माया डोळस : दाऊदच्या सावलीत वाढलेला मुंबईचा बादशाह

Maya Dolas : आयटीआयचं शिक्षण घेऊनही केवळ भरपूर पैसा कमवायचा आहे म्हणून 16 वर्षी गुन्हेगारीत उतरणारा माया डोळस. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊतचा पंटर म्हणून ओळख मिळवलेल्या महेंद्र उर्फ माया डोळसचं मुंबई एटीएसने 16 नोव्हेंबर 1991 च्या दुपारी एन्काऊंटर केलं. माया डोळसचं एन्काऊंटर हे मुंबई पोलिसांचं सर्वात मोठं आणि रक्तरंजित एन्काऊंटर आहे.
[gspeech type=button]

लोखंडवाला कॉम्प्लेक्स… मुंबईतल्या श्रीमंत लोकांच्या वस्तीसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण. पण 16 नोव्हेंबर 1991 च्या दुपारी एन्काऊंटरच्या थराराने लोखंडवाला कॉम्प्लेक्सचं नाव खूपच चर्चेत आलं. हा एन्काऊंटर होता, माया डोळस याचा. मुंबईत दाऊदचा हस्तक म्हणून काम करणारा डॉन. मुंबईतल्या प्रतिक्षानगर झोपडपट्टी ते लोखंडवालामधल्या स्वाती बिल्डींगमधल्या एन्काऊंटरच्या घटनेपर्यंतचा माया डोळस याचा प्रवास थक्क करणारा आहे. माया डोळसचं एन्काऊंटर हे मुंबई पोलिसांचं सर्वात मोठं आणि रक्तरंजित एन्काऊंटर आहे. ज्या डी गँगसाठी मायाने काम केलं त्याच गॅंगने त्याला संपवलं असं म्हणलं जातं.

महेंद्र ते माया डोळस

माया डोळस याचं मूळ नाव महेंद्र डोळस. मूळचे कोकणातले. आईवडिल विठोबा आणि रत्नमाला डोळस हे नोकरीच्या शोधात मुंबईत आले. सायनमधील प्रतिक्षानगरच्या झोपडपट्टीत राहू लागले. वडिल विठोबा हे शिपाई होते, तर आई रत्नमाला या घरकाम करायच्या. ऑक्टोबर 1966 मध्ये महेंद्र उर्फ माया डोळसचा जन्म झाला. महेंद्रसह त्यांना एकूण पाच मुलं होती. तुटपुंज्या कमाईवर आठ जणांचं कुटुंब चालवताना डोळस दाम्पत्याची खूप ओढाताण व्हायची. दोन वेळचं खायला मिळणं कठीण होतं. त्यामुळे या सगळ्या मुलांचं शिक्षण पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं नाही. तरीही महेंद्र उर्फ मायाने आपलं आयटीआय पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. पण पुढे नोकरी करुन समान्य जीवन जगण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याला भराभर पैसा कमवून ऐषोआरामाचं आयुष्य जगायचं होतं.

महेंद्रला त्याची आई लहानपणी मह्या म्हणायची. याचा अपभ्रंश होऊन काहीजण त्याला माया म्हणू लागले. त्याला हे नाव आवडलं आणि पुढे गुन्हेगारीत उतरताना त्याने हेच नाव वापरायला सुरुवात केली.

सोळावं वरीस धोक्याचं

माया वयाच्या 16 वर्षी कांजूरमार्ग आणि भांडूप भागात सक्रिय असलेल्या अशोक जोशी याच्या टोळीत सामील झाला. त्याला भरपूर पैसा कमवायचा होता. त्यामुळे मारामारी, खून अशा पद्धतीची कामं करण्याऐवजी तो खंडणी वसुलीची कामं जास्त करू लागला. थोड्याच दिवसात या गुन्हेगारीच्या क्षेत्रात त्याच्या नावाचा दबदबा वाढला.

दाऊदचा पंटर माया डोळस

दाऊदला मुंबईत त्याचा दरारा कायम ठेवायचा होता. त्यासाठी भायखळा कंपनीसारख्या टोळ्यांना संपवणं गरजेचं होतं. याची सुरुवात दाऊदने अशोक जोशी याच्यापासून केली. दाऊदने एका पाठोपाठ अशोक जोशी आणि भायखळा कंपनीच्या रमा नाईकला संपवलं. अशोक जोशीच्या हत्येनंतर त्याच्या टोळीची सुत्रं अरुण गवळीने हातात घेतली.

याच काळात माया डोळस दाऊदच्या नजरेत आला. आणि त्यानं मायाला डी गँगमध्ये सामील करुन घेतलं. मायाला सुरुवातीपासून दाऊद गँगसोबत काम करायचं होतं. अखेर त्याला ती संधी मिळाली. मायाने मुंबईत दाऊदचं काम सुरु केलं. प्रतिस्पर्धी टोळ्यांतील गुन्हेगारांना संपवणं, व्यावसायिकांकडून खंडणी वसुल करणं, विरोध करणाऱ्यांना यमसदनी पाठवणं या सगळ्या कुकर्माने माया डोळसने मुंबईत दहशत पसरवून ठेवलेली.

ऑपरेशन माया डोळस

मुंबईत गँगस्टर्सची दहशत खूपच वाढलेली. या सगळ्या गुन्हेगारांपासून मुंबईची मुक्तता करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक म्हणजे एटीएसची स्थापना झाली. ए.ए.खान हे तत्कालीन एटीएस प्रमुख होते. दहशतवादाबरोबरच मुंबईतल्या अंडरवर्ल्डला संपवणं हेही त्यांचं उद्दीष्ट होतं.

त्याकाळात गुन्हेगारांना ट्रेस करणं, त्यांच्या अड्याचा पत्ता लावणं, हे आजच्या इतकं सोपं नव्हतं. या सगळ्या कामांसाठी खबऱ्यांचं जाळं खूप कामाला यायचं. त्यावेळी माया डोळस हा एटिएसच्या हिटलिस्टवर होता. एका खबऱ्याकडून माया हा खंडणीसाठी एका व्यावसायिकाला फोन करत असल्याची टीप मिळालेली. पोलिसांनी ही फोनलाईन टॅप केली. त्यावरून माया डोळसचा पत्ता मिळाला. हा पत्ता होता, लोखंडवाला कॉम्प्लेक्स स्वाती बिल्डींग, तिसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट.

माया डोळस हा तिकडे कायमचा राहत नव्हता. तो त्याच्या साथीदारांसोबत कधीतरी तिथं यायचा. 16 नोव्हेंबरला माया तिकडे येणार असल्याची टीप मिळाली. त्यानुसार एटीएस प्रमुख ए.ए. खान यांनी सुनिल देशमुख-घराल आणि एम.आय.कवी या आपल्या दोन साथीदारांसह 150 पोलिसांची कुमक घेऊन लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये सापळा रचला.

एन्काऊंटर नाट्य

माया डोळस आणि दिलीप बुवा हे फ्लॅटवर आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या दोन टीम्स बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावर गेले. पण फ्लॅट बंद होता. पण त्या फ्लॅटमधून फोनची केबल ग्राऊंड फ्लोअरच्या एका फ्लॅटमध्ये जात होती. तिथेच माया डोळस, दिलीप बुवा आणि त्यांचे साथिदार थांबलेले होते. ऑफिसर कवी यांनी फ्लॅटचं दार वाजवलं. दार वाजवल्यावर काही वेळ शांतता पसरली. काही वेळानं आतून एके 47 मधून गोळीबार सुरु झाला. ऑफिसर कवी आणि घराल यांना या परिस्थितीचा अंदाज नव्हता. ऑफिसर कवी यांनी बुलेटप्रुफ जॅकेट घातलेलं म्हणून ते बचावले. पण एम.आय.कवी यांनी बुलेटप्रुफ जॅकेट घातलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्या छातीत आणि पोटात गोळ्या लागल्या. हे एन्काऊंटर जवळपास साडेतीन तास चाललं. यात दोन्ही बाजूंनी जवळपास एक हजारपेक्षा जास्त गोळ्या झाडल्या गेल्या. यात सात गुन्हेगार मारले गेले. पोलिसांना फक्त पाच जण फ्लॅटमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. पण प्रत्यक्ष घटनास्थळी पोलिसांना सात जणांचे मृतदेह सापडले.

असं म्हणतात की, माया डोळसची माहिती दाऊदनं पोलिसांना दिली. कारण माया डोळस हा दाऊदपासून वेगळं होऊन त्याची स्वतःची गँग तयार करण्याच्या मार्गावर होता. दाऊदला मुंबईत कुणीही प्रतिस्पर्धी नको होता. त्यामुळं त्यानेच स्वत:च्या माणसांकरवी पोलिसांपर्यंत माया डोळसची टीप पोहोचवली आणि त्याचा गेम केल्याची चर्चा होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

एटीपी अर्थातच असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सने जाहीर केलेल्या या आठवड्याच्या क्रमवारीत भारताचा एकही टेनिसपटू पहिल्या शंभर टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवू शकला
Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील खत उद्योगावरील हा तिसरा लेख. यामध्ये खतांच्या विक्री व्यवस्थापनातील चार सर्वात महत्त्वाच्या
गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. परंतु काही उपक्रम हे केवळ विकासाचे नव्हे तर, सामाजिक परिवर्तनाचेही प्रतीक ठरतात. स्मशानभूमीचे ‘स्मृती