मुस्लिम मुली/ महिला म्हणलं की पहिली इमेज काय येते आपल्या डोळ्यासमोर? बुरख्यात लपेटलेली बाई?!! पण याच इमेजला छेद देणाऱ्या आणि वयवर्षे 16 ते 22 वयोगटातल्या हिंदू- मुस्लिम तरूणी एकत्र फुटबॉल खेळतायत. एवढंच नाही तर, त्यांनी 900 जणींच्या सह्या एकत्र करत मुंब्र्यात मुलींसाठीचे स्वतंत्र मैदान असावे अशी मागणी केली. आणि ठाण्याच्या तत्कालीन कमिशनरांनी ती मान्य सुद्धा केली. फक्त मुलीसांठी राखीव असलेलं महाराष्ट्रातलं पहिलं मैदान ठाण्यातल्या मुंब्रा इथे आरक्षित झालं. हे सगळं घडवून आणणारी संस्था आहे, ‘परचम’ आणि त्याच्या संस्थापक आहेत स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या सबाह खान.
पूर्वग्रह तोडणाऱ्या ‘परचम’ची स्थापना
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मास्टर्स इन सोशलवर्क झालेल्या सबाह खान यांनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी, महिलांच्या जाणीव जागृतीसाठी केलेली वेगवेगळी कामं पाहिली की फार समाधान वाटतं. ‘परचम’ या संस्थेच्या स्थापनेबद्दल त्या सांगतात, “आम्ही समविचारी मैत्रिणी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतच होतो, आम्हांला हिंदू मुस्लिम महिलांना एका व्यासपीठावर आणणारे, त्यांच्यात मैत्री जागवणारं, धार्मिक भेदभाव खोटे आहेत हे सिद्ध करणारं काहीतरी घडवायचं होतं. याचदरम्यान ‘मॅजिक बस’ नावाच्या संस्थेने आमच्यासोबत काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. मॅजिक बस मुलींना फुटबॉलचे औपचारिक प्रशिक्षण देतादेता महिलांची ताकद, त्यांची आत्मओळख, आर्थिक स्वायतत्तेची गरज अश्या अनेक बाबींवर काम करतं. माझ्या दृष्टीने ही सुवर्णसंधी होती. कारण मुस्लिम महिला म्हणजे बुरख्यात राहणाऱ्या, स्वत:चा आवाज नसणाऱ्या मुली हा ‘स्टिरिओटाईप’ मोडायची उत्तम संधी या फुटबॉलद्वारे मिळणार होती. कारण फुटबॉल हा मोकळ्या मैदानावर खेळायचा खेळ आहे. स्टिरिओटाईप मोडण्यासोबतच सार्वजनिक जागेवरचा महिलांचा अधिकार प्रस्थापित करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम याद्वारे होणार होतं. कारण शालेय वय संपल्यानंतर मोठ्या झालेल्या मुली मैदानात खेळताना क्वचितच दिसतात. शहरात मैदानं ही तर पुरूषांचीच मक्तेदारी असते. बाहेर मोकळ्या जागेत खेळता खेळता मुलींचा आत्मविश्वास वाढायला लागला. आणि मला हे काम फक्त मुस्लिम मुलींसोबत करायचं नव्हतं यातून त्यांना सर्वधर्मसमभावही शिकवायचा होता. त्यामुळे फुटबॉल खेळता खेळता स्त्री पुरूष भेदभाव, आपल्यात असलेली ताकद, स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं महत्त्व, इतर जातीधर्माच्या लोकांसोबत मिळून मिसळून राहण्याचं महत्त्व अश्या अनेक बाबी अनौपचारिकरित्या शिकवल्या जाऊ लागल्या आणि 2012 साली परचम संस्थेचा जन्म झाला.”
सर्वधर्मिय मुलींना फुटबॉल प्रशिक्षण
परचम या संस्थेद्वारे सध्या मुंब्रा, धारावी, मानखुर्द अश्या वेगवेगळ्या ठिकाणी फुटबॉलची प्रशिक्षणं दिली जातात. यातून सर्वधर्मीय मुली, महिला खेळाचा आनंद लुटतात. दरवर्षी त्यांचा एक निवासी कॅम्प पण असतो आणि त्यात वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुलींची जाणीवपूर्वक एकत्र निवास व्यवस्था केली जाते. त्यातून या मुलींना आपल्या जातीधर्माच्या बाहेरच्या वेगळ्या मैत्रिणी मिळतात आणि इतर धर्मियांविषयीचे त्यांचे गैरसमज कमी होतात. आवर्जून नोंद करण्यासारखी बाब अशी की, मुंब्रामधल्या तीन मुली परचमच्या प्रयत्नातून फुटबॉलच्या डी लायसन्सड कोच बनलेल्या आहेत. यात फक्त खेळाचेच प्रशिक्षण नाही तर शिक्षणाचे महत्त्व, उत्तम आरोग्याचे महत्त्व, देशात चाललेल्या सामाजिक घडामोडींवर चर्चा आणि एकूण व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो.
सुधारणावादी मुस्लीम व्यक्तींची माहिती देणारी पुस्तकं
एकूणच देशात हिंदू मुस्लिम समाजात पडत चाललेली दरी सबाह यांना अस्वस्थ करते. मुस्लिमांकडे कायम संशयाच्याच नजरेतून पाहिलं जाणं, त्यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणं हे कोणत्याही सुजाण नागरिकाइतकं त्यांच्यासाठीही त्रासदायक ठरतंय. याचाच एक प्रयत्न म्हणजे ‘परचम’द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेलं पाच विषयांचं नोटबुक- डायरी. डायरी मध्ये अतिशय मोलाचं काम करणाऱ्या पाच भारतीय मुस्लिम महिलांची ओळख आहे आणि तुमच्या अभ्यासासाठी, नोटससाठी कोरी पानंही आहेत. यात आहेत सावित्रीबाई फुलेंसोबत भारतात स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमाबी शेख, भारतीय संविधाननिर्मिती मंडळाच्या एकमेव महिला सदस्य आणि ऑल इंडिया वुमन्स हॉकी असोसिएशनच्या अध्यक्ष बेगम कुदसिया अहजाज रसूल, कोलकात्यात 1911 साली मुस्लिम मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या समाजसेविका लेखिका रूकैय्या सखावत हुसैन अश्या अनेकींची ओळख या डायरीतून होते.
यासोबतच ‘द क्वीन, द कोर्टिसन, द डॉक्टर, द रायटर’ हे मुलभूत काम करणाऱ्या 50 भारतीय मुस्लिमांवरचं सबाह खान लिखित पुस्तकसुद्धा मुळातून वाचावं असंच आहे. , भारत औषधांसाठी कधीच इतर देशांवर अवलंबून राहू नये या राष्ट्रभावनेने सिप्ला कंपनीची स्थापना करणारे डॉ. ख्वाजा अब्दुल हमीद, 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन फासावर गेलेल्या कानपूरच्या अजिजून निसा, दिल्लीच्या पहिल्या मुस्लिम शासक रजिया सुलताना, ट्रिपल तलाकला विरोध करणाऱा भारतातील सहा मुस्लिम महिलांचा पहिला मोर्चा मंत्रालयावर नेणाऱ्या मेहरून्निसा दलवाई, शाहीर अमर शेख, हमीद दलवाई यांच्यासह अनेकांच्या कामाची ओळख या पुस्तकातून होते.
मुस्लीम महिलांना स्वतःचे चार क्षण मिळवून देणारं ‘गुफ्तगू’
डायरीच्या प्रती विकून सबाह यांनी ‘फातिमाबी सावित्रीबाई टुर्नामेंट ही महिलांसाठीची फुटबॉलची स्पर्धा सुरू केली. यासोबतच त्यांनी सावित्री फातिमा फाऊंडेशन ही महिलांच्या सर्वांगिण विकासासाठीची संस्थाही त्यांनी सुरू केली. या संस्थेचा अतिशय युनिक असा उपक्रम म्हणजे 20 फेब्रुवारी 2024 रोजी मुंब्र्यात महिलांसाठी उभी केलेली ‘गुफ्तगू’ ही स्वतंत्र जागा. मुंबईसारख्या ठिकाणी घरं अतिशय छोटी असतात, नोकरी न करणाऱ्या, गरीब विवाहित स्त्रियांना घराबाहेर पडण्यासाठी थोडक्याच जागा आणि संधी असतात उदा. बाजार, मुलांना शाळेत सोडणं, किराणा आणणं इतक्याच. आपल्याकडे अजूनही महिलांनी सहज म्हणून बाहेर पडून एकटीने चहा- ज्यूस पिऊन यायची, हॉटेलिंग अथवा सिनेमाला जायची पद्धत नाही. कनिष्ठ आर्थिक स्थितीतल्या महिलांना तर हे परवडणारंही नसतं. अश्या वेळी महिलांना फक्त गप्पा मारायला, पाय पसरून बसायला, छोटी डुलकी काढायला, मनातली खदखद मैत्रिणींसोबत शेअर करायला एक जागा हवी आणि तीच जागा म्हणजे मुंब्र्यात उभं केलेलं गुफ्तगू. फरहत अली आणि रश्मी दिवेकर यांच्या पाठिंब्याने – मारिवाला हेल्थ फाऊंडेशनच्या आर्थिक मदतीतून सबाह यांनी हे गुफ्तगू उभारलं आहे. इथं महिलांना थंडी- पावसाळ्यात चहा, उन्हाळ्यात थंडगार कोकम सोडा मिळतो. इथं झेंगा, चेस, कॅरम आहे, पुस्तकं आहेत, टीव्ही आहे. महिला एकत्र येऊन गप्पा मारतात, सुख- दु:खं शेअर करतात, पाणीपुरी पार्टी करतात. पण महिलांनी असे एकत्र येणे घरातल्यांना खटकू लागले, म्हणून इथं महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याच्या छोट्या व्यवसायांचे प्रशिक्षणही सोबत दिले जाते, जसं की शिवणकाम, मेहंदी, हस्तकला इ. त्या निमित्ताने महिला घराबाहेर पडू शकतात आणि अर्थातच उत्तम शिवणकाम आणि कलाकुसर यातही त्या चुणूक दाखवत आहेत, त्याचीही प्रदर्शने आयोजित केली जातात आणि उत्पादनांच्या विक्रीतून कमाईही केली जाते.
हेही वाचाः बंद डोळ्यांनी पाहिलेली स्वप्नं साकारताना!!
आधुनिक निकाहनामा आणि महिला काझी
सबाह खान यांचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे आधुनिक निकाहनामा तयार करण्यातलं त्यांचं मोलाचं योगदान. मुस्लिम वुमन राईटस नेटवर्कच्या नूरजहां आणि इतर सदस्यांसोबत 2000 सालाच्या आसपास त्यांनी हे काम केलंय. मुस्लिम धर्मात विवाह हा करार असतो, आणि लग्न होताना हा निकाहनामा तयार करून वाचला जातो आणि वधू वर त्याला मान्यता देतात. पूर्वीच्या काळी (अजूनही अनेक ठिकाणी) हा निकाहनामा अत्यंत मूलभूत आणि फार वरवरच्या गोष्टींचा असतो जसं की अमुकअमुकशी लग्नाला माझी मान्यता आहे, माझ्या वधूला मेहेर म्हणून 5000/10000 रू. मी देतोय यापलीकडे यात फारसे काही नसते. शिवाय अनेकदा हा मेहेरसुद्धा केवळ निकाहनाम्यात लिहिला जातो प्रत्यक्षात तो त्या वधूला मिळत नाही. उलट तिच्याकडून तो माफ करवून घेतला जातो. अश्या वेळी सबाह आणि सहकाऱ्यांनी मेहेर तुटपुंजा नको, तो वधूला दिलाच जावा, भविष्यात घटस्फोट घेण्याची वेळ आली तर त्याची कारणं काय असावीत, तो एकतर्फी पुरूषाकडूनचा तिहेरी तलाक नको, घटस्फोटाचा अधिकार महिलेलाही हवा, घटस्फोट झाल्यास मुस्लिम महिलेला पोटगी मिळावी अशी अनेक आधुनिक कलमं त्या निकाहनाम्यात टाकली होती. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला हा निकाहनामा अतिशय खटकला. आणि त्यांनी पुन्हा अतिशय मागास, महिलांवर अन्याय करणाऱा निकाहनामा तयार करून, मुस्लिम वुमन राईटस नेटवर्कच्या कामाला विरोध केला. त्यावेळी एक पत्रकार परिषद घेऊन या वीरांगनांनी तो निकाहनामा फाडला होता. आणि स्थानिक काझींच्या सहकार्याने यांनी तयार केलेल्या आधुनिक निकाहनाम्याद्वारे लग्नं लावली, इतकंच नाही तर काही मुस्लिम महिलांनाही काझी म्हणून प्रशिक्षण दिलं होतं.
सबाह खान यांचा भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास आहे, आणि प्रत्येकाला आपापल्या धर्म, जात, लिंग, आर्थिक परिस्थिती याच्या पलीकडे जात प्रगतीची, समानतेची आणि उत्तम दर्जाचे आयुष्य जगण्याची संधी मिळायला हवी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
हेही वाचाः फरिदा लांबे यांचं शिक्षणाशी जुळलेलं समीकरण!