बी-बियाणे उद्योगाची भूमिका व योगदान  

Agriculture Insiders : बी-बियाण्यांच्या उद्योगासह अन्नधान्याचे उत्पादन ही वाढलं. तसंच बियाण्यासाठी पिकाची लागवड करण्याचं प्रमाणसुद्धा लक्षणीयरित्या वाढलं आहे. या दोन्ही उद्देशांसाठी पिकांची लागवड करणं जवळपास समप्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च दर्जाचे बियाणे वापरुन पिकांची लागवड करण्याचं प्रमाणसुद्धा वाढवलं.
[gspeech type=button]

भारतातील बी-बियाणे उद्योगाची गेल्या पाच-सहा दशकांमधील प्रगती कौतुकास्पद आहे. 1960 च्या दशकात देशातील संपूर्ण बी-बियाणे उद्योग मिळून साधारणपणे 1 लाख क्विंटल बियाणे हाताळत असे. तेव्हापासून त्यामध्ये शंभर पट वाढ होऊन आता ते प्रमाण सुमारे 100 लाख क्विंटल इतकं झालं आहे. यावरून या क्षेत्राची किती झपाट्याने वाढ झाली आहे हे लक्षात येते. 

बी-बियाण्यांच्या उद्योगासह अन्नधान्याचे उत्पादन ही वाढलं. तसंच बियाण्यासाठी पिकाची लागवड करण्याचं प्रमाणसुद्धा लक्षणीयरित्या वाढलं आहे. या दोन्ही उद्देशांसाठी पिकांची लागवड करणं जवळपास समप्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च दर्जाचे बियाणे वापरुन पिकांची लागवड करण्याचं प्रमाणसुद्धा वाढवलं. शेतीमधील उच्च दर्जाच्या उत्पादनाचं तंत्रज्ञान जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अन्य कोणत्याही कृषी निविष्ठांपेक्षा उच्च दर्जाच्या बियाण्यांमार्फत उत्तम प्रकारे होऊ शकते. यासाठी बियाणे उद्योगाची जी संपूर्ण यंत्रणा कार्यरत असते, त्यामध्ये सरकारी यंत्रणा, सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचा समावेश होतो. त्यांचे योगदान काय असते ते पाहू.  

सरकारी यंत्रणा : 

सरकारी यंत्रणेचे प्रमुख योगदान म्हणजे बियाणे उद्योगाशी संबंधित कायदे आणि नियम बनवणे. (उदा. देशातील बियाणे निर्मितीपासून विक्रीपर्यंत सर्व बाबींचे नियंत्रण करणारा Seeds Act, 1966 हा कायदा). त्यामार्फत बियाणे उद्योगावर नियंत्रण ठेवणे, वैयक्तिक उद्योजक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देणे, उद्योगांना पोषक अशी धोरणे राबवणे.

सार्वजनिक क्षेत्र : 

सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादक संस्था या प्रामुख्याने प्रति किलो किंमती कमी असलेली पण मोठ्या प्रमाणात लागणारी बियाणी (low value high volume seeds) निर्माण करतात आणि विकतात. त्यांचं योगदान मुख्यत: स्वस्त धान्य दुकानात मिळणाऱ्या धान्याच्या बियाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात असते. उदा. अन्नधान्य पिके, भरड धान्ये, डाळी आणि काही गळीत पिके. यामार्फत सर्वसामान्य जनतेच्या अन्नधान्याच्या गरजा पुरवण्यासाठी, लहान आणि अल्पभूधारक शेतकरी जी शेती करतात त्यासाठी लागणारी बियाणी रास्त भावात पुरविण्याचे काम करतात. 

खाजगी क्षेत्र : 

खाजगी क्षेत्रातील बियाणे उत्पादक कंपन्या प्रामुख्याने प्रति किलो किंमती जास्त असलेली पण तुलनेने कमी प्रमाणात लागणारी बियाणी (high value low volume seeds) निर्माण करतात आणि विकतात. उदा. भाजीपाला, फुलशेती पिके. यामार्फत अधिक उत्पन्न मिळवून देणारी पिके, निर्यातक्षम पिके, बागायती पिके यासाठी लागणारी बियाणी पुरवण्याचे काम केलं जाते. ज्यामधून आधुनिक पद्धतीने शेती करून समृद्धीच्या वाटेवर जाऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य प्रकारचे बियाणे पुरवले जाते.

हे ही वाचा : ओळख कृषीनिविष्ठा उद्योगांची!

बियाणे उद्योगांच्या विकासाचे ऐतिहासिक टप्पे

स्वातंत्र्यप्राप्तीपासून साठच्या दशकापर्यंत : 

स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास भारतातील बियाणे उद्योग असंघटित क्षेत्रात मोडत होता. साठच्या दशकाच्या सुरुवातीला, 1963 मध्ये ‘राष्ट्रीय बीज निगम’ (National Seed Corporation – NSC) ची स्थापना करून भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रात बियाणे उद्योगाची सक्षम यंत्रणा निर्माण केली. संपूर्ण बियाणे उद्योगाचा पाया याच कालावधीत रचला गेला. या संपूर्ण कालावधीत भारतातील बियाणे उद्योग मुख्यत: सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांपुरता मर्यादित होता. त्यामध्ये अन्नधान्य पिकांची बियाणी – सुरुवातीला सुधारित आणि नंतर उच्च उत्पादन देणारी संकरीत बियाणी (High Yielding Varieties – HYVs) – निर्माण करून ती शेतकऱ्यांना पुरविण्यावर भर दिला गेला. 

बियाण्यांची गुणवत्ता उच्च पातळीला राखण्यासाठी बीज प्रमाणीकरण करणे (Seed Certification Systems), बियाणे प्रक्रिया (Seed Processing), बियाणे तपासणी (Seed Testing) आणि गुणवत्ता चाचणी (Quality Control and Testing) अशा आवश्यक प्रक्रियांविषयीचे मापदंड याच काळात निश्चित केले गेले. त्यानुसार प्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणेच शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आवश्यक असलेली यंत्रणासुद्धा निर्माण केली गेली. भारतीय ‘हरित क्रांती’ची (Green Revolution) बीजे याच काळात रोवली गेली. 

हे ही वाचा  : उत्तम बीबियाणे: शेतीची पहिली गरज

सत्तरचे दशक : 

या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांव्यतिरिक्त खाजगी बियाणे कंपन्या उदयाला आल्या. त्यामुळे बियाण्याच्या उपलब्धतेत पिकांची विविधता वाढली. अधिक उत्पन्न मिळवून देणारी उद्यानविद्या पिके (Horticultural Crops), निर्यातक्षम पिके यांची बियाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे केवळ अन्नधान्य पिकांवर अवलंबून असलेला शेतकरी वर्ग उच्च उत्पन्न गटामध्ये जाण्यासाठी सक्षम झाला.

ऐंशीचे दशक : 

खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी नवीन संकरीत बियाणी, आयात केलेली बियाणी तसेच भारतीय परिस्थितीनुसार संशोधन करून तयार केलेली नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने बाजारात आणून अधिकाधिक बाजारपेठ व्यापली. या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन संस्थांमध्ये होणारे संशोधन हा खाजगी क्षेत्रातील कंपन्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा मुख्य स्रोत होता. 

नव्वदचे दशक : 

मुक्त अर्थव्यवस्था आणि त्यामुळे उपलब्ध होणारी आधुनिक संसाधने यांचा एकत्रित परिणाम म्हणून खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे संशोधन विभाग सशक्त झाले. अनेक परदेशी कंपन्यांशी करार करून त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित बियाणी भारतात आणण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. खाजगी कंपन्यांची बियाणी शेतकऱ्यांच्या शेतावर निर्माण करत त्यांच्यासाठी उत्पन्नाची नवीन संधी निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी हा बियाण्यांचा केवळ ग्राहक न राहता उत्पादकसुद्धा झाला.   

2000 सालापासूनचे दशक : 

नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाणी बाजारात आली. सुरुवातीला सुरक्षिततेच्या कारणांमुळे त्यांना खूप विरोध झाला. पण 8-10 वर्षांच्या प्रयत्नांनंतर बियाणे उद्योगाला तो विरोध कमी करण्यात यश आलं. बीटी कापूस बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले. ग्रीनहाऊस मधली शेती, फुलशेती, निर्यातक्षम शेती या गोष्टींना मोठ्या प्रमाणावर वाव देण्यात आला. या दशकाच्या शेवटापर्यंत भारतीय बियाणे उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे 5500 कोटी रुपये झाली.

2010 सालापासूनचे दशक : 

अनेक परदेशी कंपन्या भारतीय बियाणे उद्योगात जोमाने पुढे आल्या. संशोधन आणि विकास (Research and Development – R & D) घडवून आणण्यासाठी भारतीय आणि परदेशी कंपन्या एकत्रितपणे तंत्रज्ञान विकसित करू लागल्या. केवळ बियाणे उद्योग क्षेत्रातच नव्हे तर एकूणच कृषी निविष्ठा क्षेत्रातील व्यवसायाच्या प्रारुपामध्ये आमूलाग्र बदल घडू लागले. अनेक बियाणे उद्योग अन्य कृषी निविष्ठा विक्रीच्या क्षेत्रातसुद्धा येऊ लागले. त्यामधून शेतकऱ्यांना केवळ बियाणे, कृषी रसायने किंवा कुठली तरी एकच कृषी निविष्ठा पुरविण्याचे दिवस संपले. शेतकऱ्यांच्या सर्व गरजा भागवणारे संपूर्ण कृषी निविष्ठा पुरवणारे बिझनेस मॉडेल आकाराला येऊ लागले. या कालावधीत बियाणे उद्योगाने 10 हजार कोटी रुपये वार्षिक उलाढालीचा टप्पा ओलांडला.

सद्यस्थिती : 

सध्या भारतात बियाणे उद्योगाच्या उलाढालीचा सुमारे 90 टक्के भाग खाजगी क्षेत्रातील कंपन्या व्यापून आहेत. ज्यामध्ये सुमारे 500 खाजगी बियाणे कंपन्या कार्यरत आहेत. अनेक कंपन्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वापरुन शेतीमधील समस्या सोडवणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे अशा आधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. येत्या काळात जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञान यांचा ताळमेळ घालत नवीन बिझनेस मॉडेल उदयाला येऊ घातली आहेत. बियाणे उद्योगाने 25 हजार कोटी रुपये वार्षिक उलाढालीचा मोठा टप्पा ओलांडला आहे.

पुढील भागात आपण भारतीय बियाणे उद्योग क्षेत्रात असलेल्या खाजगी कंपन्या आणि त्यांना नियंत्रित करणारे बियाणे उद्योगाशी संबंधित नियम व कायदे यांची ओळख करून घेऊ.   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Fishery : मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय 22 एप्रिल रोजीच्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाच्या निर्णयाची
Mirzapur: महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येत असलेल्या नेरी मिर्जापुर या गावाने शाश्वत विकासाचे वेगवेगळे
Summer health care : उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेशी निगडित विकारांमध्ये फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे, आहारात

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ