उन्हाळा सुरू झाला की तापमान वाढतं, घाम जास्त येतो आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी योग्य आहार घेतल्यास शरीर थंड राहते, ऊर्जा टिकून राहते आणि पचनक्रिया सुरळीत होते.
या ऋतूमध्ये पचनशक्ती काहीशी कमी होते. त्यामुळे हलका, पचायला सोपा आणि पाण्याचे प्रमाण अधिक असलेला आहार घ्यावा.
उन्हाळ्यात खाण्यायोग्य प्रमुख फळं व भाज्या
निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची पातळी राखायला मदत करणारी आणि थंडावा देणारी फळं उन्हाळ्यात येतात. तर अशी स्थानिक मौसमी फळं रोज आवर्जून खावीत.
कलिंगड (टरबूज): यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. कलिंगड खाल्ल्यामुळं थकवा कमी होतो आणि उन्हापासून थंडावा मिळतो.
संत्र: व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. संत्र्यांचा मुख्य हंगाम थंडी असला तरी, हल्ली थोड्या प्रमाणात उन्हाळ्यातही संत्री दिसतात.
मोसंबी: उन्हाळ्यात बाजारात मोसंबी मोठ्या प्रमाणात दिसतात. मोसंबीच्या फोडी खाल्ल्या किंवा रस प्यायल्यावर शरीराला थंडावा मिळतो. मोसंबी पचन सुधारायसही मदत करते.
ड्रॅगनफ्रूट, पपई, खरबूज: हलकी, पचायला सोपी, फायबर्स भरपूर असतात.
आंबा: फळांचा राजा मानला जातो. उन्हाळा सुरू होताच बऱ्याच जणांना आंब्याचे वेध लागतात. आपल्याकडं आंब्याच्या विविध जाती आहेत. आंबा जरूर खा मात्र आंब्याचं अतीसेवन टाळा. आंबा खाताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. नाहीतर आंबा शरीराला बाधतो.
आंबा कसा खावा?
- खाण्यापूर्वी आंबा किमान 1 तास तरी पाण्यात भिजवावा. त्यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते.
- पित्त असणाऱ्यांनी आंबा दुधाच्या सायीत मिसळून किंवा थोडासा गूळ, वेलदोडा घालून खावा.
- कच्चा आंबा म्हणजेच कैरी पाचक आहे – पन्हं, कैरीचं लोणचं, आंबाडाळ हे पदार्थ हमखास करून खायला हवेत. वरण, भाज्या या पदार्थांमध्येही कैरीचा वापर करता येईल. चाटमध्ये तर या सिझनमध्ये कैरी घालतातच.
उन्हाळ्यात खाण्यायोग्य भाज्या
दुधी भोपळा, तोंडली, परवल या भाज्या पचनास हलक्या आणि पचनक्रीयेला मदत करणाऱ्या आहेत. या भाज्यांचे वेगवेगळे पदार्थ करून नाश्ता किंवा जेवणात समावेश करता येईल.
गिलकी/ घोसाळ: शरीरातील उष्णता कमी करते.
काकडी, टोमॅटो, बीट: थंडावा देतात. यांचा सॅलड किंवा कोशिंबीरींमध्ये नक्की वापर करा.
पालक, मेथी, कोथिंबीर: लोहयुक्त व फायबर्सने समृद्ध आहेत
हे ही वाचा :‘औषधे आणि खाद्यपदार्थांचे’ इंटरॲक्शन!
थंडावा देणाऱ्या पारंपरिक रेसिपीज (घरगुती उपाय)
1.पन्हं (कैरी सरबत):
कैरी उकडून गर गाळावा. त्यात खांडसरी, मीठ, जिरेपूड घालावी. थोडा गूळही घालावा. कैरीचं पन्ह पचायला गूळ मदत करतो. कैरी आणि गूळ थंडाव्यासाठी उत्तम असते.
2.ताक किंवा मठ्ठा:
दह्याचं ताक किंवा मठ्ठा करून त्यात जिरेपूड, हिंग, मीठ – उन्हाळ्यातील अॅसिडिटी कमी करते.
3.वाळा सरबत:
वाळा हा बाजारात सुकवलेल्या स्वरुपात मिळतो. माठातल्या पाण्यात वाळाच्या काडया घालायच्या. पाण्याचा थंडावा वाढतो आणि मंद सुगंधही येतो. सतत पाणी पिण्याचा कंटाळा येतो त्यावेळी वाळा घातलेलं पाणी प्यायल्यास चांगलं वाटतं. हे पाणी पचनासाठी उत्तम असतं. उपवासात किंवा रिकाम्या पोटीही उपयोगी आहे.
4.गोड ताक किंवा मसाला ताक:
जास्त वेळ उन्हात राहिल्यानंतर ताक प्यायल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सांभाळला जातो.
5.साळीचं (बार्लीचं) पाणी:
डिटॉक्ससाठी आणि लघवीच्या त्रासात बार्लीच पाणी उपयोगी ठरते. बार्लीच्या पाण्यात लिंबाचा रस, मीठ, साखर घालून सरबतासारखं पिता येईल.
6 थंड दूध/ बेलफळ/ उसाचा रस
मधल्या वेळेत किंवा बाहेरून आल्यावर खूप दमायला होतं. अशावेळी थंड दूध किंवा बेलफळाचा रस किंवा उसाचा रस यासारखी पेय घ्यावीत. यामुळे एनर्जी मिळते.
हे ही वाचा :इंटरमिटंट फास्टिंग: प्राचीन पद्धती ते आधुनिक ट्रेंड
उन्हाळ्यात घ्यायची विशेष काळजी
- जेवणामध्ये तेलकट व तळलेले पदार्थ टाळावेत.
- कृत्रीम गोड पेयांची (सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स) सवय कमी करावी.
- शक्य असल्यास ताजं शिजवलेलं अन्न खावं – स्टोर करून ठेवलेले पदार्थ पचनात अडथळा करतात.
- पाणी पुरेसे प्यावे: दर तासाला थोडं पाणी प्या, पण अतिप्रमाणात एकदम पिऊ नये.
- जेवणात लिंबू, कोथिंबीर, हळद, आलं यांचा वापर करा. या गोष्टी नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढवतात.
उन्हाळा त्रासदायक वाटतो, पण जर योग्य आहार आणि जीवनशैली अवलंबली, तर हा ऋतू सुद्धा आनंददायी ठरतो. घरगुती, पारंपरिक उपायांनी आणि थोड्या सवयींमध्ये बदल करून तुम्ही तुमचं आरोग्य सहज सांभाळू शकता.