आपल्याकडे मुळात पाळीबाबत मोकळेपणाने बोललं जात नाही. अडचण आलीये, कावळा शिवलाय, ती चार दिवस बाहेर बसलीये, chums, सॉसची बाटली फुटली, Guests, बर्थडे पासून काय वाट्टेल ते कोडवर्डस पाळीसारख्या सामान्य शारीरिक क्रियेबद्दल वापरले जातात. भारतातल्या वेगवेगळ्या बोलीभाषांत ‘पाळी आली’ या शब्दांकरता असे सुमारे 5000 कोडवर्डस आहेत. पाळी आलेली असणं ही काहीतरी अशुद्ध गोष्ट, विटाळ, पुरूषांपासून काय तर आजूबाजूच्या महिलांपासूनही लपवून ठेवण्याची गोष्ट अशाच मानसिकतेत भारतातील बहुतांश महिला वावरत असतात.
आदिवासी निवासी शाळेत मुलींना पाळीबद्दलची शास्त्रीय माहिती नाही
राजसी कुलकर्णी दिवाकर मूळच्या नाशिकच्या, जनजागृतीच्या कामाच्या निमित्ताने त्या भारतभर फिरलेल्या आहेत. सध्या मुंबईत स्थायिक असणाऱ्या राजसीताईंचे एमएससी इन ह्यूमन डेव्हलपमेंट झालेले आहे. वाचनाची, लोकांमध्ये मिसळण्याची आणि समाजकार्याची आवड होतीच. यामुळे कळत्या वयापासून त्या सर्वोदय परिवार, नाशिकचे अभिव्यक्ती मीडिया सेंटर अश्या वेगवेगळ्या चळवळी आणि प्रयोगांसोबत जोडल्या गेल्या होत्या. 2013 साली छत्तीसगडमधील दंतेवाडा परिसरातील एका मुलींच्या शाळेत त्या नोकरीसाठी रूजू झाल्या. त्यावेळी त्या ‘बचपन बनाओ’ आंदोलनासोबतही काम करत होत्या. ती निवासी शाळा होती. तिथे शिकणाऱ्या मुली, शिकविणाऱ्या शिक्षिका या प्रामुख्याने आदिवासी आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्या होत्या. त्यांच्याशी राजसीताईंची छान ओळख झाली. तेव्हा त्यांना या मुलींच्या छोट्या छोट्या अडचणी कळायला लागल्या. मासिक पाळी का येते, त्या वेळी कोणती सॅनिटरी उत्पादने वापरावीत, त्या काळात होणाऱ्या शारीरिक मानसिक चढ उतारांना कसे हॅन्डल करावे याबाबत कसलीच माहिती या मुलींना नव्हती. शिक्षिकांशी सुद्धा त्या मोकळेपणाने बोलत नव्हत्या. शिवाय या शाळेतील मुली आणि महिला स्टाफ यांनी वापरलेले सॅनिटरी पॅडस तिथे जाळून टाकण्याची प्रथा होती. हे सगळं पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे याची जाणीव राजसींना होत होती.

मासिक पाळी व्यवस्थापनाची कार्यशाळा
राजसी या मुलींशी आणखी मोकळेपणाने बोलायला, त्या पाठीमागचं वैज्ञानिक सत्य सांगायला सुरूवात केली. त्यासाठी मुलींमधल्याच काही ग्रुप लीडरना हाती धरलं. पाळी म्हणजे विटाळ नाही, त्यात अशुद्ध काही नाही, ही दर महिन्याला घडणारी शारीरिक क्रिया आहे, यात सॅनिटरी नॅपकिन्स वापरले आणि ते जाळून किंवा पुरून टाकले तर त्यात असलेल्या प्लास्टिक मुळे त्यांचे पूर्ण विघटन होऊ शकत नाही. आपण दररोजच योग्य आहार आणि व्यायाम केला तर पाळी आणि एकूणच आरोग्यासाठी ते किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव त्या करून देत होत्या. मासिक पाळी व्यवस्थापनाची छोटीशी कार्यशाळाच या काळात घेणं राजसी यांनी सुरू केलं. आणि त्यांची त्या शाळेतली नोकरी औपचारिकरित्या संपल्यानंतरही ही कार्यशाळा त्या शाळेत चालू होती. मुली आणि शिक्षिकासुद्धा जास्त मोकळेपणे आणि आत्मविश्वासाने बोलायला लागल्या.
हे ही वाचा : ज्ञान चक्षूंनी दिलं बळ आणि आत्मनिर्भरता!
‘ग्रीन द रेड’ आणि पिंकेथॉन
याच काळात राजसी यांनी मासिक पाळी व्यवस्थापन या क्षेत्रातला अभ्यास वाढवला. त्या काळी या क्षेत्रात काम करणारे लोक खूप कमी होते. पण जे लोक आणि संस्था होत्या त्यांच्याशी राजसी यांनी जोडून घेतलं. 2016 साली ‘ग्रीन द रेड’ हा पर्यावरणपूरक मासिक पाळी उत्पादनांचा आग्रह धरणारा उपक्रम त्यांनी बंगळुरूच्या शिल्पा आणि सिंधू या मैत्रिणींसोबत सुरू केला. हा उपक्रम आधी व्हॉटसअप ग्रुप म्हणून सुरू झाला. मग त्यातून भारतभरातल्या समविचारी मैत्रिणी जोडल्या गेल्या. त्यातून पोस्टर्स, वेबसाईट डिझाईन, अनेक ठिकाणी या संदर्भातल्या जनजागृतीच्या कार्यशाळा आणि स्टॉल्स लावणे सुरू झाले. त्यांची मॅरेथॉनर मैत्रीण शिल्पीने आपल्या मॅरेथॉन ग्रुप आणि स्पर्धात या संदर्भातली जनजागृती सुरू केली. त्याचा एकत्रित परिणाम असा झाला की ‘पिंकेथॉन’ ही महिलांची प्रसिद्ध मॅरेथॉन जेव्हा होईल त्या प्रत्येक वेळी तुमच्या ‘ग्रीन द रेड’ चा स्टॉल लावाच असा आग्रह सेलिब्रिटी फिटनेसपटू मिलिंद सोमण यांनी केला आणि ही चळवळ आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचू लागली.

एक स्त्री वापरते 10 हजार डिस्पोजेबल प्रॉडक्टस!
दरम्यान 2017 साली राजसी यांचे काम पाहून त्यांना रायपूरच्या टेड टॉकमध्ये, आणि 2021 साली नाशिकमध्ये या विषयावर बोलण्यासंदर्भात आमंत्रित करण्यात आले. या टेड टॉकमध्ये डिस्पोजेबल सॅनिटरी पॅडस वापरताना आपण केवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असतो, हे ऐकून आपण चक्रावून जाऊ अशी सुरूवात केली. राजसी सांगतात, “पाळी येणारी एक स्त्री तिच्या आयुष्यभरात 10 हजार डिस्पोजेबल प्रॉडक्टस वापरते आणि भारतातील सुमारे 58 टक्के महिला डिस्पोजेबल सॅनिटरी पॅडस वापरतात, असा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे सांगतो. पाळी येणारी स्त्री प्रत्येक महिन्याला अगदी कमीत कमी म्हणजे 8 पॅडस वापरते असे गृहित धरले तरी भारतात सुमारे 12 अब्ज सॅनिटरी पॅडसची विल्हेवाट दरवर्षी लावावी लागते. आपल्याकडे यासाठीची ठोस अशी कुठलीच यंत्रणा कार्यान्वित नाही, आधीच कचरावेचकांवर भरपूर ताण आहे. हे पॅडससुद्धा विलग करून टाकले जात नाहीत. हे पॅड कचरा डेपोत किंवा कुठल्यातरी जमिनींवर पडतात तेव्हा डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिनमध्ये असलेल्या प्लास्टिकमुळे त्यांचे विघटन होऊ शकत नाही. त्यातून रासायनिक पदार्थांचे उत्सर्जन होते आणि त्यांचे पूर्ण विघटन व्हायला 500 ते 800 वर्षांचा काळ लागू शकतो. सुपर अबसॉर्बंट पॉलिमरमुळे त्यांचे विघटन होऊ शकत नाही. त्यांचे पुढे लहान लहान तुकडे होतात आणि ते जमीन, पाणी, हवा प्रदूषित करत राहतात. हे पॅडस जाळणं तर आणखी भयंकर! डिस्पोजेबल पॅडस किंवा टॅम्पॉस मातीत पडून किंवा जळल्याने त्यातून असिटोन, पॅराबीन्स, स्टायव्हीन, क्लोरिन अशी अत्यंत हानिकारक वायूंची उत्सर्जनं होतात. डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन्स किंवा उत्पादने वापरणाऱ्या महिला, दरवर्षी सुमारे 4.5 किलो कार्बन डायऑक्साईडची भर जगाच्या प्रदूषणात घालतेय.”
हे ही वाचा : अंधश्रद्धेच्या जटांना कात्री लावणाऱ्या नंदिनी जाधव!
डिस्पोजेबल पॅडला पर्याय
ही सगळी आकडेवारी ऐकून आपण चक्रावूनच जातो, मग या सगळ्यावरचा उपाय तरी काय? तर राजसी सांगतात, “ त्याबाबतचीच जनजागृती तर आम्ही ‘ग्रीन द रेड’ च्या माध्यमातून करतोय. पुनर्वापर करण्याजोगी उत्पादनं जर महिलांनी पाळीच्या काळात वापरली तर कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाला मोठा आळा बसेल. वर उल्लेख केलेले सॅनिटरी पॅडसच्या विल्हेवाटीतून बाहेर पडणारे वायू हे आपल्या त्वचेसाठी तसेच प्रजनन संस्थेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी धोकादायक असतात. त्यामुळे हे धोके टाळायचे असतील तर मुळात डिस्पोजेबल सॅनिटरी पॅडस न वापरणे हाच एक मुलभूत उपाय असू शकतो. मेन्स्ट्रुअल कप किंवा कापडी पॅड, पिरियड पॅंटिज हे चांगले पर्याय आहेत. पूर्वीच्या काळी मासिक पाळीत कापडच घेतलं जायचं. त्याचाच आधुनिक अवतार म्हणजे कापडी पॅड. ते तुमच्या गरजांनुसार कस्टमाईज्ड साईज मध्ये येतात. कपडा वापरणे किती अस्वच्छ आहे हे आपण वर्षानुवर्षे ऐकत आलोयत पण माझ्या एक लक्षात आलंय की एखादी गोष्ट वापरणं चुकीचं नसतं, तुम्ही ते कसं वापरता, त्याची कशी निगा राखता त्यावर ते योग्य की अयोग्य हे ठरतं”, असं राजसी सांगतात.
शरीरावर रॅशेस नाही आणि स्विमिंगही करता येणार
“ मेन्स्ट्रुल कप तर उत्कृष्ट उत्पादन आहे. तो योनीत आत सरकवून घालता येतो, हा कप 10 ते 12 तास तुमचा रक्तस्त्राव गोळा करू शकतात, आणि नंतर ते स्वच्छ करून ठेवलं की किमान 10 वर्षे त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. त्याची सवय व्हायला कदाचित 2-3 महिने जावे लागतात. पण मेन्स्ट्रुअल कप घालून अगदी स्विमिंग, रनिंगसुद्धा करता येते, कपची सवय झाल्यानंतर तो घातला आहे की नाही हे सुद्धा लक्षात येत नाही, इतकी त्याची सवय होते. कप्स आत असल्यामुळे किंवा कपड्याचे पॅड घेतल्याने महिलांना जांघेत होणारे रॅशेसही होत नाहीत. एकूणच ही उत्पादने वापरल्याने आपली सोय तर होईलच शिवाय कचरावेचकांवरील ताण, जमिनींवरील वाढत जाणारा कचरा, प्रदूषणात पडणारी प्रचंड भर या सगळ्यांना याने आळा बसेल. कचरावेचकांना सन्मानाचे आयुष्य जगता येईल.”
मेळघाटात कापडी पॅडचं उत्पादन!
राजसी कुलकर्णी दिवाकर महाराष्ट्रासह बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ अश्या बहुतांश राज्यात मासिक पाळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सरकारी अधिकाऱ्यांना देणे, त्यात आरोग्य, शिक्षण, महिला आणि बालकल्याण, स्वच्छ भारत अभियान या सगळ्यांना कसे एकत्र काम करता येईल याबाबतचे मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा घेतात, कॉन्फरन्स करतात. याशिवाय पर्यावरणस्नेही मासिक पाळीसाठीची उत्पादनं बनवणाऱ्या कंपन्यांशीही त्या जोडल्या गेलेल्या आहेत. कापडी पॅड कसे शिवावे, त्याची निगा कशी राखावी, त्याचे मार्केटिंग कसे करावे, त्याचा दर कसा ठरवावा याचे प्रशिक्षण सुद्धा त्यांनी भारतातल्या अनेक बचत गटांना आणि महिला मंडळांना दिले आहे. नुकतेच अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट तालुक्यातील धारणीमध्ये कापडी पॅड उत्पादनाचे प्रशिक्षण एकात्मिक आदिवासी विभाग, अनुभा इनोव्हेशन्स आणि राजसी ताईंनी दिले आहे, त्यातून तिथे कापडी पॅडसचे उत्पादन आदिवासी महिलांनी सुरू केलंय.

मासिक पाळी आणि स्त्री आरोग्याबाबत मोकळेपणाने बोलायला प्रोत्साहित करणारा ‘वुमन सर्कल’ हा उपक्रम, लैंगिक आरोग्याचे, सेफ आणि अनसेफ टचचे शाळांमध्ये प्रशिक्षण अशी अनेक वेगवेगळी कामं राजसी करतात. आणि अशी कामं करणाऱ्या संस्था- संघटनांची निर्मिती करण्यामागे राजसी कुलकर्णी दिवाकर यांचे प्रोत्साहन आहे. एकूणच मासिक पाळी या बाबतीतला अवघडलेपणा संपून स्त्रियांचे उत्तम आरोग्य याचे भान लोकांना यावे यासाठी त्यांची धडपड आहे.