथेबद्दल जाणून घेवू.
प्रल्हाद होलिकेच्या तावडीतून वाचला तो दिवस
होळीशी संबधित असलेल्या प्रसिध्द आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपूला अमरत्वाचे वरदान मागून घेतले होते की, माणूस किंवा प्राणी, कोणतेही शस्त्र, घरात किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर, पाण्यात किंवा आकाशात, तसेच कोणत्याही देव, दानव किंवा स्वर्गीय अस्तित्वाने, जीवंत किंवा मृत गोष्ट – अशा कुठल्याही द्वारे त्याला मारता येणार नव्हते. परिणामी तो उन्मत्त झाला होता. त्याचा पुत्र प्रल्हाद विष्णुभक्त होता. तो भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे आणि विष्णुलाच सर्वश्रेष्ठ मानीत असे. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला स्वतःला श्रेष्ठ मानण्यास सांगितले मात्र प्रल्हादाने यास नकार दिला. यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधीत झाला. त्याने प्रल्हादाला अनेक प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली. त्यातील एक म्हणजे आपली बहीण होलिकेला प्रल्हादास मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस अग्नीपासून सुरक्षित रहाण्याचा वर प्राप्त होता. मात्र, विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला आणि त्या उलट होलिका आगीत जळून भस्मसात झाली. पुढे विष्णुने नरसिंहाचा अवतार घेवून हिरण्यकश्यपूचा वध केला. प्रल्हाद होलिकेच्या तावडीतून वाचला तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. म्हणून ह्या दिवशी होलिका दहन करण्याचा प्रघात पडला.
कोकणात शेणाच्या चाकोल्यांची पारंपरिक होळी

काही वर्षांपूर्वीपर्यंत घरोघरी शेणाच्या चाकोल्यांची होळी पेटायची. होळीच्या साधारण काही दिवस आधी चाकोल्यांसाठी शेण गोळा केले जायचे. या शेणाच्या गोलसर चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे. होळी येईपर्यंत या चाकोल्या खणखणीत वाळवल्या जायच्या. नारळाच्या दोरीत चाकोल्या ओवून त्याच्या माळा होळीत टाकल्या जायच्या. दुसऱ्या दिवशी या जळलेल्या पण धग कायम असलेल्या चाकोल्यांवर पाणी गरम करून आंघोळ केली जायची.
जुन्या मोडक्या वस्तूंपासून होलिकेची प्रौढवयीन मूर्ती
अशा प्रकारे साज-या केल्या जाणा-या होळीचे वेगळे रूप वाराणसीत पहायला मिळते. होळीच्या साधारण दोन ते तीन दिवस आधी वाराणसीतील चौका-चौकात, गल्यांमध्ये, घाटांवर होलिका उभारली जाते. जुन्या मोडक्या टाकावू आणि जळावू वस्तूंपासून होलिकेचा उंच सांगाडा तयार केला जातो. त्यावर मातीच्या कारागिरांकडून तयार करवून घेतलेल्या होलिकेची स्थापना केली जाते. होलिकेची मूर्ती साधरण प्रौढवयीन स्रीरूपात आणि बसलेल्या अवस्थेत घडविली जाते. तिच्या मांडीवर बाळ प्रल्हादाची मूर्ती असते. अशा प्रकारे होळी सणाशी निगडीत असलेल्या आख्यायिकेचा पूजाविधीत अचूक समावेश झालेला आढळतो. नंतर त्या भागाच्या आजूबाजूस रहाणारे लोक आपल्या घरातील मोडक्या आणि टाकावू वस्तू, केर, वगैरे गोष्टी होलिकेजवळ आणून टाकतात. शेवटी होळीच्या दिवशी ह्या सर्वाचे दहन केले जाते.
अव्यवस्था दूर करणे
अपप्रवृत्ती किंवा जुनाट विचार नष्ट करून त्यावर विजय मिळवणे हा ह्या सणामागचा उद्देश आहे. त्यामूळे मनातील वाईट विचारांचे प्रकटीकरून त्याचा त्याग केला जातो. म्हणूनच होळीच्या वेळेस बोंबा मारण्याची पध्द्त काही ठिकाणी आहे. पण वाराणसीतील होळी पाहिल्यास होळीचे निमित्त साधून “अव्यवस्था दूर करणे,” “निरुपयोगी वस्तू हटवणे,” “स्वच्छ आणि मोकळे करणे” हे हेतून साधले जाते. ह्यालाच सध्या Decluttering म्हटले जाते.
होळीच्या आधी रंगभरी एकादशीला पार्वतीचा गौना
सध्या गेले काही वर्ष समाजमाध्यमांवर वाराणसीतील होळीचे विविध रिल्स फिरत आहे. ती रील्स वाराणसीतील रंगभरी एकादशी आणि मसान की होलीची आहेत. रंगभरी एकादशी मुख्य होळीच्या आधी येणा-या एकादशीला खेळली जाते. 2025 मध्ये रंगभरी एकादशी 10 मार्चला आहे. महाशिवरात्रीला वाराणसीत शिव-पार्वतीचा विवाह आणि वरात साजरी केली जाते. उत्तर भारतातील विवाहाच्या प्रथेनुसार वधू लग्नानंतर काही दिवस आपल्या वडिलांच्या घरी राहाते. त्यानंतर गौना नावाचा विधी करून वर आपल्या वधूला घरी घेवून जातो. रंगभरी एकादशीला पार्वतीचा गौना करून शिव तिला वाराणसीला घेवून आले. असे मानले जाते की त्यांच्या विवाहानंतर शिव-पार्वतींनी वाराणसीत रंगभरी एकादशी साजरी केली. म्हणून ह्या दिवशी वाराणसीतील मुख्य विश्वनाथ मंदिरात रंगोत्सव साजरा केला जातो.
मुख्य स्मशान घाटावर शिवगणांसाठी होळी

शिवाचे गण – भूत, प्रेत, पिशाच इत्यादी मात्र रंगभरी एकादशीत सहभागी होवू शकले नाहित. त्यामुळे शिवाने स्वतः मसान घाटावर जाऊन त्यांच्या या अदृश्य भक्तांसह होळी खेळली. हा दिवस म्हणजे रंगभरी एकादशीच्या लगेच नंतरचा दिवस. ह्या होळीला ‘मसान की होली’ असे म्हणतात. ह्या आख्यायिकेनुसार वाराणसीच्या मुख्य स्मशान घाटावर म्हणजेच मणिकर्णिका घाटावर भक्त चितेच्या राखेने होळी खेळतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकर स्वतः त्यांच्या भक्तांसह मणिकर्णिका घाटावर येऊन भस्माच्या होळीत सहभागी होतात. हल्ली ही होळी वाराणसीतील दुस-या स्मशान घाटावरही म्हणजेच हरिश्चंद्रघाटावरही खेळली जाते. या होळीत वाराणसीतील शिव भक्त, शैव साधू-संन्यासी, नागा साधू सहभागी होतात. या 2025 ला मसान की होली 11 मार्चला आहे.
मसाण की होलीवर आक्षेप!
मणिकर्णिका घाटावरील ‘मसान की होली’ साजरी करण्याच्या प्रथेवर सध्या फार मोठ्या प्रमाणावर मतभेद सुरु आहेत. काही लोकांच्या मते, ही परंपरा वाराणसीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा भाग आहे, तर इतरांच्या मते, ही अलीकडच्या काळातील व्यावसायिक योजना आहे. हिंदू धर्मानुसार, स्मशान ही केवळ तंत्र-साधना आणि अघोरी पंथाच्या लोकांसाठी असते. सामान्य गृहस्थांनी येथे कोणत्याही प्रकारचे उत्सव साजरे करू नयेत, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. शिवाय, स्मशानातील राख शरीराच्या शुद्धतेसाठी योग्य मानली जात नाही. त्यामुळे या प्रकारच्या उत्सवाला धार्मिक मान्यता असावी का, हा एक मोठा प्रश्न सध्या प्रचलित आहे.
तर अशी ही वाराणसीतील होळी.