‘तिसरी घंटा’ हे दोन शब्द रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी खूप महत्वाचे असतात. ही ती वेळ असते जेव्हा नाटकाच्या त्या प्रयोगासाठी अहोरात्र मेहनत करणारे कलाकार हे आपलं काम योग्य व्हावं यासाठी रंगदेवतेकडे प्रार्थना करत असतात. ‘रंगभूमी’ हे एक असं स्थान आहे जिथे तुमच्यातील खरा कलाकार, व्यक्ती हा प्रेक्षकांना दृष्टीस पडत असतो. इतर कलाकार आणि रंगभूमीवरील कलाकार यांच्यात हा फरक आहे की, इथे रिटेक नसतो. जे काही घडत असतं ते प्रेक्षकांसमोर त्याचक्षणी घडत असतं. एकाच वेळी कलाकाराला इथे एक्सप्रेशन्स, टायमिंग, संवाद लक्षात ठेवण्यासाठी लागणारी स्मरणशक्ती यांचा संगम करून एक कलाकृती प्रेक्षकांसमोर ठेवायची असते.
‘स्क्रिप्ट’ ही आजच्या सर्व सिनेमांसाठी महत्वाची गोष्ट आहे. ती चांगली असेल तर कोणताही कलाकार घ्या, सिनेमा चालतोच हे आपण सध्या बघत आहोत. नाटकांच्या बाबतीत निर्मात्यांना हे स्वातंत्र्य नाहीये. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणारा प्रेक्षक आणि नाटक पहायला जाणारा प्रेक्षक यांच्यात प्रचंड तफावत आहे. नाटक बघायला जाणारा प्रेक्षक हा आजही कलाकारांची नावं वाचून नाटक पहायला जात असतो. वर्तमानपत्रातील पानभर नाटकांच्या जाहिराती बघितल्यावर त्याची नजर कोणत्यातरी एका जाहिरातीवर स्थिरावते जिथे त्याला त्याच्या आवडीचा अभिनेता किंवा आवडीच्या अभिनेत्रीचा फोटो दिसतो किंवा कलाकारांच्या नावाच्या यादीमध्ये शेवटच्या ‘आणि’ नंतर आपल्या लाडक्या कलाकाराचं नाव दिसतं आणि मग ते तिकीट काढून नाटक बघण्याचा निर्णय घेतात. मनोरंजनाचे इतके माध्यम असतांनाही नाट्य कलाकारांनी आपली अबाधित ठेवलेली लोकप्रियता हे कौतुकास्पद आहे.
आजच्या डिजिटल युगात नाटकांच्या यशाचं कौतुक हे त्यांच्या तिकिट दरांमुळे सुद्धा आहे. आज सामान्य प्रेक्षक हा 100 ते 200 रुपयात थिएटरमध्ये जाऊन एखादा सिनेमा बघू शकतो. तेच नाटकांचा विचार केला तर असं लक्षात येतं की, नाटकांचं सरासरी तिकीट हे 300 रुपये आणि त्याहून अधिक आहे. पहिल्या तीन रांगांचं तिकीट तर काही वेळेस 600 रुपये प्रत्येकी इतकं असतं आणि तरीही नाटकांचे प्रयोग हे ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे बोर्ड आपण रंगमंदिराच्या बाहेर बघत असतो. नाटकांमध्ये देखील सिनेमा प्रमाणेच एक कथा सादर होत असते. नाटक आणि सिनेमा यामध्ये फरक इतकाच म्हणावा लागेल की इथे तुम्हाला ‘शुटिंग’ सुद्धा बघायला मिळते आणि फायनल प्रॉडक्ट सुद्धा एकाच ठिकाणी बघायला मिळतं. ज्या नाटकांना फिरता रंगमंच असतो ते नाटक बघणं तर प्रेक्षकांसाठी एक ट्रीट असते. दोन ते तीन तासांच्या कालावधीत 2-3 जग बघण्याची अनुभूती इथे प्रेक्षकांना होत असते. हे साध्य करण्यासाठी नाटकाचे कला दिग्दर्शक, नेपथ्यकार यांनी प्रचंड मेहनत घेतलेली असते. सराव केलेला असतो. जसं आपल्या ऑफिसचं सर्व्हर कधी बंद पडतं, लिफ्ट चालत नाही असे प्रश्न इथे देखील उद्भवत असतात आणि ते कधी कधी प्रेक्षकांसमोर घडत असतात, प्रेक्षकांना हसण्यासाठी कारण देत असतात. या सर्व अडचणींवर, संकोचजनक परिस्थितीवर जो मात करू शकतो, स्वतःला कुल ठेवू शकतो तोच व्यक्ती ‘नाटक’ या इंडस्ट्रीत काम करू शकतो.
‘पाठांतर’ ही कला रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला अवगत असावी लागते. सिनेमा किंवा वेबसिरीजच्या शूटिंगच्यावेळी जी ‘रीटेक’ची सुविधा असते किंवा वृत्त निवेदकाला ‘टेली प्रॉम्प्टर’ची सुविधा असते ती रंगभूमीवर नसते. सतत सराव करणे इतकंच इथे तुमच्या हातात असतं. कोणत्या सीन नंतर कोणता सीन असणार आहे हे कलाकारांनाच लक्षात ठेवावं लागत असतं. इन शॉर्ट, नाटक हे घडत रंगभूमीवर असतं, पण त्या आधी कलाकारांच्या डोक्यात सुरू असतं. हे प्रचंड बुद्धिवादी काम आहे. एकेकाळी असं बोललं जायचं की, जो काहीच करत नाही, जो हुशार नाहीये तो अभिनेता होतो. पण, अगदी जवळ जाऊन या क्षेत्राचा अभ्यास केला तर लक्षात येतं की, हे खरं नाहीये. नाटक कलाकार होण्यासाठी तुम्हाला खूप ऍक्टिव्ह, चंट आणि शार्प असावं लागतं. आपला सह कलाकार जर संवाद विसरतोय असं लक्षात आलं तरीही तुम्हाला ती वेळ मारून नेता आली पाहिजे. ‘शो मस्ट गो ऑन’ या ओळींप्रमाणे प्रयोग सुरू ठेवता आला पाहिजे. प्रवाही असलं पाहिजे. ‘नाटक’ ही इंडस्ट्री नावारूपास आणण्यासाठी आणि त्याची भरभराट करण्यासाठी आजवर योगदान दिलेल्या 5 मराठी व्यक्तीमत्वांची, शिलेदारांची माहिती जाणून घेऊयात:
1. राजा गोसावी –
सिद्धेश्वर येथे 28 मार्च 1925 रोजी जन्मलेल्या राजा गोसावी यांनी रंगभूमीवर एक काळ गाजवला आहे. त्यांनी काम केलेलं ‘सौजन्याची ऐशी तैशी’ हे नाटक प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. 1960 च्या दशकात शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांची जोडी ही कोणत्याही सिनेमा, नाटकासाठी हिट होण्यासाठी खात्रीलायक होती. या दोघांनी एकत्र काम केलेल्या 1952 च्या ‘लक्ष्मीची गोष्ट’ने त्यांची ओळख निर्माण झाली. सिनेमात मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांना प्रत्यक्ष बघण्याची हौस ही प्रेक्षकांना त्या काळातही होती. हेच कारण होतं की, डॉ. श्रीराम लागू यांनी एका मोठ्या काळासाठी रंगभूमीवर सादर केलेलं कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ हे जेव्हा राजा गोसावी यांनी सादर केलं तेव्हा देखील प्रेक्षकांना त्यांना भरभरून दाद दिली.
2. काशिनाथ घाणेकर –
सन 14 सप्टेंबर 1930 रोजी चिपळूण येथे जन्मलेल्या काशिनाथ घाणेकर यांनी देखील रंगभूमीवर सातत्याने दर्जेदार कला सादर करत प्रेक्षकांना नाटकाशी जोडून ठेवलं. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गुंतता हृदय हे’, ‘आनंदी गोपाळ’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ही काशिनाथ घाणेकर यांची गाजलेली नाटकं होती. आपल्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच संघर्षांचा सामना करूनही काशिनाथ घाणेकर यांनी नाटकात अभिनय करणं सोडलं नाही. काशिनाथ घाणेकर हे व्यवसायाने डेंटल सर्जन होते. अमरावती येथे नाटकांच्या प्रयोगासाठी गेलेले असताना त्यांचा मृत्यू झाला होता. नाटक क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ठाणे महानगरपालिकेने ‘डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह’ बांधलं आहे.
3. मच्छिन्द्र कांबळी –
मालवण येथे 4 एप्रिल 1947 रोजी मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्म झाला होता. ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे सर्वेसर्वा म्हणजे लेखक, कलाकार, निर्माता म्हणून त्यांनी आपली नाट्यक्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. मालवणी बोलण्याचा लहेजा मराठी रंगभूमीवर घेऊन आल्याने त्यांना दोन्ही क्षेत्रातील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. महाभारतातील एका भागाचं हे विडंबन आपल्या भाषेत ऐकताना, बघताना प्रेक्षकांना प्रचंड हसू आलं. मच्छिन्द्र कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ या बॅनरखाली निर्माण झालेलं हे नाटक कित्येक वर्ष लोकप्रियतेच्या शिखरावर होतं. ‘येवा कोकण आपलाच असा’, ‘माझा पती छत्रपती’ सारख्या इतर नाटकांची देखील मच्छिन्द्र कांबळी यांनी निर्मिती करत त्यात काम केलं आहे. ‘पैंजण’ या मराठी सिनेमात काम ही त्यांनी काम केलं आहे. पण त्यांची ओळख ही शेवटपर्यंत ‘वस्त्रहरण’कार म्हणूनच राहिली.
4. प्रभाकर पणशीकर –
मुंबईत जन्मलेल्या प्रभाकर पणशीकर उर्फ पंत यांना ‘तो मी नव्हेच’ या त्यांच्या नाटकातील पात्र ‘लखोबा लोखंडे’ या पात्राच्या नावाने देखील ओळखलं जायचं. 14 मार्च 1931 रोजी पणशीकरांचा जन्म झाला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचं लेखन केलं होतं. आपल्या विशिष्ठ शैलीत म्हटलेल्या “तो मी नव्हेच” या संवादाने प्रभाकर पणशीकर यांना इतकं लोकप्रिय केलं होतं की, ते कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात दिसले तरीही प्रेक्षक त्यांना हा संवाद म्हणायचा आग्रह करायचे. प्रदीर्घ काळ हाऊसफुल राहिलेल्या या नाटकानंतर प्रभाकर पणशीकर यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकामध्ये ‘औरंगजेब’ची भूमिका साकारली होती. काही वर्षांनी ते नाट्य निर्माता झाले आणि त्यांनी ‘नाट्यसंपदा’ या मराठी नाटकांची निर्मिती करणाऱ्या संस्थेची स्थापना केली.
5. प्रशांत दामले –
मुंबईत 5 एप्रिल 1961 रोजी जन्मलेल्या प्रशांत दामले यांनी 21 व्या शतकात नाटकांची धुरा यशस्वीपणे आपल्या खांद्यांवर उचलली आहे. 35 वर्ष रंगभूमीवर कलाकार म्हणून आपली कला सादर करणारे दामले सर हे ‘एका लग्नाची गोष्ट’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या दोन नाटकांमुळे घरोघरी पोहोचले. नाटकात सादर होणाऱ्या “मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं…?” या त्यांच्या गाण्यासाठी प्रेक्षक नाटकाचा प्रयोग पुन्हा पुन्हा बघायचे, बघतात. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे जेव्हा 12,500 प्रयोगांचा पल्ला गाठला तेव्हा ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ संस्थेकडून सरांचा सन्मान करण्यात आला होता.
‘मोरूची मावशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘जादू तेरी नजर’, ‘बहुरूपी’, ‘साखर खाल्लेला माणूस’ सारख्या इतरही कित्येक नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका निभावली. प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन देण्याचा ध्यास घेतलेल्या प्रशांत दामले यांनी नेहमीच नव्या कलाकारांना संधी दिली. संकर्षण कऱ्हाडे यांना ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात प्रमुख अभिनेता म्हणून त्यांनी संधी दिली आणि ते नाटक देखील सुपरहिट झालं. दर्जेदार कलाकृती ही व्यवसायिकरित्या कशी यशस्वी करायची ? जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवायची ? हे प्रशांत दामले आपल्या नाटकांच्या प्रसिद्धीच्या पद्धतीतून नेहमीच दाखवून देत असतात.
प्रशांत दामले यांचे मराठी नाटकाला परदेशात घेऊन जाणे, एका दिवसांत जास्तीत जास्त प्रयोग ठेवणे, सकाळी लवकरचा प्रयोग ठेवणे यांसारखे कित्येक प्रयोग हे यशस्वी झाले. नवीन पिढीला नाटकांकडे आकर्षित करण्याचं श्रेय प्रशांत दामले यांनाच जातं. नाटकाची गोडी लागलेल्या नवीन पिढीने मधल्या काळात रंगभूमीवर परत आलेल्या ‘चारचौघी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘संयुक्त मानापमान’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘पुन्हा सही रे सही’ या सर्व कलाकृतींवर भरभरून प्रेम केलं.
एकीकडे ओटीटीवर नवनवीन सिरीज, सिनेमांची वाट बघणारा प्रेक्षक हा नाटकांकडे पण तितक्याच आपुलकीने बघतो बघणं खूप आनंददायी आहे. प्रेक्षकांचा ‘स्पॅन ऑफ अटेन्शन’ कमी झालेला असतांनाही ही नाटक कंपनी शेवटच्या प्रेक्षकापर्यंत आपली कला पोहोचवण्याचं आपलं टार्गेट दरवर्षी पूर्ण करत आहेत यासाठी आपण सर्वांनी त्यांना ‘स्टँडिंग ओव्हेशन’ नक्कीच दिलं पाहिजे.