“ज्यात चमक असते, त्यात धमक नसते. ‘जुनं ते सोनं’ हे वाक्य मनाशी घोळवत हे काळ्या मातीतलं सोनं मी जपलं आहे. आणि शक्य तितक्या लोकांच्या ताटात हे विषमुक्त अन्न पडावं हीच माझी इच्छा आहे”. ही वाक्यं आहेत, राहीबाई पोरे यांची. आपल्या या उद्देशाला साध्य करण्यासाठी पद्मश्री पुरस्कृत राहीबाई पोपेरे यांनी उत्तम दर्जाच्या बियाण्यांची बँक बनवली आहे. या बियाण्यांमध्ये भाज्या, धान्य, भरडधान्य यांचा समावेश आहे. या त्यांच्या कार्यामुळे त्यांना बीजमाता म्हणून संबोधलं जातं.
बालपणीच शेतीची जबाबदारी
अहिल्यानगरमधल्या अकोले तालुक्यातल्या कोंभाळणे या दुर्गम गावात 1964 साली राहीबाई यांचा जन्म झाला. सात बहिणी आणि एक भाऊ अशा मोठ्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सगळ्यात धाकटी बहीण नऊ महिन्यांची असताना राहीबाईंच्या आईंचा मृत्यू झाला. तेव्हा राहीबाई आठ – नऊ वर्षांच्या होत्या. घरातल्या इतर बहिणींसोबत लहानग्या बहिणींची राहीबाई ‘ताई’ बनून काळजी घेऊ लागल्या. वडील शेतकरी, हातावरचं पोट, दुर्गम गाव त्यामुळे शाळेत जाऊन त्यांचे कसलंच औपचारिक शिक्षण झालं नाही. पण वडिलांच्या हाताखाली शेतीची कामं त्यांनी सहज आत्मसात केली.
ऊसतोड कामगार
वयाच्या तेराव्या वर्षी सोमाजी पोपरे यांच्याशी त्यांचं लग्न झालं. सासरीही आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. राहीबाई यांनी चार मुलांना जन्म दिला. त्यांच्या सासरी जवळपास पाच एकर शेती होती. पण पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात पारंपरिक पिक घेतल्यानंतर उर्वरीत कालावधीमध्ये त्या लोकांची गुरं चारायला नेण्याचं काम करायच्या. आणि दसऱ्यानंतर ऊसतोडणीसाठी अकोले आणि संगमनेरला जाऊन तीन – चार महिने ऊसतोडणी कामगार म्हणून काम करत असत.
रोपं तयार करण्याचा छंद
या काळात राहीबाई आपला छंदही जोपासायच्या. रोपं तयार करणं, नवीन झाडं लावणं आणि बिया जमवणं हा त्यांच्या आवडता छंद. पावसाळ्याच्या सुरुवातीला हादगा, शेवगा, लिंबू, कढीपत्ता, पेरू इत्यादी रोपं तयार करून त्या अनेकांना मोफत वाटायच्या.
त्यावेळी त्यांच्या गावात काम करणाऱ्या ‘बायफ’ संस्थेने आम्हाला काही रोपं पुरवाल का, अशी चौकशी केली. आपल्या कामाचं मूल्य जाणल्यावर राहीबाईंनी स्वत:ची छोटीशी नर्सरी सुरू केली.
हे ही वाचा : सॅलेड क्वीन – शालिनी टेकाळे
हायब्रीड बियाणे, रासायनिक खतं आणि आरोग्याचे तीन तेरा
तोवर राहीबाईंची मुलं मोठी झाली. त्यांनी शेतीमध्ये नवे प्रयोग करायला सुरुवात केली. तत्कालीन परिस्थितीनुसार राहीबाईंचे कुटुंबीयही शेतीमध्ये हायब्रीड बियाणे आणि रासायनिक खतांचा वापर करु लागले. राहीबाईंचा याला विरोध होता. मात्र, त्यांना अडवता आलं नाही.
काही काळ गेल्यानंतर घरातल्या सदस्यांचे आणि गावकऱ्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागल्याचं त्यांच्या ध्यानात येऊ लागलं. ऋतू बदलला की पटकन सर्दी – खोकला, पोटदुखी, जुलाब, दमल्यासारखं वाटणं असे आजार व्हायला लागले. गावात बालकुपोषणग्रस्त मुलं दिसू लागली. तेव्हा राहीबाईंनी यावर सखोल विचार केल्यावर या आजारचं मूळ हायब्रिड बियाण्यांच्या वापरामध्ये असल्याचं त्यांना आढळलं.
त्या सांगतात की, “आपण हायब्रीडच्या नादी लागलो. जास्त पैसे कमावण्यासाठी भरमसाठ रासायनिक खतांचा वापर करतोय, यामुळे सत्त्व नसलेलं अन्न आपल्याला खावं लागत आहे. आपल्या बापजाद्यांची शिकवण आणि पीक पद्धत आपण सोडून दिली आहे. आपण पुन्हा जुन्या पद्धतीनेच शेती करायला हवी. देशी बियाणं वापरायला हवीत हाच याच्यावरचा उपाय आहे, हे मला उमगलं. मी घरी जाऊन घरातल्या लेक – सुनांना हे समजावलं, पण त्यांना ते काही पटलं नाही. सगळं जग हायब्रीड करतंय आणि आपण कशाला मागे राहायचं असं त्यांना वाटून त्यांनी मला वेड्यातच काढलं.”

देशी बियाण्याच्या वापराला दुजोरा
त्यातच राहीमावशींचा नातू काविळीने आजारी पडला, गावात फारशी सोय नसल्याने आधी संगमनेर मग अहिल्यानगर आणि मग तर दोनेक महिने नाशिकला नेऊन नातवावर उपचार करावे लागले. या सगळ्यात सव्वा ते दीड लाखाचा खर्च झाला. दुभत्या गायी – म्हशी विकाव्या लागल्या. या घटनेनंतर राहीमावशीच्या निर्णयावर कुटुंबानेही शिक्कामोर्तब केलं की आता- नैसर्गिक, सेंद्रिय पद्धतीने पारंपरिक पिकांचीच शेती करूयात.
राहीमावशींच्या मार्गदर्शनाखाली नाचणी, सावा, वरई, पारंपरिक पालेभाज्या आणि कडधान्यांची पेरणी त्यांच्या शेतात झाली. या सगळ्या काळादरम्यान राहीमावशी देशी बियाणे जमवतच होत्या.

‘बीजमाता’ उपाधी
एकदा त्या त्यांच्या घराच्या ओट्यावर ही बियाण्यांची गाठोडी घेऊन बसल्या होत्या. ‘बाएफ’ संस्थेचे साठे सर त्यांच्या गावात आले होते. त्यांनी राहीमावशीकडे गाठोड्याबद्दल विचारणा केली. तेव्हा राहीमावशींनी ही सगळी देशी पारंपरिक बियाण्यांची जमवलेली गाठोडी असल्याचं सांगितलं.
साठ – सत्तर पेक्षा वेगवेगळी बियाणी कोणत्याही दुकानातून विकत आणलेलं नसून राहीमावशींनी ते जमवलेलं आहे, हे ऐकून साठेसर फार आश्चर्यचकित झाले. आणि काही दिवसांनी त्यांनी राहीमावशींकडून या बियाण्यांची माहिती घेतली. त्याचे फोटो काढले आणि राहीमावशींच्या कामाला प्रसिद्धी द्यायचे ठरवले. याशिवाय राहीमावशींची देशी बियाण्यांची देवाणघेवाण ओळखीच्या नातेवाईकामध्ये आणि मित्रपरिवारामध्ये सुरू होती.
हळूहळू त्यांच्या या बियाण्यांच्या बँकेची माहिती सर्वदूर पोहोचायला लागली आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहीबाईंना ‘बीजमाता’ अशी पदवी देऊन त्यांचे गुणगान केले.
हे ही वाचा : अंधश्रद्धेच्या जटांना कात्री लावणाऱ्या नंदिनी जाधव!
देशी बियाण्यांची साठवणूक
राहीमावशी हे सगळं बियाणं व्यवस्थित सुकवून मातीच्या मडक्यात, कणग्यात साठवायच्या. “चुलीतली राख गोळा करून माठाचे तोंड लिंपलं की ही बियाणी दहाएक वर्षं तरी सहज टिकतात” असं त्या सांगतात. राहीमावशींकडे सध्या अडीचशेहून अधिक देशी प्रकारची वेगवेगळी बियाणी आहेत. त्यात गोड वाल, तांबडा वाल, बुटका घेवडा, श्रावण घेवडा, फताड्या घेवडा असे वालाचे 19 हून अधिक प्रकार आहेत. रायभोग, जिरवेल, वरंगळ, काळभात, आंबेमोहोर, ढवळू भात असे 16 हून अधिक जातीचे तांदळाचे प्रकार आहेत. वरई, नाचणी, सावा, राळा यासारख्या भरडधान्य आणि भोकरी, तांदुळका, चाईची भाजी, मोहोराची भाजी, घायपाताच्या शेंगाची भाजी, कोंबाची भाजी अश्या अनंत रेसिप्या राहीबाई बसल्या बसल्या सांगतात. या सगळ्या बियाण्यांची त्यांनी अगदी मनापासून जपणूक केली आहे.
निसर्गाच्या शाळेतल्या शिक्षणाची ही देण
हे सगळं लक्षात कसं ठेवता असं विचारल्यावर राहीमावशी सांगतात, “मी शाळा शिकले नसले तरी निसर्गाच्या शाळेत मनापासून शिकलेय. आणि मला सांगा आईला कितीबी लेकरं झाली तरी आई त्यांची नावं आणि चेहरे विसरेल का? तसंच माझं आहे. ही वेगवेगळी बियाणं मला पाहताच ओळखू येतात आणि पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचावं म्हणून त्यांना मी जीवापाड जपतेय.”

देशी वाण सर्वात्तम
राहीमावशींनी स्वत:च्या शेतात हे सगळे प्रयोग केले आहेत. हायब्रीड बियाण्यापासून पीक जास्त येतं, हा अपप्रचार आहे हे म्हणणं त्यांनी सप्रयोग सिद्ध केलं आहे. एकदा एका पावसाळ्यात त्यांनी चार ओळीत हायब्रिड तांदूळ आणि चार ओळीत देशी वाणाचा तांदूळ पेरला. रासायनिक खत कुठलंच दिलं नाही पावसानंतर हायब्रिड तांदळाला लोंब्याही लागल्या नाहीत, पण देशी वाणाने मात्र उत्पादन दिले, हे त्यांनी गावकऱ्यांना सप्रमाण दाखवून दिले.
सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी नीट मशागत करून देशी बियाण्याची लागवड करा. पिकावर पडणाऱ्या रोगाशी झुंजण्यासाठी कडुनिंबाचा पाला, रूईची पानं, मिरची, आलं लसूण आणि दहा वनस्पतींच्या पानांच्या दशपर्णी अर्क बनवून फवारा करा, जीवामृत वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

कामाची दखल
2020 साली देशाचा महत्त्वपूर्ण नागरी सन्मान ‘पद्मश्री’ हा राहीबाईंना जाहीर झाला. 2018 साली बीबीसीच्या जगभरातील शंभर प्रभावशाली महिलांच्या यादीत राहीबाईंचा समावेश झाला. पद्मश्री पुरस्कार स्विकारताना राहीबाईं म्हणाल्या होत्या की, “हा पुरस्कार माझा नाही तर आपल्याला भरभरून देणाऱ्या काळ्या आईचा आणि राबणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे. भारतातील प्रत्येक घरात विषमुक्त, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं अन्न जावं आणि नवीन पिढी मजबूत व्हावी हेच माझं स्वप्न आहे.”