इंटरनेटवर आपण सगळेच थोड्याबहुत प्रमाणात अवलंबून राहायला लागलो आहोत. पूर्वी आपल्याला फोन नंबर पाठ असायचे, पत्ते शोधायला आपण माणसांशी बोलत असू, खुणा लक्षात ठेवत असू, जवळ कॅश ठेवावी लागे आणि पैसे असतील तरच शॉपिंगला जाता येत असे..पण गुगल मॅप पासून ऑनलाईन बँकिंग आणि ई-कॉमर्सपर्यंत सगळ्याच गोष्टी गेल्या दहा पंधरा वर्षात झपाट्याने बदलत गेल्या आहेत. इतक्या की आता लग्न न करता रोबो बॉय किंवा गर्ल फ्रेंड किंवा बायको/नवरा आणून संसार करायला माणसांची तयारी झालेली आहे. या सगळ्यात इंटरनेटवरचं आपलं अवलंबत्व आणि पुढे व्यसन हा विषय काहीसा दुर्लक्षित आहे.
इंटरनेटचं व्यसन
आपण गेमिंग, पॉर्न, सोशल मीडियाच्या व्यसनाबद्दल बोलतो पण इंटरनेटचं म्हणजे सतत या न त्या कारणाने ऑनलाईन राहण्याचं जे व्यसन आहे त्याबद्दल बोललं जात नाही. 11 डिसेंबरला रात्री काही तांत्रिक अडचणींमुळे मेटाचे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाटसॲप या तिन्ही प्लॅटफॉर्म्स ग्लीच येऊ लागले. यापूर्वी मायक्रोसॉफ्टमध्येही ही अडचण आलेली. मात्र, ही अडचण दुरूस्त होऊन सेवा पूर्ववत होऊपर्यंत अनेक योशल मीडिया यूजर्स हे हवालदिल झालेले. आपलं ऑनलाईन आयुष्य आता संपून जाणार की काय ही त्यामागची भीती असते. म्हणून इंटरनेट व्यसनाची, अवलंबत्वाची लक्षण काय हे जाणून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडण्याचे काही महत्वाचे मुद्दे समजून घेतले पाहिजेत.
इंटरनेट व्यसनाची (Internet Addiction) किंवा अवलंबित्वाची लक्षणे:
वेळेवर नियंत्रण नसणे : दिवसातले किती तास आपण इंटरनेटवर घालवतो याचं आपल्याला भानचं राहत नाही. सकाठी उठल्या बरोबर सोशल मीडियावरचे अपडेट्स पाहण्यासाठी मोबाईल हातात घेणं, नोटिफिकेशनची रिंग वाजली नसली तरिही मध्ये-मध्ये मोबाईल चेक करणं, हातातलं काम संपलं की लगेच मोबाईल घेऊन बसणं. तासन् तास मोबाईलवर गेम्स खेळनं, रील्स बघत बसणं यासाठी दिवसातला अर्धाअधिक वेळ दिला जातो.
दैनंदिन जीवनावर परिणाम: अभ्यास, काम, झोप, कुटुंबीय व मित्रांसोबत वेळ घालवण्याची इच्छा होत नाही. माणसं एकलकोंडी होतात. कुणाशी ही प्रत्यक्ष संपर्क ठेवला जात नाही. सामाजातला वावर हळूहळू कमी केला जातो.
संबंध बिघडणे : सतत मोबाईलवरच गुंग राहिल्याने कुटुंबीय, मित्रांशी संवाद कमी होतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्याशी मतभेद होतात. याचा परिणाम ऑनलाईन जगात वावरताना न कळत आपल्याला इतरांना ट्रोल करण्याची तीव्र इच्छा होते.
मूड बदलणे: इंटरनेटवर वेळ घालवताना आपलामूड हा खूप चांगला फ्रेश असतो. मात्र, मोबाईल हातातून खाली ठेवताच सगळं निरस भासू लागतं. कोणत्याही कारणाशिवाय चिडचिड होऊ लागते, अस्वस्थता किंवा नैराश्य येते. इंटरनेटच्या अती वापराचा मानसिक स्वास्थ्यावर झालेला परिणाम दिसायला लागतो.
व्यसनग्रस्त वागणूक: सतत सोशल मीडिया, गेम्स किंवा ऑनलाइन कंटेंट बघण्याची तीव्र इच्छा होते. इंटरनेट उपलब्ध नसल्यास बेचैनी, तणाव जाणवतो.
शारीरिक परिणाम : सतत मोबाईल पाहिल्याने डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोकेदुखी, हाताची बोटे दुखणे, मान किंवा पाठदुखी, अपुरी झोप असे अनेक शारिरीक आजारही सुरू होतात.
इंटरनेट व्यसनातून बाहेर पडण्यासाठी काही महत्वाचे उपाय:
वेळेचे नियोजन करा: इंटरनेटवर किती आणि कोणत्या वेळी वापरायचं याची वेळ निश्चित करायची.फोनवर आपण किती वेळ घालवतो हे मोजण्यासाठीसुद्धा काही ॲप्स असतात जसे की, Screen Time, Digital Wellbeing त्याचा वापर करून आपण सजग राहू शकतो. वेगवेगळ्या ॲप्ससाठीच्या वेळा ठरवून घ्या. त्यात शक्यतो बदल होणार नाही यावर लक्ष द्यावं.
सवय बदला: आपल्याकडे जास्त फावला वेळ असेलतर एखादा छंद जोपासावा, प्रवासात येता-जाता मोबाईल पाहण्याऐवजी त्यावेळेत वाचन करावं. घरात असताना कामं उरकल्यावर व्यायाम, संगीत किंवा बागायत करत वेळेचा सदुपयोग करावा.
झोपेचा सौदा नको : पुरेशी झोप हे सर्व आजागावरचं रामबाण उपाय आहे. त्यामुळे दररोज आपली झोप पूर्ण होईल यावर विशेष लक्ष द्यावं. बिंज वॉच करण्यासाठी, गेमिंगसाठी, पॉर्नसाठी, चॅटिंग किंवा रील्ससाठी.. अगदी कुठल्याही कारणासाठी झोप अपुरी ठेवू नये. चांगली शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी कमीत कमी 1 तास इंटरनेटचा वापर बंद करावा.
डिजिटल डिटॉक्स: आठवड्यातील एक दिवस किंवा शक्य असल्यास काही दिवस इंटरनेटपासून पूर्ण विश्रांती घ्यावी.
समाजाशी जोडलेले रहा : समाजात घडणाऱ्या विविध उपक्रमात सहभागी व्हायचं. नातेवाईक, आप्तजण आणि मित्रपरिवारांना प्रत्यक्ष भेटी द्यायच्या. कामावरून घरी आल्यावर आपल्या कुटुंबियांसोबत दररोज तास – दोन तास दिवसभराबद्दल संवाद साधावा.
आवश्यकता ओळखा : इंटरनेटचा उपयोग गरजेसाठी आणि शिक्षणासाठी करा. मनोरंजनासाठी त्याचा उपयोग हा मर्यादीत ठेवावा. आपली गरज काय आणि किती आहे त्यानुसार मोबाईलचा वापर करावा दिवसाला 2 जीबी डेटा उपलब्ध आहे म्हणजे वापरलेच पाहिजे असं नाही. त्यातही ऑनलाईन गेम्स, सिरीज पाहणं किंवा सोशल मीडियावर सर्फिंग करण्यासाठी इंटरनेट वापरण्याऐवजी इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होणारं ज्ञान मिळवण्यासाठी त्याचा सदुपयोग करावा.
तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवा : डिव्हाइसवरील नोटिफिकेशन बंद ठेवा. आवश्यकता नसलेले ॲप्स आणि गेम्स डिलीट करावेत.
समुपदेशन घ्या: जर आपण मोबाईलशिवाय एक तासही राहू शकत नसू तर आपल्याला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे, हे मान्य करावं. याविषयी आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगून सायकोलॉजिस्ट किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी.
स्वतःसाठी ध्येय ठेवा: इंटरनेटवर कमी वेळ घालवावा म्हणून लहान-सहान उद्दिष्टे ठेवून त्यावर काम करावं. जेथे आपण दिवसाला एखाद्या सिरीजचे 2 भाग सलग पाहतो त्याऐवजी दिवसाला एकच भाग पाहावा. ऑफिसमध्ये जर आपण स्क्रिनसमोर काम करत असू तर प्रवासात शक्यतो मोबाईलचा वापर टाळावा.