बदलत्या हवामानामुळे आणि प्रदूषणामुळे केस गळती, विरळपणा आणि टक्कल पडणे यासारख्या समस्याचा सामना अनेकजण करीत आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून बाजारात विविध प्रकारची हेअर ग्रोथ सिरम्स उपलब्ध आहेत. प्रत्येक सिरम वेगवेगळ्या घटकांवर आधारित असते आणि त्याचा परिणामसुद्धा घटकांनुसार बदलतो. आधुनिक संशोधन आणि आयुर्वेदिक परंपरेच्या एकत्रित उपयोगामुळे आज हेअर केअर क्षेत्रात प्रभावी उपाय उपलब्ध झाले आहेत.
केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, नवीन केसांची वाढ वाढवण्यासाठी आणि स्काल्प आरोग्य सुधारण्यासाठी योग्य ग्रोथ सिरमची निवड करणे आवश्यक असते. या लेखामध्ये आपण हेअर ग्रोथ सिरम्सचे विविध प्रकार आणि त्यांचे घटक, उपयोग, वापरण्याची पद्धत आणि संभाव्य दुष्परिणाम याबद्दल माहिती घेऊया.
मीनॉक्सिडिलवर सिरम
सर्वात जास्त वापरला जाणारा ग्रोथ सिरम म्हणजे मीनॉक्सिडिलवर आधारित सिरम. मीनॉक्सिडिल हा FDA ने मान्य केलेला एक घटक आहे जो स्काल्पमधील रक्ताभिसरण वाढवतो आणि केसांच्या पेशींना वाढीसाठी उत्तेजित करतो. मीनॉक्सिडिल 2 टक्के, 5 टक्के आणि 10 टक्के या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतो. पुरुषांसाठी 5 टक्के किंवा 10 टक्के वापरला जातो, तर महिलांसाठी 2 टक्के किंवा 5 टक्के योग्य मानला जातो. हे दररोज स्काल्पवर कोरड्या अवस्थेत लावले जाते आणि किमान 3 ते 6 महिने सतत वापर केल्यावर परिणाम दिसू लागतात. काही वेळा सुरुवातीला केस गळती वाढल्यासारखी वाटू शकते, पण नंतर नवीन केसांची वाढ होते. त्याचे दुष्परिणाम म्हणून स्काल्पवर कोरडेपणा, खाज, किंवा लालसर त्वचा जाणवू शकते.
फिनास्टराइडवर सिरम
दुसरा प्रकार म्हणजे फिनास्टराइडवर आधारित ग्रोथ सिरम. फिनास्टराइड हे पुरुषांमध्ये टक्कल पडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या DHT नावाच्या हार्मोनचे उत्पादन कमी करते. ही गोळी स्वरूपातही दिली जाते, पण स्काल्पवर थेट लावण्यासाठीही आता फिनास्टराइड सिरम मिळते. याचा उपयोग करणं सुरक्षित असलं तरी, काही पुरुषांमध्ये लैंगिक समस्यांपासून ते मूड बदलांपर्यंत दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच याचा वापर करावा.
हे ही वाचा : सौंदर्यपूर्ण, आरोग्यदायी केस
कॅपेक्सिल आणि रेडेन्सिल सिरम
तिसऱ्या प्रकारात कॅपेक्सिल आणि रेडेन्सिल या आधुनिक घटकांचा समावेश होतो. हे दोन्ही घटक वनस्पतीजन्य असून स्काल्पमध्ये पेशींच्या पुनरुत्पादनाला चालना देतात. रेडेन्सिल स्काल्पमधील स्टेम सेल्सना सक्रिय करून केस वाढवतो. तर कॅपेक्सिल DHT चे प्रमाण नियंत्रित करून केस गळती थांबवतो. हे घटक सौम्य आणि साइड इफेक्ट्स कमी असलेले मानले जातात. तसंच महिला आणि पुरुष दोघांसाठीही उपयुक्त ठरतात.
केसाच्या पोषणासाठी अन्य सिरम्स
तसंच, प्रोकॅपिल, अनागेन, बायोटीन यांसारखे मिश्रित घटक वापरून तयार केलेले काही सिरम्स सुद्धा बाजारात मिळतात. यामध्ये विटॅमिन्स, पेप्टाइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांचा समावेश असतो. केसांची घनता, मजबुती, आणि चमक वाढवण्यासाठी या सिरम्सची मदत होते. हे प्रकार स्काल्पच्या पोषणासाठी आणि केसांच्या एकूण आरोग्यासाठी चांगले ठरतात.
सिरम्सचे अन्य परिणाम
हे सर्व ग्रोथ सिरम्स कोरड्या आणि स्वच्छ स्काल्पवर लावायचे असतात. एकदा लावल्यावर किमान 4 ते 6 तास तरी ते धुवायचे नसतात. काही लोकांना सुरुवातीला खाज, लालसर त्वचा किंवा स्किन सेंसिटिव्हिटी जाणवू शकते, म्हणून नवीन सिरम वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. खोटे किंवा अयोग्य, प्रमाणपत्र नसलेले प्रॉडक्ट टाळावेत.
योग्य ग्रोथ सिरमची निवड ही केसांच्या समस्येच्या प्रकारावर आणि स्काल्पच्या प्रकृतीवर अवलंबून असते. त्यामुळे कोणतेही सिरम वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं.
केसांची वाढ ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे संयम, नियमितता आणि योग्य आहार देखील गरजेचा आहे.
हे ही वाचा : केसासाठी योग्य शॅम्पू कसा निवडावा?
जाहीरातीतील उत्पादने धोकादायक असण्याची शक्यता
टीव्हीवरील किंवा सोशल मीडियावरील जाहिरातींमध्ये अनेकदा केसांच्या वाढीचे, गळती थांबवण्याचे, किंवा एका आठवड्यात मस्त काळे घनदाट, सिल्की केस मिळवण्याचे मोठमोठे दावे केले जातात. हे दावे आकर्षक संगीत, सुंदर मॉडेल्स ना घेऊन आणि क्लिनिकल क्लेम्सच्या नावाखाली केले जातात, पण प्रत्यक्षात हे प्रॉडक्ट्स सर्वसामान्य ग्राहकाला अपेक्षित परिणाम देत नाहीत. काही वेळा हे प्रॉडक्ट्स हानीकारकही ठरू शकतात.
उदाहरणार्थ, काही “हेअर स्मूथनिंग क्रीम्स” किंवा “केरेटीन इन्फ्यूस्ड शांम्पू आणि कंडिशनर सेट्स” हे सांगतात की तुमचे केस एका वॉशमध्ये स्ट्रेट, मऊ, आणि फ्रीझ-फ्री होतील. पण यामध्ये सिलिकॉन, सल्फेट आणि फार्मल्डिहाइडसारखे घटक असतात, जे केसांच्या पृष्ठभागावर फक्त एक कृत्रिम थर तयार करतात. काही वेळा हे केस चमकदार दिसतात, पण आतील रचना मात्र कोरडी, कमकुवत आणि तुटणारी होते.
तसंच, “वन वीक हेअर फॉल सॉल्यूशन” असं म्हणणारे तेल किंवा सिरम्स हे देखील भ्रामक असतात. केसांची वाढ आणि गळती थांबवण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन आहे. अशा दाव्यांमध्ये बहुतेक वेळा उत्पादक स्पष्ट घटक लिहीत नाहीत किंवा “हर्बल” आणि “आयुर्वेदिक” या नावाखाली रासायनिक मिश्रण असते.
एका प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीत असा दावा केला गेला होता की, त्यांचा कंडिशनर पहिल्यांदाच वापरल्याने 90 टक्के केस गळती कमी होईल. पण खरं म्हणजे ते केवळ ब्रश करताना कमी तुटणारे केस दाखवत होते – म्हणजे केस गळणे थांबले, असे नव्हे.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, जाहिरातीतला दावा आणि प्रॉडक्टचा खरा परिणाम यात फार मोठा फरक असतो. त्यामुळे कोणतंही प्रॉडक्ट वापरण्याआधी त्याची घटकसूची वाचणं, ग्राहकांचे खरे रिव्ह्यू पाहणं आणि शक्य असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. केसांसाठी आपले ध्येय केवळ ‘चकाकी’ न राहता ‘खरं पोषण आणि मजबुती’ असायला हवं.
पुढच्या भागात आपण आयुर्वेदिक तेल त्यांचा वापर दुष्परिणाम आणि केसांवर होणाऱ्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स याची माहिती घेणार आहोत.
3 Comments
Very useful information 🙏
Thank you 😊
Khup chan mahiti dilit mam ..thnx 🙏
खूपच उपयोगी माहिती दिली आहे. तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे मी भोपळ्याच्या बिया , जवस , मेथीदाणे खाते आहे. धन्यवाद.