‘छावा’ या सिनेमाची नोंद ही 2025 सालच्या किंबहुना आजवरच्या सर्वात सुपरहिट सिनेमांमध्ये होत आहे. प्रत्येक मराठी माणसाला याचा आनंद आहे. आपल्या मातीतल्या इतिहासाची जेव्हा जगाला ओळख होते आणि त्याचं तोंडभरून कौतुक होतं तेव्हा कोणत्याही प्रादेशिक भाषेतील व्यक्तींना आनंद होणे हे सहाजिकच आहे.
इतिहास हा असा विषय आहे ज्याची वेळोवेळी नोंद होत गेली आहे. पण, तो काळ जगलेली एकही व्यक्ती आज हयात नाहीये. त्यामुळे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे सिनेमांची निर्मिती करुन माहिती आणि मनोरंजन यांचा संगम असलेला ‘इन्फोटेन्मेंट’ सिनेमा हे आपल्या समोर सादर केले जात आहेत. जाणून घेऊयात अशा ‘इन्फोटेन्मेंट’ सिनेमांबद्दल.
‘द प्राईड ऑफ द नेशन: शिवाजी महाराज’ –
हा नव्या पिढीला इतिहासाची माहिती देणारा सिनेमा यावर्षी प्रदर्शित होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या सिनेमाचं पाहिलं पोस्टर प्रदर्शित केलं. आई तुळजा भवानीला वंदन करणारे छत्रपती शिवाजी महाराज या पोस्टर मध्ये दिसत आहेत. या सिनेमातील शीर्षक भूमिका ‘कांतारा’ फेम रिषभ शेट्टी यांने साकारली आहे. त्यांने आपल्या स्वलिखित, दिग्दर्शित आणि अभिनय केलेल्या ‘कांतारा’ मध्ये सुद्धा कर्नाटक राज्यातील एका नृत्य अभिनय प्रथेची जगाला माहिती करुन दिली आहे.
सादरीकरणाच्या दृष्टीने बघितलं तर हा सिनेमा खूप संथ होता. जो काही नृत्याविष्कार बघायला मिळतो तो केवळ शेवटच्या पाच मिनिटांत प्रेक्षकांना बघायला मिळतो. रिषभ शेट्टीच्या त्या पाच मिनिटांच्या नृत्य आणि नेत्राभिनयाच्या जोरावर या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मुसंडी मारत सर्व प्रेक्षकांना आणि समीक्षकांना चकित केलं.
ऐतिहासिक कथांचं दृश्यमान
भारतीय संस्कृतीतल्या विविध पद्धती, रितीभाती, प्रथा, कला, इतिहास हे लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवताना त्याची पटकथा मनोरंजक करण्याचा आजकाल निर्माता, दिग्दर्शकांचा मानस असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं अफाट कार्य हे आपल्या पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक रवी जाधव हे सुद्धा करणार आहेत. रितेश देशमुख हे या नाव अघोषित असलेल्या सिनेमात छत्रपतींची भूमिका सादर करणार आहेत. या आधी दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘जोगवा’ या सिनेमातून सुद्धा महाराष्ट्राच्या एका प्रथेची, श्रद्धेची माहिती प्रेक्षकांसमोर ठेवली होती. प्रथा योग्य की अयोग्य ? यावर स्वतः काहीच भाष्य न करता दिग्दर्शकाने हे काम प्रेक्षकांवर सोडलं होतं.
हे ही वाचा : कलाकार खरंच निवृत्त होतात का ?
‘द साबरमती रिपोर्ट’
‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा बघताना आपण एखादी डॉक्युमेंटरी बघत आहोत असा फिल येतो. 2007 मध्ये ‘गोध्रा’ येथे घडलेल्या सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तत्कालिन माध्यमांनी न दाखवलेली तथ्ये चित्रित केली आहेत.
हा सिनेमा किंवा त्या आधी आलेला यामी गौतमचा ‘आर्टिकल 370’ या सिनेमांवर केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे प्रचारक म्हणून टीका देखील करण्यात आली होती. पण, जेव्हा सिनेमाला मायबाप प्रेक्षकांची साथ मिळते, तेव्हा सर्व टिकांवर पांघरूण पडतं आणि सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करत असतो.
‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’
‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या विकी कौशलच्या सिनेमावर सुद्धा प्रचारासाठी तयार केलेला सिनेमा असा आरोप केला होता. पण, आजचा प्रेक्षक सुजाण आहे. तो सिनेमाची कथा, सादरीकरण हे जर चांगलं असेल तरच त्याला महत्व देत असतो. पुलवामा अटॅक नंतर निर्माण झालेली देशाची राजकीय परिस्थिती आणि त्या भ्याड हल्ल्याला भारताने दिलेलं चोख प्रत्युत्तर हे निर्मात्यांनी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर तंतोतंत दाखवलं, ज्यामुळे या सिनेमांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं.
‘मिशन मंगल’ यशोगाथा
‘मिशन मंगल’ या सिनेमाद्वारे अक्षय कुमारने भारतीय शास्त्रज्ञांनी मंगळावर यान पाठवण्यासाठी घेतलेले प्रयत्न दाखवले आहेत. विद्या बालनची महत्वपूर्ण भूमिका असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंत केलं. अक्षय कुमारची प्रतिमा ही सध्या सर्व सरकारी योजनांना मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी नेमण्यात आलेला ‘ब्रँड अँबेसेडर’ असल्यासारखी झाली आहे. ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’, ‘पॅड मॅन’ सारख्या सिनेमांतून अक्षय कुमारने सरकारची ‘मन की बात’ प्रेक्षकांना सांगितली असंच वाटत होतं.
हे ही वाचा : ओटीटीवर कोणासाठी काय-काय?
विमान अपहरणाशी संबंधीत चित्रपट
‘विमान अपहरण’ हा सुद्धा बॉलीवूड सिनेमांचा एक आवडीचा आणि सोयीस्कर विषय झालेला आहे. एक तर या सत्य घटनांमध्ये आधीच भरपूर ड्रामा झालेला असतो. शिवाय, आपल्या सक्षम पोलिसांनी त्यावर तोडगा काढून देशसेवा केलेली असते. या सर्व घटना या बॉलीवूड निर्मात्यांसाठी एक ‘हिट स्क्रिप्ट’ असते. अक्षय कुमारचा ‘एअरलिफ्ट’ हा या सिरीजमधील पहिला चांगला आणि यशस्वी सिनेमा म्हणता येईल. 1990 मध्ये कुवैत मध्ये झालेल्या विमान अपहरणाचा भारतीय सैनिकाने कुवैत मधील भारतीय व्यवसायिक मॅथ्यूजच्या मदतीने कसा ‘समाचार’ घेतला होता ? हे या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं आहे.
हाच पॅटर्न ‘आय सी 14 – कंदहार हायजॅक’ या सिनेमाचा होता. 1999 मध्ये काठमांडू मधून दिल्लीसाठी 814 प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाचं जेव्हा कंदहार येथे अपहरण होतं तेव्हा त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकार, एव्हीएशन मिनिस्ट्री यांच्यात कसा संवाद झाला होता ? अपहरणाचे ते 7 दिवस प्रवाशांनी कसे जगले होते ? हे या सिनेमात चित्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
‘नीरजा’ या सिनेमाची कथा देखील एका सत्यघटनेवर आधारित होती. 1986 मध्ये कराची येथे झालेल्या विमान अपहरणात भारतीय फ्लाईट अटेंडन्ट नीरजा भनोत हिने आपल्या जीवाची पर्वा न करता 359 प्रवाशांना वाचवलं होतं. ही सत्यकथा या सिनेमामुळेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. ‘तेजस’, ‘योद्धा’, ‘फायटर’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘स्काय फोर्स’ हे सिनेमे देखील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्यातरी सत्यघटनांची माहिती मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतात.
‘सरफिरा’ या अक्षय कुमारच्या सिनेमाने एअर डेक्कन कंपनीचे सर्वेसर्वा जी. आर. गोपीनाथ यांनी सामान्य माणसाला स्वस्तात विमान प्रवास करता यावा यासाठी केलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. अक्षय कुमारचा ओव्हरडोस झाल्या कारणाने केवळ या चांगल्या कथानक असलेल्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ वळवली असं मत समीक्षकांनी व्यक्त केलं होतं.
हे ही वाचा : नाट्यगृहांच्या अवस्थेला सरकार जबाबदार की प्रेक्षक?
दहशतवादी हल्ल्यावर आधारित सिनेमा
2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हॉटेल मुंबई’ आणि 2023 मध्ये प्रदर्शित झालेला ‘अटॅक्स ऑफ 26/11’ या दोन्ही सिनेमांनी 2008 मध्ये ताज हॉटेलवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचं वर्णन सिनेमातून केलं आहे. अतिरेकी कसे आले ? त्यांनी कसं सीएसएमटी स्टेशनवरील लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती या सिनेमाने दिली.
काही वेळेस अशा सिनेमांमुळे अतिरेक्यांना भारताची माहिती सहज उपलब्ध होते, अशी देखील प्रतिक्रिया त्यावेळी व्यक्त झाली होती. पण, जर भारत देश हाच एक स्टोरी असेल तर निर्माते तरी इतर ठिकाणी विषय शोधायला का जातील ? हे देखील एक सत्य आहे. ‘शेरशाह’ सिनेमातून कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगिल मधून पाकिस्तानी सैन्याला कसं बाहेर काढलं ? हे दाखवण्यात आलं आहे.
‘सुपर 30’ आणि ‘मांझी’ सारख्या सिनेमातून बॉलीवूड ने सामान्य माणसांमध्ये असलेल्या असामान्य क्षमतेची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. तसंच, ’83’, ‘चंदू चॅम्पियन’ सारख्या सिनेमांतून दिग्दर्शक कबीर खान यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात घडून गेलेला सुवर्णकाळ आणि अनमोल व्यक्तिमत्व यांची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.
‘मै अटल हूं’ आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘एमर्जन्सी’ या सिनेमातून भारतीय राजकारणात घडून गेलेल्या योग्य आणि अयोग्य घटनांची माहिती बॉलीवूडने दिली.
‘स्त्री’, ‘भुलभुलैय्या’ सारखे बोटांवर मोजता येतील इतके सिनेमा सोडले तर बॉलीवूडमध्ये सध्या काल्पनिक कथांचा दुष्काळ पडला आहे असं आपण म्हणू शकतो. लेखकांना मुक्त हस्ताने कथा लिहिण्यापेक्षा, त्यांचं बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्याचं दडपण अधिक वाढलं आहे; म्हणून हा बदल झाला असावा. तुलनेने हे दडपण टॉलीवूड मध्ये कमी वाटतं, म्हणून हा विषय सध्या महत्वाचा झाला आहे.