महाराष्ट्रातील ठाकर समाजाने जतन केलेली आणि जोपासलेली एक महत्त्वपूर्ण लोकचित्रकला म्हणजे चित्रकथी. यात चित्रांचा वापर करून विविध कथा सांगितल्या जातात.
आख्यानांच्या चित्रांची पोथी
ठाकर आदिवासी त्यांच्या विशिष्ट्य शैलीत नैसर्गिक रंगाने विविध आख्यानांना अनुसरून, प्रसंगानुरूप आणि कथानकाच्या घटनाक्रमाने चित्रे काढतात. 15 इंच लांब आणि 12 इंच रुंद आकाराच्या कागदाच्या दोन्ही बाजूस ही चित्र असतात. अशा प्रकारे प्रत्येक आख्यानांच्या चित्रांची एक पोथी तयार होते. ठाकर आदिवासी कलावंत विविध गावातील विविध मंदिरात अशा पोथींच्याच आधाराने चित्रकथीचा खेळ करतात. त्यामुळे कथा सादरीकरणाला ठाकर कलावंत ‘पोथी सोडणे’ म्हणतात. एका सादरीकरणात मुख्य कलाकार आणि दोन सहकलाकार असे तिघे जण असतात. चित्रकथी सादर करणारे कलाकार सचित्र पोथ्या घेऊन गावोगाव हिंडतात आणि रात्रीच्या वेळेस देवळाच्या आवारात चित्रकथीचे कार्यक्रम सादर करतात.
संगीतवाद्यांची साथीने चित्रकथी सादर
सादरीकरणादरम्यान मुख्य कलाकार मांडी घालून बसतो. स्वतःच्या मांडीला टेकवून एक आयताकार फळी उभी करतो. उजव्या बाजूला पोथी ठेवलेली असते. पोथीतील एकेक चित्र फळीवर ठेवत तो कथन करतो. कथानकाच्या आवश्यकतेनुसार गाणी म्हणतो. साथीदार टाळ, हुडूक (डमरू), एकतारी इत्यादी वाद्ये वाजवत त्याला साथ देतात. कागदावर पाठपोट चित्रे असल्यामुळे एका चित्राचे निरूपण संपले की, पाठीमागील चित्राचे निरूपण सुरू होते. निरूपणाची भाषेत बोली भाषा, शुद्ध मराठी व संस्कृतप्रचुर शब्द यांचा संगम असतो. अशा प्रकारे चित्रण आणि कथन हे या कलेचे दोन महत्वाचे भाग आहेत. त्यामुळे सर्वार्थाने ही कला दृक्श्राव्य म्हणायला हवी.
सध्या फक्त दोनच गावांमध्ये चित्रकथी टिकून
असे म्हणतात की पूर्वी पुणे, वाई, नाशिक, धुळे इत्यादी विविध ठिकाणी चित्रकथी सादर करणारे कलाकार होते. पण आता मात्र कालौघात तेथील परंपरा लुप्त झाली आहे. सध्या केवळ पिंगुळी आणि पैठण ही दोनच ठिकाणे चित्रकथीसाठी आपलं नाव टिकवून आहेत. त्यातही औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये सध्या ही कला जोपासणारे कुणीही नाही. इथं केवळ चित्रे मिळाली आहेत. तसेच पैठण शैलीची काही चित्रे विविध संग्रहालयात आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात मात्र ही लोकचित्रकला अद्यापही अस्तित्वात आहे. परंपरा जरी सारख्या असल्या तरी अभ्यासकांच्या मते ह्या दोनही चित्रांच्या शैली एकमेकींशी मिळत्याजुळत्या नाहीत.
रामायण, महाभारतासोबत समकालीन विषयांवर चित्रकथी
चित्रकथीची चित्रे रामायण, महाभारत आणि पौराणिक कथांवर आधारीत असतात. क्वचित स्थानिक लोककथांवर आधारित पोथ्याही आढळल्या आहेत. काही वेळेस मिथककथेच्या आधाराने आख्यानादरम्यान अनेक समकालीन विषयांनाही स्पर्श केला जातो. पिंगुळीतील ठाकर आदिवासींकडे जतन केलेल्या पोथ्यांत रामायण, महाभारतातील अनेक आख्याने तसेच डांगीपुराण, नंदीपुराण, जालंदर – वध, कपिलासूर अशी अनेक आख्याने आढळतात.
18 व्या शतकातील पदे, कवने आणि संवादांचे मौखिक परंपरेने जतन
आख्यानातील पदे, कवने आणि संवाद मात्र मौखिक परंपरेने जतन केलेली आहेत. विविध संग्रहालयांतील चित्रकथीच्या चित्रे, कागदाचा आकार, त्यांवरील छापाचे ठसे यांवरून ती अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणिसावे शतक या काळातील असावीत असे काही तज्ञांचे मत आहे. पोथीचा काळ, रंगसंगती, चित्रकार आणि त्याची शैली यांमध्ये व्यक्तिसापेक्ष तसे कालानुरूप फरक पडलेला दिसून येतो.
ठसठशीत, लयदार स्वतंत्र चित्रशैली
पैठण व पिंगुळी चित्रकथी परंपरेच्या उगमाविषयी विशेष सबळ पुरावा उपलब्ध नाही. भारतीय लघुचित्रपरंपरा, स्थानिक परंपरा आणि दाक्षिणात्य चामड्याची लोकचित्रे यांच्या समन्वयाने प्रस्तुत चित्रशैली विकसित झालेली असावी, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. चित्रकथीमधील आकार ठसठशीत आणि लयदार रेषांनी युक्त असतात. आकारांना ठळक बाह्यरेषा दिलेली असते. बहुतांश चित्ररचना आडव्या असतात. कथेशी निगडित निसर्गचित्रणाचे बारकावे या चित्रांत सहसा आढळत नाहीत. चित्रांतील घटनेची पार्श्वभूमी आख्यानादरम्यान सांगितली जात असल्याने असे बारकावे चित्रांत अपवादानेच दाखवले जातात. कथेच्या अनुषंगाने अगदीच अत्यावशक झाडे, प्राणी मात्र चित्रित केले जातात. या चित्रांच्या वर अथवा खाली किंवा दोन्ही बाजूंना सरळ, वक्र रेषांचा वापर करून पट्ट्या रंगवलेल्या दिसतात. व्यक्तिचित्रणात कपाळ रुंद, नाक टोकदार आणि कान दुहेरी वक्र रेषांनी दाखवलेले दिसतात. चेहरा व पाय बाजूने तर उर्वरित शरीर समोरून रेखाटलेले असते. या शैलीमध्ये डोळा मोठा व गोलाकार आणि संपूर्ण बुबूळ दिसते. चित्रांतील पुरुषप्रतिमा बलवान, रुंद खांदे व छाती, अरुंद कंबर तर स्त्रीप्रतिमा विविध आभूषणांनी नटलेल्या दिसतात. पैठणशैलीची प्रतिमांकन करण्याची, डोळा व इतर बारकावे दाखवण्याची पद्धत कर्नाटकातील छायाबाहुलीशी साधर्म्य दर्शविते. लाल, गुलाबी, हिरवा, निळा, पिवळा हे रंग प्रामुख्याने वापरलेले दिसतात. काही चित्रांत मानवाकृतींच्या वस्त्रांवर उभ्या, आडव्या रेषा अथवा पानाफुलांच्या नक्षीचे अलंकरण दिसते. कथानकानुसार वैचित्र्यपूर्ण प्राणी, राक्षस यांच्या शरीरावर केस, त्वचा यांचे पोत दिसतात.
पैठण शैलीतील चित्र केवळ संग्रहालयतच
राजा दिनकर केळकर संग्रहालयात पैठणशैलीतील चित्रकथींचा संग्रह आहे. शिवाय काही चित्रकथीच्या पोथ्या ब्रिटिश संग्रहालय, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथेही जतन केलेल्या आहेत. सध्याच्या काळात पैठण शैलीची मौखिक परंपरा लुप्त झालेली आहे.
कुडाळमधील पिंगुळीत केवळ एकच कलाकार कुटुंब टिकून
मात्र पिंगुळीतील चित्रकथी परंपरा अजूनही जोपासली गेली आहे. पिंगुळीत पूर्वी चित्रकथी सादर करणारी दहा-बारा कुटुंबे होती. मात्र कालौघात केवळ एकच कुटुंब उरले आहे. पिंगुळीतील आदिवासी ठाकर कलावंत परशुराम गंगावणे आणि त्यांचा परिवार. यांच्या कुटुंबात परंपरेने चित्रकथी बनवली आणि सादर केली जायची. चित्रकथीला सावंतवाडी संस्थानाकडून मिळालेला राजाश्रय हेही ही कला जतन होण्यामागचे एक मुख्य कारण आहे. 12 बाय 18चा पेपर सुरुवातीला सावंतवाडीच्या खेमराज सावंत महाराजांनी गंगावणे कुटुंबाला बनवून दिला होता. पुढील काळात राजाश्रय संपल्यानंतर गंगावणे कुटुंबाला हळूहळू कला जोपासणे कठिण होवू लागले.
परशुराम गंगावणे यांचा ‘पद्मश्री’नं सन्मान
नंतरच्या काळात मात्र कुडाळच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये दरवर्षी चित्रकथीच्या सादरीकरणाचा मान त्यांना देण्यात आला. पुढे मात्र परशुराम गंगावणेंनी ही कला अखंड जोपासली. त्यांच्या या योगदानाबद्दल 2021 साली त्यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. जुन्या चित्रकथीचे दस्तऐवजीकरण व संशोधन आणि कला जतन करण्याच्या हेतूने परशुराम गंगावणे यांनी ‘ठाकर आदिवासी कलांगणʼ संग्रहालयाची स्थापना केली आहे. त्यादारे पर्यटकांसाठी चित्रकथी आणि बोलक्या बाहुल्यांचे खेळ सादर केले जातात. परशुराम गंगावणेंनी त्यांची कला मर्यादित न ठेवता अनेक शिबिरे आयोजित करून कलेच्या अभ्यासक, विद्यार्थी आणि दर्दी यांच्यापर्यंत पोहोचवली आहे.