परतवारी…

वारी, वारकरी आणि पंढरपूरचा विठोबा माहीत नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही. वारी सर्वांना माहीत आहे. पण ‘परतवारी’ माहीत असलेले लोक कमी आहेत. या लेखात ज्ञानोबा माऊलींच्या पालखीच्या परतवारीची ओळख करून घेऊयात.
[gspeech type=button]

महाराष्ट्रातील विविध गावागावांमधून संतांच्या पालख्या घेवून वारकरी साधारण वीस-बावीस दिवस पायी चालत आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरास पोहोचतात. आषाढी एकादशीच्या दिवशी सारे वारकरी पंढरपूरात चंद्रभागेच्या काठी भक्तीरसात न्हाऊन निघतात. पंढरपूरास एकादशी साजरी करून द्वादशीस पारणे सोडतात. यानंतर मात्र एकच लगबग सुरु होते. सारे वारकरी, बस, ट्रेन, टेम्पो, मिळेल त्या वाहनाने, आपापल्या गावी जाण्यास निघतात. एव्हाना पाऊस सुरु झालेला असतो त्यामुळे सर्वांचीच आपापल्या गावी परत जावून शेतीची कामे करण्याकडे ओढा असतो.  मात्र ह्या पोहोचलेल्या पालख्या कशा परत येतात?

 

ऐश्वर्यवारी ते वैराग्यवारी

काल्याच्या कीर्तनानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारनंतर सा-या संतांच्या पालख्या पायवारी करत परत आपापल्या मुक्कामी जाण्यास निघतात. ह्या परतीच्या प्रवासास ‘परतवारी’ असे म्हणतात. या वेळी मार्ग तोच असतो मात्र परतीचे मुक्काम कमी असतात. काही मुक्कामाची ठिकाणे, गावेही वेगळी असतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परतवारीचा वेग जातानाच्या वारीच्या वेगापेक्षा फार जास्त असतो. जाताना जशी जेवणा-खाण्याची, मुक्कामाची सोय होते तशीच परतताना होईलच असे नसते. किंबहुना नसतेच. वारकरी जमेल तसे, असेल त्या परिस्थितीत रहातात. परतवारी करताना वारकरी रोज पहाटे दोनच्या सुमारास निघतात आणि सूर्यास्तापूर्वी मुक्कामी पोहोचतात. परतीच्या वेळेस पाऊसही ब-यापैकी असतो.

सुधीर महाबळांनी वारी केल्यानंतर कुतुहलापोटी माऊलींची परतवारी केली. तेव्हा त्यांनी असे म्हटले आहे की, लाखो वारक-यांच्या जयघोषात जाणा-या पालख्या पहाताना जी ‘ऐश्वर्यवारी’ वाटते, तीच वारी परतताना मात्र जेमतेम काही शेकडा वारक-यांच्या साथीनं ‘वैराग्यवारी’ वाटते.

 

माऊलींची पालखीची परतवारी  

माऊलीचा रथ दोन बैलांनी ओढला जातो. रथाची संपूर्ण सजावट चांदीची आहे. पालखी रथातील खाचेत बसविली जाते. त्यात एका चांदीच्या तबकात पादुका ठेवल्या जातात. रथ जरी बैलच ओढत असले तरी 2013 पासून प्रथमच मोटर आणि गियरची सोय केली आहे. अवघड चढण आणि उताराच्या वेळी या मोटर व गियरमुळे बैलांची सोय होते.  रथाची बैलजोडी, त्यांचे मालक, छकडा, त्यातील वादक हे सर्व परंपरेने माऊलींचे सेवेकरी आहेत. रथाच्या पुढे 1 ते 27 क्रमांकाच्या दिंडी तर उरलेल्या दिंडी मागे असतात. क्रमांक असलेल्या दिंड्या अधिकृत आहेत. काही मान्यता मिळवायच्या मार्गावर आहेत. त्याशिवाय काही स्थानिक दिंड्याही समाविष्ट होतात.

 

आषाढ शुद्ध दशमीस पालखी आळंदीत

आळंदीची माऊलींची पालखीची परतवारी एकूण 10 टप्प्यात केली जाते. पहिला पंढरपूर ते वाखरीचा टप्पा एकूण 7 किलोमीटरचा, तर दुसरा वाखरी ते वेळापूर 25 किलोमीटरचा, तिसरा वेळापूर ते नातेपुते 32 किलोमीटर, चौथा नातेपुते ते फलटन 38 किलोमीटर, पाचवा फलटन ते पाडेगाव 33 किलोमीटर, सहावा पाडेगाव ते वाल्हे 15 मिलोमीटर, सातवा वाल्हे ते सासवड 30 किलोमीटर, आठवा सासवड ते हडपसर 20 किलोमीटर, नववा हडपसर ते पुणे 9 किलोमीटर, आणि शेवटचा दहावा टप्पा पुणे ते आळंदी 26 किलोमीटर, असा एकूण पालखीचा प्रवास असतो. ज्ञानोबांच्या पालखी परतवारी करुन आषाढ शुध्द दशमीस आळंदीत पोहोचावी अशी प्रथा आहे. त्यानुसार काही वेळा तिथीक्षयाचा हिशोब करुन पुण्यातील मुक्काम एक दिवस वाढवला जातो.

 

गुरुपौर्णिमेला पंढरपूराहून परतीच्या वाटेला

काल्याच्या कीर्तनानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारनंतर माऊलींची पालखी आणि अश्व पंढरपुरात रस्त्यावर आणतात. त्यांच्या दर्शनासाठी एकच झुंबड उडते. तुतारी फुंकली जाते. आरती होते आणि बॅण्डच्या सोबतीने पालखी पंढरपूराहून परत निघते. पंढरपूरच्या वेशीपाशी एक लहान विसावा घेतला जातो. आता मात्र सोबतीचा अश्व, बॅण्ड परत जातात. आणि पूर्ण आळंदीपर्यत एक टंबकड पालखी सोबत असतं. पहिला मुक्काम वाखरीत असतो. वाखरी गाव जरी लहान असलं तरी भक्तिमार्गात त्याला फार महत्व आहे. सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरात प्रवेश करण्यापूर्वी आणि पंढरपूरहून आपापल्या वाटेने परत जाण्यापूर्वी वाखरी गावात भेटतात. ऐश्वर्यवारीत येथे मोठे शेवटचे रिंगण असते.

 

परतवारीचा मुक्काम देवळांत, शाळेत

मधले सगळे टप्पे मजल दरमजल करित वेगाने पार पडले जाते. काही वेळा देवळांत तर काही वेळेस शाळांमध्ये मुक्काम असतो. ऐश्वर्यवारीची आठवणींना साद देत, ओळखीच्या ठिकाणांना, प्रंसंगांना आठवत, ओळखीच्या वारक-यांना साद घालत पालखी वेगाने आपल्या शेवटच्या टप्प्यात येते.

 

पुणे ते आळंदी टप्प्यात स्थानिकांचा सहभाग

पुणे-आळंदी हा परतवारीचा शेवटचा टप्पा. परतवारीची सांगता होण्याचा दिवस. पुण्यातील पालखी विठोबा देवळात माऊलींचा मुक्काम असतो. तिथून सकाळी दहा वाजता माऊलींची पालखी निघते. पुणे ते आळंदी ह्या शेवटच्या टप्प्यात फार गर्दी असते. पुण्यातील पुष्कळ स्थानिक ह्या टप्प्यात पालखीसोबत चालतात. मूळ परतवारीच्या संख्येत साधारण 25 टक्के वाढ होते. आजूबाजूला लोक दर्शनासाठी थांबलेले असतात. त्यामुळे पालखीचा वेग थोडा मंदावलेला असतो.

 

माऊलींची दृष्ट काढून आळंदीत

आळंदी गावाच्या बाहेर दोन किलोमीटर अलीकडे एक शेवटचा विसावा पालखी घेते. इथपासून पालखीला पुन्हा बॅण्डची सोबत असते. इथे माऊलीला ओवाळण्यात येतं आणि दॄष्ट काढली जाते. महिन्याहून अधिक काळ ज्ञानोबा माऊली घरापासून बाहेर असतात म्हणून परत घरी येताना दृष्ट. आळंदीतील वारक-यांची कुटुंबे ज्ञानोबांची, पालखीची, आपल्या नातेवाईकांची आतुरतेने वाट पहात असतात. इंद्रायणी नदीचा पूल पार करून पालखी देवळात जाते. प्रसाद, प्रवचन, भजन, काल्याचे कीर्तन होते आणि वारकरी आपापल्या घरी निघून जातात.

अशा प्रकारे एका भक्तिमय प्रवासाची सांगता होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

sports nutrition : पूर्वीच्या काळी सर्वांच्या घरी महागडं कोचिंग, ब्रँडेड बूट्स, बॅट्स किंवा जिमसारखी उपकरणं उपलब्ध नव्हती पण तरीही मेहनत
वि का राजवाड्यांच्या मते तत्पूर्वी इसवी सन 1659 मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळेसच कठिण प्रसंग टाळण्यासाठी मूर्ती माढे येते हलविली होती.
Andropause : एंड्रोपॉज हा शब्द पुरुषांमधील वयानुसार येणाऱ्या हार्मोनल बदलांसाठी वापरला जातो. वयोमानानुसार किंवा काही आजारांमध्ये टेस्टोस्टेरॉन (Testosterone) या पुरुष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ