जसं जशी 1 जानेवारी तारीख जवळ यायला लागते, त्यासोबत प्रत्येक वर्षी पूर्णत्वाला नेण्यासाठी, नवीन संकल्प करायची स्वप्न पडायला सुरुवात होते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठी लिस्ट तयार होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याचा दणक्यात श्रीगणेशा होतो आणि 15 जानेवारीपर्यंत त्यातल्या बहुतांश संकल्पनांच विसर्जन देखील झालेलं असतं. अर्थात या गोष्टीला काही अपवाद असतीलही पण फारच थोडे.
बहुतेक वेळा हे संकल्प स्वतःमध्ये बदल किंवा सुधारणा करण्याबाबतचे असतात. यावर्षी आम्ही तुम्हाला काही आर्थिक संकल्प पूर्ण करण्यासाठी एक लिस्ट देतोय, त्याचा तुमच्या यादीत नक्की समावेश करून घ्या –
1. स्वतःचा आणि घरातील प्रत्येक कमावत्या व्यक्तीचा त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 पट किमतीचा Term (Life) इन्शुरन्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काढून घ्या.
2. घरातील प्रत्येक व्यक्तीची मेडिक्लेम पॉलिसी काढा, यामध्ये आपल्या पालकांच्या पॉलिसीला पाहिलं प्राधान्य द्या.
तुमच्याकडे तुमच्या कंपनीने दिलेली पॉलिसी असली, तरीही प्रत्येकाची वेगळी पॉलिसी असणं फार गरजेचं आहे. टार्गेट डेट अर्थात जानेवारीचा पहिला आठवडा.
3. तुमचे मासिक उत्पन्न वजा सगळे EMI आणि सगळे खर्च केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते त्याच्या 80% रकमेची म्युच्युअल फंडात गुंतवणूक चालू करा. समजा तुमचे मासिक उत्पन्न 1 लाख आहे आणि EMI इतर सगळे खर्च (यामध्ये अगदी हॉटेल मध्ये जेवण्यापासून, थेटर मध्ये पिक्चर बघण्यापर्यत सगळे खर्च आले) जर 70 हजार असेल तर तुमची किमान 25 हजाराची म्युच्युअल फंडात SIP असलीच पाहिजे. आणि जर तेवढी नसेल तर नवीन वर्षात पहिल्या दोन महिन्यातच त्या टार्गेट पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा.
4. नवीन वर्षात मिळणाऱ्या बोनस किंवा पगारवाढीचा वापर होम लोन फेडण्यासाठी न करता गुंतवणूक वाढविण्याकडे करा. गुंतवणुकीला जेवढी लवकरात लवकर सुरुवात होईल, तेवढे लवकरात लवकर तुम्ही आपोआपच कर्जमुक्त होणार आहात.
5. क्रेडिट कार्डचा वापर गरजेपुरताच करा, कोणत्याही प्रकारचे क्रेडिट कार्ड लोन किंवा 10% पेक्षा अधिक व्याजदर असलेले पर्सनल लोन चालू असेल तर 2025 मध्ये ही लोन पूर्णपणे फेडून टाकायचा संकल्प तुमच्या यादीत वरच्या क्रमांकावर असायलाच पाहिजे.
6. तुमचा म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ दररोज रिव्ह्यू करणे बंद करा. म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला मॅरेथॉन सारखे समजावे, आपली सगळ्यात मोठी चूक असते की आपण म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला 100 मीटरची दौड समजतो आणि चुकीचे निर्णय घेतो. त्याला मॅरेथॉन समजा, ही मानसिकता तुमचा सगळ्यात मोठा फायदा करून देईल.
2 Comments
Good article
Very informative