‘व्हॉट्सएप’च्या कित्येक ग्रुप मध्ये प्रत्येक विकेंडला एक कॉमन प्रश्न फिरत असतो. “कुणी चांगला सिनेमा रिकमेंड करता का ? घरात आई आहे, मुलं आहेत. कुणी सर्वांसोबत बघता येईल असा कंटेंट सुचवतो का ?” असा नटसम्राटच्या तुफानाला घर मागण्यासारखा प्रश्न प्रत्येक फॅमिलीमॅन किंवा फॅमिलीवूमन आजकाल आपापल्या आधुनिक डिजिटल कळपात विचारत असते. मनोरंजनाची वाढलेली भूक भागवण्यासाठी म्हणा किंवा पैसे वाचवण्यासाठी म्हणा, प्रत्येकाच्या घरात आजकाल दोन-तीन ओटीटी प्लॅटफॉर्म हे विविध जॉनरची एंटरटेन्मेंट ट्रेन घेऊन उभेच असतात.
जाणकार प्रेक्षकांचं हे ठरलेलं असतं की, मी आज हा सिनेमा किंवा ही सिरीज बघणार. पण, बराच मोठा प्रेक्षकवर्ग आहे, ज्यांची परिस्थिती ही पहिल्यांदा सीएसएमटी स्टेशनवर गेलेल्या व्यक्तीसारखी होती. ज्याला नेमकं कोणत्या प्लॅटफॉर्मवर जाऊ ? कोणत्या ट्रेन मध्ये बसू ? याबद्दल क्लॅरीटी नसते. अभ्यास न करता मोबाईल विकत घेण्यासाठी दुकानात गेलेल्या लोकांसारखे हे ओटीटीवर सर्वांना एकत्र बसून बघता येईल अशा वयोगटानुसारच्या कंटेंटचा शोध घेतांना चाचपडत असतात. या लोकांचं काम थोडं सोपं करण्यासाठी आम्ही या लेखात ही माहिती संकलन करून आपल्या समोर ठेवत आहोत:
वयोगट 10 पर्यंत:
‘जंगल बुक’ ही सिरीज या वयोगटातील बालकांसाठी चांगला पर्याय असू शकतो. झी 5 वर उपलब्ध असलेली रुडयार्ड किपलिंग्ज यांच्या कथांवर आधारित ही सिरीज आहे. १९९० च्या दशकांत पालकांनी हा शो दूरदर्शनवर आवडीने बघितलेला आहे. मैत्रीचं महत्व, भीतीवर मात करणे आणि मोठ्यांचा आदर करणे हे तीन महत्वाचे संदेश असणारी ही सिरीज सर्वांना एकत्र बसून बघायला नक्कीच आवडेल.
‘मालगुडी डेज्’ हा आर.के. नारायणन यांच्या कथांवर आधारित शो देखील आपण १९९० च्या दशकांत बघितलेला आहे. अमेझॉन प्राईमने या त्या काळातील सिरीयल ला एका सिरीजच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. शंकर नाग यांचं दिगदर्शन असलेल्या या सिरीजमधील ‘स्वामी’ हे पात्र आपल्या वागणुकीतून प्रामाणिकपणा, मेहनत आणि एकनिष्ठता यांचा प्रत्यय देतो.
‘डोरा – द एक्सप्लोरर’ ही अमेझॉन प्राईमवर उपलब्ध असलेली सिरीज लहान मुलांना खेळता खेळता कसं शिकता येतं ? हे दाखवते. वस्तुंना मोजयचं कसं ? वाचायचं कसं ? आणि इतरांसमोर मांडायचं कसं ? हे आपल्या घरातील 7 वर्षांपर्यंतच्या बालकांना सहजपणे कळू शकतं.
‘ऑड स्क्वॅड’ ही नेटफलिक्सवरील लहान मुलांची सिरीज ही बालकांना त्यांच्या समोरील प्रश्न सोडवणे, टीमवर्कचं महत्व शिकवते. या सिरीजमध्ये चार मुलांची टीम ही त्यांच्याकडे आलेली प्रत्येक केस चिकाटीने सोडवत असते. आपल्या घरातील 5 वर्षांपासून पुढे असलेले बालक हे आपल्या पालकांसोबत बसून या सिरीजचा आनंद घेऊ शकतात.
वयोगट 11ते 18 पर्यंत:
‘सेक्स एज्युकेशन’ ही नेटफलिक्सवर उपलब्ध असलेली सिरीज ही या वयातील मुलांच्या मनात येणाऱ्या असंख्य प्रश्नांना सहजपणे उत्तर देऊ शकते. सिरीजमध्ये वापरण्यात आलेल्या विनोदी कंटेंटमुळे मुलांच्या निरागसतेवर परिणाम नाही याची काळजी घेण्यात आली आहे. नातेसंबंध, सहसंमती यावर भाष्य करणारा हा विषय आपल्या भारतात खूप दबक्या आवाजात बोलला जातो.
भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धतीत यावर मुलांना ज्ञान दिलं जायचं. पण, ब्रिटिशांनी ही पद्धत बंद केली ज्यामुळे भारतीय टीनेजर्स मध्ये याची क्रेझ अधिक वाढली आणि कित्येक अनुचित प्रकार घडले, घडत आहेत हे आपण बघतच आहोत. ‘ओएमजी 2’ या सिनेमाने प्रथमच या विषयावर उघडपणे भाष्य केलं. पालकांनी देखील सिनेमाचं कौतुक केलं. 4 भागातील ही सिरीज या वयातील मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांना आवश्यक ते शिक्षण देते आणि “या विषयावर विचार करणे म्हणजेच चुकीचं आहे” हा भारतीय विचार खोडून काढते.
वयोगट 19 ते 40 पर्यंत:
‘मैत्री’ हा या वयोगटातील मुला-मुलींच्या जीवनाचा प्रमुख विषय असतो. नव्यानेच कॉलेजमध्ये घेतलेलं ऍडमिशन, तिथे झालेले नवे मित्र, मैत्रिणी यामुळे ही पिढी एका वेगळ्याच आनंदात वावरत असते. या वयोगटातील मुला मुलींनी हिंदी मधील सुशांत सिंगचा ‘छिछोरे’ हा सिनेमा अवश्य पहावा. मित्रांच्या एका ग्रुपमध्ये एक मित्र हा भावनिक असू शकतो, तर एक डोक्याने विचार करणारा प्रॅक्टिकल असू शकतो, एखादा विनोदी असू शकतो. मैत्रीचे हे सर्व फ्लेवर्स या वयात दिसत असतात, आवडत असतात.
‘फ्रेंड्स’ ही नेटफलिक्सवरील सिरीज देखील या वयोगटातील मुला मुलींना आवडू शकते. न्यूयॉर्क शहरात रहाणाऱ्या 6 मित्रांची असलेली ही कथा जरी 1994 ची असली तरीही त्यातील विनोदी, रिलेट होईल असा कंटेंट हा आजही रिलिव्हन्ट आहे. आयएमडीबी रेटिंग – 8.
‘स्ट्रेंजर थिंग्ज’ ही नेटफलिक्सवरील सिरीज देखील या वयातील मुलांना नक्कीच आवडू शकते. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या 6 मित्रांच्या ग्रुपला त्यांच्या शहरात काहीतरी विचित्र घटना घडत आहेत असं दिसतं. त्यातील 4 मित्र हे डेअरिंग करून या घटनांचा पाठलाग करतात. या प्रवासात त्यांना अकल्पित अशा घटना घडतात आणि ही सिरीज उत्कंठा वाढवते. आयएमडीबी रेटिंग – 8.7
वयोगट 41 ते 70 पर्यंत:
‘द ऑफिस यूएस’ ही नेटफलिक्सवरची सिरीज या वयातील लोकांना चांगली क्लिक करू शकते. ऑफिसमध्ये जाऊन काम करणाऱ्या लोकांचे प्रश्न, ऑफिस पॉलिटिक्स, कामाच्या वेगवेगळ्या पद्धती या सर्वांवर या सिरीजने बारकाईने प्रकाश टाकला आहे. विनोदी अंगाने सादर केलेल्या आणि आपल्या आजूबाजूला दिसतील अशी पात्र निवडलेल्या या सिरीजला आयएमडीबीवर 9 ची रेटिंग मिळालेली आहे.
जुना ‘क्लासिक सिनेमा’ हा या वयोगटातील लोकांना आकर्षित करू शकतो. ओटीटी आणि युट्युबवर असे बरेच सिनेमे आहेत ज्यांचं आपण केवळ नाव ऐकलेलं असेल किंवा कुठेतरी त्यावर व्यक्त झालेलं मत वाचलं असेल. जसं की, गुलजार यांचा ‘ईजाजत’ हा सिनेमा सोशल मीडियावर बराच चर्चेत असतो. आपण हा सिनेमा युट्युबवर बघू शकता. “मेरा कुछ सामान…” हे गाणं असलेला हा सिनेमा थोडा संथ आहे; पण, त्यावेळी काळाच्या पुढचा असलेला हा सिनेमा ठराविक प्रेक्षकांना आवडू शकतो.
गुरू दत्त यांचे ‘प्यासा’, ‘कागज के फुल’ सारखे जीवनावर भाष्य करणारे सिनेमे हे या वयोगटातील व्यक्तींना बघण्यासाठी पर्याय असू शकतो. गुरू दत्त यांचं नाव इतक्या वर्षांनीही का सन्मानाने घेतलं जातं ? त्यांच्या सिनेमांचा ‘वर्ल्ड क्लासिक सिनेमा’ या श्रेणीत का स्थान देण्यात आलं असावं ? असे प्रश्न आपल्यालाही पडत असतील तर ऍमेझॉन प्राईमवर उपलब्ध असलेले हे सिनेमे आपण नक्कीच बघू शकता.
‘गॉडफादर’ हा वयस्कर डॉनचा सिनेमा देखील त्या सिनेमातील प्रभावी संवादामुळे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. अमेझॉन प्राईमवर हा सिनेमा उपलब्ध आहे. या सिनेमाची थीम केंद्रस्थानी ठेवून त्याच्या बऱ्याच भ्रष्ट नकला आजवर जगभरात झाल्या आहेत. पण, आपण जर चोखंदळ प्रेक्षक असाल तर हा ओरिजिनल सिनेमा आपण एकदा नक्कीच बघू शकता.
70 पासून पुढे ही पण यामध्ये एक कॅटेगरी होऊ शकते. पण, ती जनता ही प्रामुख्याने आधीच्या काळातील असल्याने त्यांचं सूत हे कोणत्या न कोणत्या डेली सोप्स किंवा न्यूज चॅनल्स यांच्याशी जुळलेलं असतं असा अभ्यास आहे म्हणून त्यांचा उल्लेख इथे केलेला नाहीये. मनोरंजनावर या व्यक्तींचा देखील तितकाच अधिकार आहे, फक्त त्यासाठी ते आपल्यासारखे ‘डिजिटल डिपेंडेंट’ नाहीयेत इतकाच काय तो फरक आहे. या लेखातील आमचा हा कंटेंट आपल्या उपयोगी पडेल अशी आम्ही आशा करतो.