शिकारी वर्गातले पक्षी हे दिसायला अतिशय कणखर, प्रभावी असतात. त्याची ऐटच काही निराळी असते. गिधाड, गरुड, घुबड, फाल्कन, हॉक्स, केस्ट्रेल यापक्षांसह बाज पक्षी सुद्धा शिकारी पक्ष्यांच्या वर्गातला पक्षी आहे. तर जाणून घेऊयात या बाज पक्षीबद्दल.
भारतात दिसणारे बाज पक्ष्यांच्या प्रजाती
आपल्याकडे 3 ते 4 जातीचे बाज पक्षी दिसतात. त्यापैकी मधुबाज आणि पांढऱ्या डोळ्यांचा बाज पक्षी हा सहज पाहायला मिळतो. शिकारी पक्ष्यांमधे मोडणाऱ्या या पक्षाचं शरीर हे बाकदार असतं. त्याला अणुकुचीदार चोच, लांब तिक्ष्ण नखं असलेले पाय आणि शक्तीवान असे पंख असतात. यातल्या पांढऱ्या डोळ्यांचा बाज हा साधरणत: साध्या घारीच्या आकाराएवढा मोठा असतो. त्याचा गळा पांढरा असतो. त्याच्या बाजूला दोन काळ्या रेघा असतात. बाकीचं शरीर साधारणत: गडद फिकट तपकिरी रंगाचं असतं. पंखांवर थोडी पिंगट झाक असते. याचे डोळे मात्र अगदी पांढरे किंवा पिवळसर असतात. आणि इतर पक्ष्यांपेक्षा वेगळे असल्यामुळे यांना सहज ओळखता येतं.
मधुबाज – ओरीएंटल हनी बझार्ड
याचाच चुलतभाऊ आहे मधुबाज. इंग्रजीमधे याला ‘ओरीएंटल हनी बझार्ड’ असं जरी म्हणत असले तरी त्याच्या सवयी या घारी सोबत मिळत्या-जुळत्या असतात. यांची मान लांब असते आणि डोकं काहीसं छोटं असतं. इतर शिकारी पक्ष्यांच्या तुलनेने ते त्यांचं डोकं खूपच लहान वाटतं. त्यांच्या डोक्याचा आकार हा कबुतराच्या डोक्याइतका असतो.
नरांच्या डोक्याचा रंग राखाडी असतो तर माद्यांच्या डोक्याचा रंग तपकिरी असतो. मादी ही नरापेक्षा आकाराने जास्त मोठी असते. तिचा रंगसुद्धा जास्त गडद असतो. या पक्ष्याच्या डोक्यावर एक छोटासा तुरा असतो. शेपटी लांब असून नराची शेपुट काळी असते आणि त्यावर पांढरा पट्टा असतो.
या पक्ष्यांचं मुख्य खाणं हे मधमाश्या आणि इतर गांधीलमाश्या असतात. त्यामुळे त्यांना ‘हनी बझार्ड’ किंवा ‘मधुबाज’ म्हणतात.
हे ही वाचा : बहुरूपी श्येन गरूड
मधुबाजची शिकार करण्याची पद्धत
अतिशय शिताफीने हे मधुबाज एखाद्या पोळ्यावर झडप घालतात आणि आतील मधमाश्या, त्यांची अंडी, अळ्या, कोष, मध आणि घरट्याचा भाग खातात. मधमाश्या चावू नये म्हणून त्यांच्या पायांना टणक खवले असतात. त्यांच्या चोचीजवळची पिसेसुद्धा काहीशी टणक असतात. त्यामुळे शरीराच्या त्याभागावरही मधमाश्या दंश करु शकत नाहीत. त्यांचे पाय आणि नखं ही अशा प्रकारची पोळी, घरटी फोडण्यासाठी खास दणकट बनलेले असतात.
मधमाश्यांसह त्यांना नाकतोडे किंवा इतर किटक, पक्ष्यांची अंडी, छोटे पक्षी, बेडूक हे सुद्धा अन्न म्हणून चालते. हे पक्षी स्थलांतर करत असतात. हिवाळ्यात जेव्हा उत्तरेकडील भागात कडाक्याची थंडी पडते, अन्नांची उपलब्धता सुद्धा कमी होते तेव्हा ते दक्षिणेकडे प्रवास करतात.
बाजचे फोटोसेशन
इतर सर्व शिकारी पक्ष्यांप्रमाणेच हे बाज पक्षी सुद्धा दाट जंगलांमध्ये राहतात. ते अतिशय लाजरेबुजरे असतात. आतापर्यंत हे पांढऱ्या डोळ्यांचे बाज अतिशय लांब लांब आणि दुर्बिणीतून बघितले होते. आणि एकदम लांबूनच त्यांचे फोटो काढले होते.
मात्र 2024 सालच्या पावसाळ्यात ताडोबाच्या जंगलामधे हा पांढऱ्या डोळ्याचा बाज अगदी आमच्या जीपबरोबर रस्त्यालगत उडत होता. मधेच तो झाडाच्या अगदी खालच्या फांदीवर बसायचा आणि मग रस्त्यावर उतरून खायला काही किटक शोधायचा. एकदा तर तो चक्क रस्त्याजवळ असलेल्या मचाणाच्या लाकडी शीडीवर येऊन बसला. त्यामुळे त्याची जवळून आणि अगदी डोळ्याच्या दृष्टीक्षेपात त्याची फोटं काढता आली.
भरतपूरला दिसलेला मधुबाज हा तरुण पक्षी होता. पूर्ण वाढ झाली नव्हती म्हणून त्यांच्या अंगावर प्रोढ मधुबाजसारखे रंग नव्हते. उंच झाडावर बसून तो जणू आमच्यावर बघत होता. भरतपूरच्या जंगलामधे सायकलने, पायी फिरायची परवानगी आहे. त्यामुळे हा मधुबाज बसलेल्या झाडाखालीच उतरून आम्हाला त्याचं चारी बाजूने सहज फोटो काढता आले. तो सुद्धा दरवेळेस अगदी चौकसपणे आमच्याकडे बघत होता.
कान्हाच्या जंगलात आम्ही एका पाणवठ्यावर जंगली प्राण्यांची वाट बघत थांबलेलो. तेव्हा बाजुलच्या झाडावर हा देखणा पक्षी तिकडे आला. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्याने त्याच्या पंखांची सावकाश साफसफाई केली. त्यानंतर त्याने परत हवेत उड्डाण केलं आणि वर तरळत, घिरट्या घालत तो निघून गेला. शिकारी पक्ष्यांचं इतक्या जवळून दर्शन आणि फोटो काढण्याची संधी नशिबाने मिळतं. ती संधी मला मिळाली त्या आठवणीसह ‘बाज’चे हे सुंदर मनमोहक फोटो खास तुमच्यासाठी.