जगन्नाथ पुरी रथयात्रा, पत्नीला वर्षातून एकदाच दर्शन!

ओडिशाच्या प्रत्येक गावात जगन्नाथाची मंदिरं आहेत. पण जगन्नाथ म्हणजे विष्णू. पण जगन्नाथाच्या मंदिरांमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी लक्ष्मी नसून त्याचे बहिण, भाऊ आहेत. काही दुर्गम भागात जगन्नाथाची मंदिरे नाहीत. पण अशा वेळेस एखादे झाड जे जमिनीतून उगवतानाच तीन खोडांसहित उगवले आहे, अशा झाडाला जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेचा अंश मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते.
[gspeech type=button]

जगन्नाथ म्हणजे ओडिशाचे दैवत. ओडिशाच्या चराचरात जगन्नाथ आहे. घरात, घराबाहेर, इकडे तिकडे सर्वत्र जगन्नाथ दिसतो. प्रत्येक गावांत जगन्नाथाचे मंदिर असतेच. इतकेच काय तर जगभरात जिथे जिथे ओडिया लोक स्थलांतरित झाली आहेत तिथे तिथे त्यांनी जगन्नाथाचे मंदिर बांधले आहे. अशा ह्या ओडिया लोकांच्या आणि जगन्नाथाच्या अनेक कथा, चाली, रिती, समजुती प्रसिद्ध आहेत.

काही दुर्गम भागात जगन्नाथाची मंदिरे नाहीत. पण अशा वेळेस एखादे झाड जे जमिनीतून उगवतानाच तीन खोडांसहित उगवले आहे, अशा झाडाला जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेचा अंश मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते.

जगन्नाथासोबत पत्नी नाही

जगन्नाथ हा विष्णुचा अवतार मानला आहे. विष्णुच्या इतर अवतारांमध्ये, मंदिरांमध्ये साहजिक लक्ष्मीला स्थान आहे. मात्र पुरी येथे मुख्य गाभा-यात लक्ष्मीला स्थान नाहीत. मुख्य मंदिरात जगन्नाथ केवळ त्याच्या भाऊ आणि बहिणीसोबत आहे. असे का? यां संदर्भात अनेक कथा स्पष्टीकरणे आढळतात.

सामाजिक रितीभातींचा पत्नीच्या स्थानावर परिणाम

मुख्य मंदिरातील मुख्य आसनावर जगन्नाथ त्याच्या मोठ्या भावासोबत म्हणजेच बलभद्रासोबत विराजमान आहे. ह्या मुळे जगन्नाथाला आपल्या मोठ्या भावासमोर आपल्या पत्नीसोबत बसता येत नाही. याला कारण ओडिशातील सामाजिक रितीभातींचे दिले जाते. तेथील सामाजिक प्रथेनुसार स्त्रीने आपल्या मोठ्या दिरापासून आदरयुक्त अंतर राखायचे असते. परिणामी पुरीच्या मंदिरात लक्ष्मीचे मंदिर वेगळे आहे.

रुसलेल्या लक्ष्मीकरता रसगुल्ला

यासंदर्भात काही कथाही आढळतात. मुख्य दंतकथा भगवान जगन्नाथ आपला भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांच्या सोबत गुंडिचा यात्रेला गेल्याचा आहे. एकदा जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रेसोबत गुंडिचा यात्रेला गेले. लक्ष्मीला सोबत न नेल्याने तिला राग आला. परिणामी जेव्हा जगन्नाथ परत आले तेव्हा लक्ष्मी रागाने मंदिराचे दरवाजे बंद केले आणि त्याला आत येऊ दिले नाही. विविध कथा, चित्रे आणि विधीमध्ये जगन्नाथ लक्ष्मीला शांत करण्यासाठी नानाविध उपाय करताना दाखविले आहेत. यात जगन्नाथ तिच्यासाठी रसगुल्ला आणतानाही दाखविले आहेत. म्हणून रसगुल्ल्याला पुरीमध्ये विशेष महत्व आहे. या कथेचा परिणाम मंदिराच्या रचनेतही दिसून येतो. लक्ष्मीचे मंदिर मुख्य मंदिराच्या परिसरात वेगळे आहे.

 

बलभद्रच्या कोपामुळं वर्षातून एकदाच जगन्नाथाला लक्ष्मीचे दर्शन

यासंदर्भातील अजून एक कथा म्हणजे – सुरुवातीला लक्ष्मी जगन्नाथासोबतच मुख्य मंदिरात निवास करित होती. मंदिरावर त्याच्या मोठ्या भावाची म्हणजेच बलभद्राची हुकुमत होती. त्यानुसार तिला वर्षातून एकदाच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंदिराबाहेर जाता येत असे आणि सायंकाळी दिवेलागणीच्या आत परत येण्याचा दंडक होता. एका वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मंदिरातून बाहेर पडली होती आणि नगरात सर्वजण तिची कशी आराधना करित आहे हे पहात विहार करित होती. सांयकाळी परत येत असताना गावाच्या बाहेरील वस्तीवर काही लोक अतिशय मनापासून गाणी गात, नाचत, कसलाही देखावा न करत तिची आराधना करित होते. ते पाहून लक्ष्मी तिथे थांबली आणि रमली. परिणामी तिला मंदिरात परत येण्यास उशीर झाला. बलभद्राने रागाने मंदिराचा दरवाजा बंद केला आणि तिला आत येवू दिले नाही. जगन्नाथाचेही त्याच्या मोठ्या भावापुढे काही चालले नाही. अशा प्रकारे लक्ष्मी मुख्य मंदिरातून बाहेर पडली आणि तिचे मंदिर वेगळे झाले.

केवळ रथोत्सवाच्या वेळीच जगन्नाथाचा रथ तिच्या मंदिरासमोरून जातो तेव्हा त्यांनी एकमेकांचे दर्शन होते. अन्यथा वर्षभर त्यांनी एकमेकांचे दर्शन नसते.

रथयात्रेपूर्वी देवांना ताप!

आपल्याला जरी केवळ रथयात्रा माहित असली तरीही जगन्नाथाची रथयात्रा सुरु होण्याची नांदी म्हणजे स्नान पौर्णिमा. चैत्र – वैशाखाच्या कडकडीत उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झाल्याने देव आषाढ पौर्णिमेला   मिरवणुकीने खास उभारलेल्या `स्नान मंडपात’ येतात. मंदिराच्या परिसरातील उत्तर दिशेला असलेल्या विहिरीतून 108 कलशांना पाणी काढले जाते आणि त्यांना स्नान घातले जाते. या विहिरीला `सुना कुआ’ म्हणजेच सोनेरी विहीर असे म्हणतात.  वर्षभरानंतर देव गाभाऱ्याबाहेर मोकळ्या हवेत या स्नानासाठी येतात. मात्र मोकळी हवा, उघाड्यावरील 108 कलशांच्या पाण्याची अंघोळ यामुळे तिघाही भावंडाना ताप येतो. लागलीच त्यांना सफेद सुती वस्त्रात गुंडाळून मंदिराच्या आत आणले जाते, गाभाऱ्यात नेले जात नाही. त्यांना शुश्रुषेसाठी `अनासार घर किंवा अनासार पिंडी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट दालनात नेले जाते. बरे होईपर्यंत म्हणजे पुढचे 15 दिवस, यात्रा सुरु होईपर्यंत त्यांना इथेच ठेवले जाते आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते.

त्यानंतर जगन्नाथाच्या राजवैद्यांना पाचारण केले जाते. देवांना येणा-या पाहुण्यांचा आणि भक्तमंडळींचा व्यत्यय होऊ नये म्हणून `अनासार घरासमोर बांबूच्या चटयांची तात्पुरती भिंत बांधली जाते. या भिंतीला एक फट असते केवळ राजवैद्य आणि `दैत्यपती’ नावाच्या आदिवासी समूहातील काही विशिष्ट व्यक्तींच्या जाण्या-येण्यासाठी.  `दैत्यपती देवांसाठी गुप्त विधी करत असतात आणि त्यांना बरे करतात अशी समजूत आहे. या कालावधीत इतर कोणालाही `अनासार घरा’त प्रवेश नसतो. पुजा-यांनाही प्रवेश निषिद्ध असतो. या 15 दिवसांच्या आजारपणाला `अनासार पर्व’ असे म्हणतात.

 

आजारपणातून उठायला विशेष आहार आणि मसाज

याकालावधीत जगन्नाथाचा आहारही नेमका असतो. पहिले चार दिवस जगन्नाथांना अनासार पाना नामक दुधाचा गोड पदार्थ दिला जातो. पाचव्या दिवशी त्यांचा अंगाला फुलेरी तेलाने मसाज केला जातो. हे तेल वर्षभर आधीपासूनच तयार केलेले असते. तिळाच्या तेलात सुगंधी द्रव्ये, औषधे घालून तेलाचे बुधले एक वर्ष आधीच जमिनीत पुरलेले जातात. दरवर्षी गेल्या वर्षी पुरलेले बुधले वापरतात. त्यानंतर दशमूला मोदकांचा देवांना भोग चढवतात. या मोदकातही विविध  औषधी वनस्पती, मध, साखर, दूध आणि बरेच पौष्टिक पदार्थ असतात जे देवांना बरं होण्यात मदत करते. हे मोदक वंशपरंपरेने राजवैद्य बनवितात. दररोज 120 मोदकांचा भोग असतो. 12 व्या दिवशीच देवांची तब्येत सुधारते असे म्हणतात. मात्र अधिकचे दोन-तीन दिवस देवांना आराम करून देतात. कारण यानंतर लगेचच यात्रा असते.  13व्या दिवशी पुरीचा राजाला देवांचा तब्बेतीचा निरोप धाडला जातो आणि ते देवांच्या तब्येतीची विचारपूस विचारण्यासाठी येतात.

हेही वाचाः जगन्नाथपुरीचं मूळ आदिवासी परंपरेत !

या पंधरा दिवसाच्या कालावधीत भक्त बाहेर रडून देवांची प्रार्थना करतानाही आढळतात. एखादे लहान बाळ आजारी पडल्यावर त्याची आई ज्याप्रमाणे कासाविस होते त्याप्रमाणे भक्त कासाविस होतात. शेवटी रथयात्रा सुरु व्हायच्या आदल्या दिवशी देव खडखडीत बरे होतात, भक्तांना दर्शन देतात आणि यात्रेला सुरुवात होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

ज्या विविध देवतांचे कृष्णरूपात एकत्रीकरण झाले, त्यापैकी सर्वात प्राचीन पुरावा वासुदेव या देवतेचा आहे. हा पुरावा म्हणजे हेलिओडोरस स्तंभावरील शिलालेख.
विष्णूचा घोड्याचे मुख असलेला अवतार म्हणजेच हयग्रीव. त्याला ज्ञान आणि प्रज्ञेचा देव मानले जाते. भागवत पुराणाच्या दशम स्कंधातील चाळीसाव्या अध्यायात
श्रावण महिन्यात काही विशिष्ट वनौषधी आणि पवित्र वनस्पती आपल्याला नैसर्गिकरित्या रानात किंवा अंगणात आढळतात. या वनस्पतींना धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ