खते: एक महत्त्वाची कृषी निविष्ठा 

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेत आतापर्यंत आपण कृषी निविष्ठा, त्यांच्यावर आधारित उद्योग, आणि बियाणे उद्योग यांची सविस्तर माहिती करून घेतली. यापुढील भागांमध्ये खत निर्मिती उद्योगाची माहिती मिळेल.
[gspeech type=button]

शेतीमध्ये खत हा एक आवश्यक घटक आहे. खत शेतजमिनीतील अन्नद्रव्यांची नैसर्गिक कमतरता तसेच पिकांनी मातीमधून त्यांच्या वाढीदरम्यान शोषून घेतलेल्या पोषक तत्वांचा ऱ्हास भरून काढते. भारतातील खत उद्योगाने अन्नधान्यामध्ये देशाला स्वयंपूर्णता प्राप्त करण्यात तसेच जलद आणि शाश्वत कृषी विकासात नेहेमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा खत उत्पादक आणि ग्राहक देशांपैकी एक आहे. खतांची मागणी शेतीच्या कामगिरीवर अवलंबून असते. शेतीमध्ये असणाऱ्या खरीप आणि रब्बी या दोन्ही पीक हंगामात खतांचा वापर जवळपास समान प्रमाणात केला जातो. भारतीय खत उद्योगाची वाढ मुख्यत्वे सरकारने अवलंबलेल्या धोरणांवर अवलंबून असते.

खत म्हणजे काय?

खत म्हणजे सेंद्रिय किंवा अजैविक, नैसर्गिक किंवा कृत्रिम अशी कोणतीही सामग्री, जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या एक किंवा अनेक रासायनिक घटकांचा पुरवठा करते. पिकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी 16 पोषक घटक किंवा अन्नद्रव्ये किंवा रासायनिक मूलद्रव्ये आवश्यक असतात. या घटकांच्या अनुपस्थितीत किंवा त्यांची कमतरता असल्यास वनस्पती त्यांची कायिक वाढ आणि पुनरुत्पादन जीवनचक्र सुदृढ प्रकारे पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे पिकांच्या वाढीवर, आणि पर्यायाने उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.

वनस्पतींना आवश्यक 16 पोषक घटक किंवा अन्नद्रव्ये कोणती?  

वनस्पतींना वाढीसाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते. 

  • मुख्य / प्राथमिक अन्नद्रव्ये (Primary Nutrients): नत्र / नायट्रोजन  (N), स्फुरद / फॉस्फरस (P), पालाश / पोटॅशियम (K)
  • दुय्यम अन्नद्रव्ये (Secondary Nutrients): कॅल्शियम (Ca), मॅग्नेशियम (Mg), गंधक / सल्फर (S)
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micronutrients): लोह (Fe), मॅंगनीज (Mn), तांबे (Cu), जस्त (Zn), बोरॉन (B), मोलिब्डेनम (Mo), क्लोरीन (Cl)
  • हवा किंवा पाण्यापासून मिळणारी अन्नद्रव्ये: हायड्रोजन (H), कार्बन (C) आणि ऑक्सिजन (O)
हे ही वाचा : कृषी निविष्ठांची वैशिष्ट्ये

शेतीमध्ये खतांची भूमिका

खते आपल्या वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न, वस्त्र, इंधन आणि पशूखाद्याची गरज भागवण्यासाठी पुरेसे शेती उत्पादन करण्यात मदत करतात. मातीमध्ये वनस्पतींच्या पोषक तत्वांची कमतरता वाढत आहे. अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्या पोषक तत्त्वांचे मातीमध्ये पुनर्भरण करण्यासाठी खताचा वापर अपरिहार्य आहे. खतांमध्ये वनस्पतींना वाढीसाठी आवश्यक असलेले विशिष्ट रासायनिक घटक आयनिक स्वरूपात (Ionic form) उपलब्ध असतात. वनस्पतींची मुळे असे घटक शोषण्यास सक्षम असतात आणि त्यामुळे खते चांगल्या अन्न उत्पादनास मदत करतात. खते वापरताना मातीच्या विश्लेषणावर आधारित संतुलित प्रमाणात वनस्पतींचे पोषक घटक वापरणे आवश्यक आहे. संतुलित खत वापरामुळे मातीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.

खतांचे मुख्य प्रकार:

जैविक खते: जैविक खते नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली असतात. यामध्ये दोन प्रकार आहेत. 

पहिल्या म्हणजे वनस्पतीजन्य प्रकारात कंपोस्ट खत, फार्म यार्ड खत (Farm Yard Manure – FYM शेतातील काडीकचऱ्यापासून तयार केलेले खत), हिरवळीची खते (गिरीपुष्प, धैंचा इत्यादी), गांडूळ खत, अझोला खत (Azolla), स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत (Phosphate Solubilizing Bacteria – PSB) इत्यादी खतांचा समावेश होतो. दुसऱ्या म्हणजे प्राणीजन्य प्रकारात फिश मिल (Fish Meal), बोन मिल (Bone Meal) इत्यादी म्हणजे प्राण्यांच्या अवशेषांपासून तयार केलेल्या खतांचा समावेश होतो.

रासायनिक खते: या प्रकारची खते काही नैसर्गिक रासायनिक घटकांवर कारखान्यात विशिष्ट प्रक्रिया करून कृत्रिमरित्या तयार केलेली असतात. यामध्ये पाच प्रकारची खते असतात.

सरळ खते (Straight fertilizers): या प्रकारच्या खतांमध्ये कुठलेतरी एक प्राथमिक अन्नद्रव्य (N, P, K) असते आणि ते एकाच रासायनिक घटकामधून मिळते. उदा. युरिया (N) मधून नत्र, अमोनियम सल्फेट मधून नत्र, सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) मधून स्फुरद, म्युरेट ऑफ पोटॅश (MoP) व सल्फेट ऑफ पोटॅश (SoP) मधून पालाश, रॉक फॉस्फेटमधून स्फुरद इत्यादी 

मिश्र खते (Mix Fertilizers): या प्रकारच्या खतांमध्ये वेगवेगळी प्राथमिक अन्नद्रव्ये (N, P, K) असतात आणि ती वेगवेगळ्या रासायनिक घटकांच्या साध्या मिश्रणातून मिळतात. उदा. 18-18-10, 5-10-5, 20-10-10 इत्यादी      

संयुक्त खते (Complex Fertilizers): या प्रकारच्या खतांमध्ये अनेक प्राथमिक अन्नद्रव्ये (N, P, K) असतात जी अनेक रासायनिक घटकांच्या संयुक्त उत्पादनातून मिळतात. उदा. डायअमोनियम फॉस्फेट Di-Ammonium-Phosphate (DAP), 10-26-26, 12-32-16, 15-15-15, 20-20-0 इत्यादी

सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते (Micronutrients): या प्रकारच्या खतांमध्ये एक किंवा अनेक सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेल्या रासायनिक घटकांचे मिश्रण असते. उदा. ZnSO4-EDTA, MgSO4-EDTA, Microla इत्यादी

100 टक्के विद्राव्य खते (100% water soluble): या प्रकारच्या खतांमध्ये मुख्य अन्नद्रव्ये किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये असून ती पाण्यात पूर्णपणे विरघळणाऱ्या स्वरूपात असतात. त्यामुळे ती वापरल्यावर त्वरित पिकांना पूर्णपणे उपलब्ध होतात. हे या प्रकारच्या खतांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उदा. 12-61-0, 0-52-34, 19-19-19, सुजला, 0-0-51 इत्यादी.     

पण 100 टक्के विद्राव्य खतांच्या व्यतिरिक्त वर उल्लेख केलेल्या इतर प्रकारच्या खतांमध्ये असलेली अन्नद्रव्ये मात्र काही प्रमाणात पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपात आणि काही प्रमाणात जमिनीतील सेंद्रिय आम्लांमध्ये विरघळणाऱ्या स्वरूपात असतात. त्यामुळे ती पिकांना हळूहळू उपलब्ध होत जातात, त्यामुळे पिकांच्या वाढीदरम्यान आवश्यकतेनुसार वापरावी लागतात. 

हे ही वाचा : उत्तम बी-बियाणे: शेतीची पहिली गरज

खतांच्या जागतिक नकाशावर भारत

भारत हा नत्रयुक्त खतांचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. तसेच भारत हा स्फुरद खतांचा जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक व पालाश खतांचा जगातील चौथा मोठा ग्राहक आहे. भारतात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या खतांची (Bulk fertilizers) एकूण वार्षिक उलाढाल 1.75 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यापैकी सर्वाधिक प्रमाण युरिया (57 टक्के), नत्र–स्फुरद आणि नत्र-स्फुरद-पालाश संयुक्त खते (21 टक्के), सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) (11 टक्के), डायअमोनियम फॉस्फेट (9 टक्के) या खतांचे असून अन्य खतांचे प्रमाण 2 टक्के आहे. 

भारतीय खत उद्योगाचे स्वरूप

भारतातील खत उद्योग प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रात आणि सहकारी क्षेत्रात असला, तरीही खाजगी क्षेत्रातसुद्धा खत उद्योग कार्यरत आहेत. जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार खत ही जीवनावश्यक वस्तू मानलेली असल्यामुळे खत उत्पादन करणे, किंमत ठरवणे, वितरण आणि विक्री यांचे व्यवस्थापन करणे या बाबी सरकारने जाणीवपूर्वक स्वतःच्या नियंत्रणात ठेवलेल्या आहेत. त्यासाठी Fertilizer Control Order आणि Fertilizer Movement (Control) Order या कायद्यांचा अवलंब केला जातो. त्यामार्फत खतांची पुरेशी उपलब्धता करून देणे, त्यांचा दर्जा राखणे, भेसळ रोखणे, किमती नियंत्रणात ठेवणे, काळा बाजार टाळणे, पिकांच्या हंगामानुसार शेतकऱ्यांची खताची मागणी पुरवणे, जमिनीची सुपीकता राखण्याच्या दृष्टीने योग्य प्रमाणात खतांचा वापर कसा करावा याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, इत्यादी गोष्टी सरकारतर्फे केल्या जातात. 

सार्वजनिक क्षेत्रात खत निर्मिती करणारे प्रमुख उद्योग  

फर्टीलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( FCIL), हिंदुस्तान फर्टीलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (HFC), राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCF), नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड(NFL), परादीप फर्स्ट लिमिटेड (PPL), द फर्टीलायझर्स अँड केमिकल्स ट्रॅव्हनकोर लिमिटेड (FACT), मद्रास फर्टीलायझर लिमिटेड (MFL), एफसीआय अरवली जिप्सम अँड मिनरल्स इंडिया लिमिटेड जोधपुर.

सहकारी क्षेत्रात खत निर्मिती करणारे प्रमुख उद्योग 

कृषक भारती कॉपरेटिव्ह लिमिटेड (KRIBHCO),

द इंडियन फार्मर्स फर्टीलायझर कॉपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO)

हे ही वाचा : ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची!

खाजगी क्षेत्रात खत निर्मिती करणारे प्रमुख उद्योग 

बसंत ऍग्रो टेक इंडिया लिमिटेड, भारत फर्टीलायझर इंडस्ट्रीस लिमिटेड, चंबल फर्टीलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड, कॅम्फर्ट ट्रेडर्स, कोरोमंडल फर्टीलायझर्स लिमिटेड, दीपक फर्टीलायझर अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, डंकन्स इंडस्ट्री लिमिटेड, गुजरात स्टेट फर्टीलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड, इंडोगल्फ फर्टीलायझर्स अँड केमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, द महाराष्ट्र ऍग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, मेंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मीरुत ऍग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, धारामसी मोरारजी केमिकल को लिमिटेड, मल्टिप्लेक्स फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड,  नागार्जुना फर्टीलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड, गुजरात नर्मदा व्हॅली फर्टीलायझर को. लिमिटेड, श्रीराम फर्टीलायझर्स अँड केमिकल्स, साऊर्थन पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटेड, तूतीकोरिन अलकाली केमी अँड फर्टीलायझर लिमिटेड,  युनायटेड फॉस्फरस लिमिटेड,  झुआरी इंडस्ट्रीज लिमिटेड – फर्टीलायझर लिमिटेड

लेखाच्या पुढील भागात आपण जागतिक पातळीवर आणि भारतातील खत वापर, खताची देशांतर्गत बाजारपेठ तसेच खत खरेदी विक्री संबंधी काही पैलूंची माहिती करून घेऊ.    

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

गंगापूजन आणि नावाडी: वैशाख शुद्ध सप्तमी हा दिवस गंगासप्तमी म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी गंगा नदीचं विशेष पूजन करण्यात
Thalassemia : थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे, जो रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीवर परिणाम करतो आणि रक्ताल्पता (ॲनिमिया / anemia) निर्माण
Seedwomen Rahi Popere : “ज्यात चमक असते, त्यात धमक नसते. जुनं तेच सोनं असतं” याची प्रचिती येऊन पुढच्या पिढीला उत्तम