संगणक/ कंप्युटर्स हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. कोणत्याही क्षेत्रात असलं तरीही कंप्युटरचा वापर अत्यावश्यक आहे. पण वापराबरोबरच त्याची काळजीही घ्यायला हवी. त्यामुळेच कंप्युटर्ससाठी अँटी व्हायरस सिस्टीमही अत्यावश्यक बनली आहे. आणि अँटी व्हायरस सिस्टीममध्ये सगळ्यांत अग्रेसर नाव आहे क्विकहिल (Quick heal). महत्वाचं म्हणजे या अग्रगण्य कंपनीचे संस्थापक मालक आहेत कैलास काटकर. मराठी मातीत जन्मलेल्या काटकर यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर गगनभरारी घेतली आहे. खरंतर औपचारिक शिक्षण पूर्ण न करू शकलेल्या कैलास काटकर यांनी अनुभवांच्या शाळेत शिकून इथपर्यंत घेतलेली झेप खरोखरंच आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.
रेडिओ आणि कॅलक्युलेटर दुरुस्ती
कैलास काटकर यांचा जन्म मूळचा सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर इथला. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना इयत्ता नववीतच शिक्षण सोडावं लागलं. हातात अर्धवट शिक्षण असलेल्यांना कोण नोकरी देणार? त्यामुळे मग कैलास यांनी एका दुकानात रेडिओ आणि कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम स्वीकारलं. या कामासाठी त्यांना दरमहा 400 रूपये मिळत होते. 1985 ते 1991 अशी सहा वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत तर केलीच. पण दुरुस्तीच्या कामातले बारकावे शिकून घेतले. त्यांचे वडील फिलिप्स कंपनीत मशीन सेटर म्हणून काम करायचे. आपल्या वडिलांना त्यांनी घरी रेडिओ दुरुस्त करताना पाहिलं होतं.त्याचाही त्यांना फायदा झाला. त्यांच्या मालकानं त्यांना मुंबईत दोन महिने प्रशिक्षणासाठी पाठवलं.
भारतात सॉफ्टवेअर क्षेत्राच्या आगमनानं नवी संधी
या सगळ्याचा एकत्रित फायदा म्हणजे 1991 मध्ये पुण्यात स्वत:चं दुकान सुरू केलं. त्यावेळेस त्यांच्याकडे 15 हजार रूपये होते. यामध्ये त्यांच्या भावाची त्यांना मदत होत होती. त्यामुळे त्यांच्या भावानंही 12 वी नंतर शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. पण आपण औपचारिक शिक्षण घेऊ शकलो नाही तर भावानं तरी घ्यावं अशी कैलास यांची इच्छा होती. त्यामुळेच प्रचंड मेहनत आणि प्रयत्न करून त्याच्या कंप्युटर सायन्सची फी त्यांनी भरली. साधारण याच वेळेस त्यांच्या दुकानात काही संगणक दुरुस्तीसाठी येऊ लागले. यावेळेस भारतात सॉफ्टवेअरचं मार्केट अगदी तेजीत होतं. 1993 मध्ये कैलास यांनी संगणक दुरुस्ती आणि CAT संगणक सेवा सुरू केली. त्यांच्याकडे जे कंप्युटर्स दुरुस्तीसाठी यायचे त्यापैकी बहुतेकांमध्ये व्हायरस शिरला असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळेस यावर अगदी सहजपणे अँटी व्हायरस सिस्टीम उपलब्ध नव्हती आणि जी होती ती प्रचंड महागही होती. काळाची पावलं ओळखून त्यांनी त्यांच्या भावाला, संजयला अँटी व्हायरस प्रोग्रामवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. संजयनं व्हायरस शिरलेले मशीन्स दुरुस्त करण्यासाठी काही प्रोग्राम विकसित केले. हे प्रोग्राम्स कैलास यांनी त्यांच्या दुकानात दुरुस्तीसाठी येणाऱ्या कंप्युटर्समध्ये वापरले.
अँटीव्हायरसची भविष्यातील चाहूल
भविष्यातील अँटीव्हायरस प्रोग्रामला मागणी भरपूर वाढणार आहे, हे काटकर भावांच्या लक्षात आलं. यामुळे निर्माण होणाऱ्या नव्या व्यवसायाच्या संधी त्यांनी वेळीच ओळखल्या. त्यांनी हार्डवेअर दुरुस्तीऐवजी अँटी व्हायरस सोल्युशन्सवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. 1995 मध्ये त्यांनी DOS साठी Quick Heal Antivirus हे पहिलं उत्पादन लाँच केलं. त्यावेळेस जे अँटी व्हायरस उपलब्ध होते, त्यापैकी हा सर्वांत स्वस्त पर्याय होता. त्यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. 1998 मध्ये त्यांनी पूर्णपणे अँटी व्हायरस सोल्युशनच्या व्यवसायाकडे वळायचं ठरवलं. कैलास काटकर यांनी मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारली तर त्यांचा भाऊ संजय रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम बघायचा. वयाच्या 22 व्या वर्षी 50 हजार रुपयांना त्यांनी पहिला कंप्युटर विकत घेतला होता. त्यावेळेस त्यांना किती कष्ट पडले होते. आता त्यांची कंपनी कोट्यवधींची उलाढाल करते. जगभरातील असंख्य कंप्युटर्समध्ये त्यांची अँटी व्हायरस प्रणाली वापरली जाते. ‘क्विक हिल’ ही सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील जगातील एक महत्वाची कंपनी मानली जाते. 2023 मध्ये या कंपनीने 1,40,000 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याची माहिती आहे. कैलास काटकर आता या कंपनीचे MD आणि CEO आहेत.
आपल्या कल्पना ‘सेलेबल’ही असायला हव्यात
पण अँटी व्हायरस सोल्युशन्सच्या व्यवसायात उतरायचं ठरवलं तरीही तिथली वाटलाल सोपी नव्हती. खाचखळग्यांवर मात करत, अनुभवांतून शिकत कैलास काटकर यांनी व्यवसायात प्रगती केली. व्यवसाय उभा करण्यासाठी फक्त अनोख्या कल्पना असून चालत नाही तर त्या कल्पना प्रत्यक्षात येऊ शकतील का? त्या मार्केटमध्ये ‘सेलेबल’ आहेत का? याचाही विचार केला पाहिजे असं कैलास काटकर सांगतात. त्याचबरोबर या कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी फंड्स म्हणजेच पैसा लागतो आणि तो आपल्यालाच उभा करावा लागतो. त्यासाठी प्रचंड मेहनतीची, कष्टांची तयारी ठेवावी लागते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर काळाची पावलं ओळखून त्याला प्रतिसादही द्यायला शिकलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.
चढ-उतार आणि अमेरिकन गुंतवणूक
त्यांच्या व्यवसायातही चढउतार आले. कधीतरी व्यवसाय बंद करावा अशी परिस्थितीही निर्माण झाली. पण त्यांनी त्यावर मात केली. 1993 मध्ये त्यांनी न्यू इन्शुरन्स इंडियासाठी वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं. पण तरीही 1999 मध्ये व्यवसाय चालेल की नाही अशी परिस्थिती होती. पण ते मागे हटले नाहीत. 2002 पासून त्यांचा व्यवसाय पुण्याबाहेरही विस्तारण्यास सुरुवात झाली. 2003 मध्ये त्यांनी नाशिकमध्ये पहिली शाखा उघडली. 2010 मध्ये Sequoia Capital या अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्मने Quick Heal मध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक परिस्थितीला पाठबळ मिळाले. त्याचा परिणाम म्हणजे 2013 पर्यंत देशभरात क्लिक हिलची 23 कार्यालये उघडली गेली होती आणि त्यामध्ये 600 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते.
क्विक हिल कंपनीचा IPO
2016 मध्ये क्विक हिल कंपनीचा IPO मार्केटमध्ये आला आणि कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाली. एका नववी शिकलेल्या मुलानं फक्त 15 हजार रुपये भांडवलावर उभी केलेली कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होणं ही अत्यंतच गौरवास्पद कामगिरी आहे. Forbes नेही याची दखल घेतली. त्याशिवायही काटकर यांना अनेक मान सन्मान मिळाले आहेत. व्यवसाय फक्त पैसे कमावण्यासाठी नसावा. त्यामधून समाजाद्वारे आपली बांधिलकी जपली जावी असं काटकर यांचं ठाम मत आहे. त्यांची कंपनी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. विशेषत: विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना सायबर सुरक्षेबद्दल माहिती देण्याचं काम करते. शालेय शिक्षण फक्त नववीपर्यंत घेतलेल्या कैलास काटकर यांना त्यांच्या याच योगदानाबद्दल चितकारा युनिव्हर्सिटीनं मानद डॉक्टरेटही दिली आहे.
नवीन उद्योग व्यवसाय करण्यासाठी तरुणांना ते प्रोत्साहन देतातच पण त्याचबरोबर फक्त सल्लागारांवर अवलंबून राहू नका, स्वत: प्रत्येक गोष्टीची माहिती घ्या, असं आवाहनही ते करतात. कॅलक्युलेटर दुरुस्ती ते सायबर सुरक्षा क्षेत्रामधील जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी असा कैलास काटकर यांचा प्रवास खरोखरंच प्रेरणादायी आहे.