कुंभमेळ्यात जाताना घ्यावयाची आरोग्य-खबरदारी

Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्यासारख्या धार्मिक उत्सवांच्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या आणि अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जाण्यापूर्वी योग्य ते नियोजन करून आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग, कुंभमेळ्यात आरोग्यसुरक्षेसाठी व्यक्तिगत स्तरावर कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी जाणून घेऊया.

कुंभमेळा म्हणजे भारतीय संस्कृतीचं एक अनोखे दर्शन! अध्यात्म, श्रद्धा, आणि लाखोंच्या सहभागाने सजलेला हा सोहळा अनुभवण्यासाठी लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

पण इतक्या मोठ्या गर्दीत आरोग्याच्या समस्या आणि अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जाण्यापूर्वी योग्य ते नियोजन करून आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग, कुंभमेळ्यात आरोग्यसुरक्षेसाठी व्यक्तिगत स्तरावर कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी जाणून घेऊया.

1. प्रवासापूर्वीची तयारी:

कुंभमेळ्यात सुरक्षित सहभागी होण्यासाठी प्रवासाची योग्य तयारी करणं गरजेचं आहे.

वैद्यकीय तपासणी:

कुंभमेळ्यासाठीजाण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषतः ज्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा श्वसनाचे आजार आहेत त्यांनी हे करायलाच हवे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या औषधांमध्ये काही बदल करावयाचा असल्यास तो करता येईल.

औषधे सोबत ठेवणे :

नियमित लागणाऱ्या औषधांसह पॅरासिटामोल, डोकेदुखीसाठी तसेच पित्तावरील गोळ्या, ORS पाउडर, आणि प्राथमिक उपचारांचा संच सोबत ठेवा.

तुमची नियमित लागणारी औषधे थोडी अधिक प्रमाणात सोबत ठेवा.

तसेच त्या गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन देखील सोबत ठेवा.

लसीकरण:

संभाव्य संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक लसीकरण करून घ्या.

यामध्ये कॉलरा किंवा टायफॉइड सारख्या पाण्याद्वारे किंवा अन्नाद्वारे पसरणाऱ्या आजारांच्या तसेच फ्लू सारख्या हवेद्वारे पसरणाऱ्या आजारांविरुद्धच्या लसी घेता येऊ शकतील. मात्र या लसी काही आठवड्यापूर्वी घ्यायला हव्यात.

 हे ही वाचा : ऐक्याचा महायज्ञ महाकुंभ मेळावा 2025

2. तीर्थावर स्नान करताना आरोग्याची काळजी:

पवित्र स्नान हा कुंभमेळ्याचा केंद्रबिंदू आहे. पण यावेळी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

पाण्याची स्वच्छता:

स्नानासाठी सरकारी अधिकारी जिथे स्नानाला परवानगी देतात तिथेच स्नान करा. अतिदूषित पाण्यात जाऊ नका. नदीत स्नान करताना ते पाणी नाकातोंडात जाणार नाही याची काळजी घ्या.

गर्दीचा अंदाज:

गर्दीच्या शिखरवेळा (मुख्य स्नान दिवस) शक्यतो टाळा. कारण त्या वेळी अति गर्दीमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते.

3. शारीरिक आणि मानसिक थकवा टाळा:

कुंभमेळ्यातील गर्दी आणि जास्त अंतर चालणं यामुळे थकवा जाणवतो. यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या:

स्नानानंतर आराम:

स्नान आणि इतर धार्मिक कार्यक्रमांनंतर वेळोवेळी विश्रांती घेणे आवश्यक आहे. जर लहान मुले किंवा वयस्कर व्यक्ती सोबत असतील तर अधिक काळजी घ्या.

पाणी प्या:

शरीराचे निर्जलीकरण होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार  भरपूर पाणी प्या. मात्र ते पाणी शुद्ध असेल याची काळजी घ्या.

हे ही वाचा : तुम्हीसुद्धा महाकुंभाला जाणार? मग या खास गोष्टी तुमच्यासाठी!

4. संसर्गजन्य आजारांपासून बचाव:

इतक्या मोठ्या गर्दीत संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते.

मास्क वापरा:

श्वसनमार्गाचे आजार टाळण्यासाठी मास्क लावा. विशेषतः जिथे गर्दी जास्त असेल किंवा बंदिस्त जागांमध्ये काळजी घ्यायला हवी. ज्यांना इतर काही आजार असतील त्यांनी विशेष काळजी घ्यावी.

हातांची स्वच्छता:

बाहेरून आल्यानंतर किंवा अन्न खाण्यापूर्वी हात सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवा. हातांच्या नियमित स्वच्छतेमुळे पोटाचे व श्वसनाचे आजार होण्याची शक्यता कमी होते.

पाणी बाटलीतलं वापरा:

उकळलेलं किंवा पॅकबंद पाणीच प्या. दूषित पाणी हे जंतुसंसर्गाचे एक महत्त्वाचे कारण आहे.

डासांपासून सुरक्षा :

दिवसा डासांच्या चाव्यापासून संरक्षण करण्यासाठी डास-विरोधक क्रीम वापरता येईल.  तसेच मुक्कामाच्या ठिकाणी डासांसाठीचे मशीन किंवा अगरबत्ती लावता येईल.

5. अपघात टाळण्यासाठी खबरदारी:

कुंभमेळ्यातील गर्दीमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील उपाय करा:

आपत्कालीन क्रमांक:

स्थानिक आपत्कालीन मदत क्रमांक जवळ ठेवा, जेणेकरून काही अडचण आली तरी तातडीने मदत मिळवता येईल.

सुरक्षित ठिकाणी थांबा:

सर्वाधिक गर्दीच्या वेळी धक्काबुक्की टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा तसेच मिरवणुका अंतर राखून पाहा.

कुटुंबासोबत संपर्क ठेवा:

समजा कुटुंबातील कोणी व्यक्ती दूर झाली असेल तर अशावेळी हरवलेल्यासाठी ठरलेलं ठिकाण निश्चित करा. म्हणजे जी व्यक्ती दूर होईल ती त्या ठिकाणी जाऊन इतरांची वाट बघू शकेल.

 हे ही वाचा : प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्याच्या स्वच्छतेसाठी इस्त्रो आणि BARC संस्थाही सज्ज!

6. पर्यावरण आणि सार्वजनिक स्वच्छता:

आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतः सोबतच परिसराची स्वच्छता देखील महत्वाची आहे.

स्वच्छता राखा:

कचरा योग्य ठिकाणी फेकून परिसर स्वच्छ ठेवा. कचरा वाढला की त्यामध्ये पाणी साठवून एडीज सारखे डास वाढू शकतात.

शौचालयांचा वापर करा :

शौचासाठी जी ठिकाणे निर्देशित केली आहेत त्यांचाच वापर करायला हवा.

7. विशेष आरोग्य सूचना ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी:

गर्दीची ठिकाणे या गटांसाठी अधिक त्रासदायक असतात.  त्या ठिकाणी जाणे अत्यावश्यकच असल्यास पुढील काळजी घेणे आवश्यक.

ज्येष्ठ नागरिकांसाठी:

फार चालण्याची गरज असणाऱ्या ठिकाणी जाणं टाळा.

मुलांसाठी:

त्यांना गर्दीत एकटं सोडू नका, आणि सतत लक्ष ठेवा.

श्वसनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी:

अशा लोकांनी गर्दीपासून दूर राहण्याचा किंवा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करा.

हे ही वाचा : महाकुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षा आणि सोयीसाठी नवे उपाय

8. मानसिक आरोग्य:

कुंभमेळ्याच्या धावपळीत मानसिक शांतता राखणं महत्त्वाचं आहे.

ध्यानधारणा:

ध्यानधारणा किंवा मेडिटेशन केल्याने तणाव कमी होऊ शकतात.

तणाव टाळा:

कोणत्याही छोट्या त्रासामुळे तणाव घेऊ नका, संयम बाळगा. छोट्या  ताणाचे पर्यावसन मोठ्या भांडणांमध्ये होऊ शकते, त्यामुळे ताण व्यवस्थापन महत्त्वाचे.

कुंभमेळ्याचा आनंद घेऊनही सुरक्षित राहा!

सर्व भक्तांच्या व प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजनकर्त्यांकडून विविध दवाखाने, फिरते दवाखाने,  टेली-मेडिसिन व्यवस्था अशा सुविधा दिलेल्या असतात . त्याविषयी माहिती घ्या.

कुंभमेळा हा एक सांस्कृतिक सोहळा आहे, पण याचा खरा आनंद घेण्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं असणं महत्त्वाचं आहे. वर दिलेल्या सूचना पाळून तुम्ही कुंभमेळ्याचा अनुभव अधिक सकारात्मक आणि संस्मरणीय बनवू शकता.

“आध्यात्मिक अनुभव घेण्यापूर्वी आरोग्य आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करणं हाच खऱ्या श्रद्धेचा भाग आहे!”

1 Comment

  • Aparna akolkar

    Khupach upyukt mahiti ahe mam ,thank you very much

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : कृषी निविष्ठा उद्योगांसमोर असलेली आव्हाने कोणती हे समजून घेऊया. ही वैशिष्ट्ये आणि आव्हाने एकमेकांशी संबंधित अशीच आहेत.
Jarud village :संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावतीमधल्या जरुडमध्ये भूजल पातळी प्रचंड खालावली. संत्रा बागा सुकू लागल्या आणि शेतकरी आत्महत्या
Marathi community in baroda : गुजरातमधील वडोदरा (बडोदा) येथे मराठी लोकांचे स्थलांतर साधारण 18 व्या शतकापासून सुरू आहे. मराठी राजवटीचा

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई – औद्योगिक प्रयोजनासाठी एनए सनद आवश्यक नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश