उन्हाळा म्हटला की वाढलेले तापमान, चटके देणारे ऊन, घाम, डिहायड्रेशन आणि त्यातून उद्भवणारे विविध शारीरिक त्रास ही एक साखळीच असते. या ऋतूमध्ये शरीरामध्ये उष्णता खूप वाढते, त्यामुळे योग्य आहार-विहार घेतला नाही तर त्वचाविकार, डोळ्यांचे त्रास, उष्माघात आणि पचनाचे विकार सहज होऊ शकतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारा आणि शुद्ध ठेवणारा आहार अत्यंत महत्त्वाचा असतो.
उन्हाळ्यात होणारे त्वचेचे आजार
उन्हाळ्यात अंगावर घामोळी येणे, घामामुळे त्वचेवर रॅशेस येतात, खाज सुटते, सतत तहान लागते, शरीरात उष्णता वाढल्यामुळे डोळ्यांत जळजळ होते, डोळे कोरडे होतात किंवा वारंवार डोळ्यातून पाणी येत असतं, या वाढत्या उष्णतेमुळे डोकेदुखी सुद्धा होते. यासाठी आहारामध्ये थंड गुणधर्म आणि पाण्याचे प्रमाण वाढवणाऱ्या पदार्थ्यांचा समावेश करावा. यामुळे शरीरही थंड राहून शुद्ध सुद्धा होत असते.
ताक उन्हाळ्यातलं सर्वोत्तम पेय
ताक हे उन्हाळा ऋतूतलं एक आदर्श पेय ठरते. आयुर्वेदानुसार ताक पचनासाठी हलकं, पित्तशामक, अग्नीदीपन आणि दोषशामक आहे. त्यामुळे ताकाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते आणि पचनक्रिया सुधारणास मदत होते. ताकामध्ये थोडं जिरेपूड, सैंधव मीठ, थोडं ओलं आलं, कढीपत्ता घालून ते प्यायलं तर त्याचे फायदे अधिक वाढतात.
हे ताक दिवसातून एकदा किंवा दोनदा, जेवणानंतर घेणं लाभदायक ठरते. काही वेळेस उपवासाच्या दिवशी फक्त ताक घेणे उत्तम असते. याला आयुर्वेदात ‘तक्रोपवास’ असं म्हणतातं यामुळे शरीराचं लघुशुद्धीकरण होते.
उन्हाळ्यात चहा, कॉफी आणि शीतपेय हे अतिप्रमाणात पिणं टाळावं, कारण ते शरीराला डिहायड्रेट करतात. त्याऐवजी ताक, पन्हं, बेलसरबत, गुळजिरेपाणी, नारळपाणी यांचे जास्त सेवन करावं.
त्वचेची काळजी
अंगावरची घामोळी टाळण्यासाठी शरीरातली उष्णता कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी अंघोळीसाठी थंड पाणी वापरायचे. गुलाबपाणी किंवा चंदनाचा लेप लावणे, सुती सैलसर कपडे वापरणे फायद्याचे असते.
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी
डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी उन्हात जाताना गोगल लावावा. सकाळी थंड पाण्याने चेहरा आणि डोळे नीट धुवावेत. तसचं आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळींब, गाजर, कोथिंबीर असे विटामिन ए युक्त पदार्थ्यांचा समावेश करावा.
उन्हाळ्यात भेडसावणारी ट्यॅनिंगची समस्या
ट्यॅनिंग म्हणजे सूर्यप्रकाशामुळे त्वचा गडद किंवा काळसर पडतं असते. उन्हाळ्यात कडक ऊन असल्यामुळे ही समस्या सर्वसामान्यपणे दिसून येतं. विशेषतः चेहरा, हात, मान, मानेखालील भाग आणि पाय हे काळसर पडलेले पाहायला मिळतात. आयुर्वेदात याला त्वग्दुष्टि किंवा वर्ण विकार म्हणतात.
ट्यॅनिंग का होते?
अतिनील किरणांचा (UV Rays) त्वचेवर थेट संपर्क आल्याने त्वचेमधील मेलानिन नावाचे रसायन वाढते.
हे मेलानिन त्वचेचे रक्षण करते पण त्याचवेळी त्वचा गडद दिसू लागते.
बाहेर उन्हात अधिक वेळ राहणे, सनस्क्रीन न वापरणे आणि चुकीचा आहार हे देखील कारणीभूत ठरतात.
आयुर्वेदाच्या मदतीने उन्हाळ्याशी सामना
आयुर्वेदात त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी ‘रक्त, मेद, त्वचा’ या तीन धातूंवर विशेष लक्ष दिलं जातं. उष्ण ऋतूतील अधिक ‘तपनीय उष्णता’ ही या धातूंमध्ये असंतुलन निर्माण करते, ज्यामुळे वर्णदूषण (त्वचेचा रंग बदलणे) होतो.
हे ही वाचा : उन्हाळ्यातील आहाराची काळजी
ट्यॅनिंगपासून बचावासाठी आयुर्वेदीय उपाय:
1 अंघोळीच्या आधी उटणे लावावे – चंदन, मंजिष्ठा, गुलाब आणि हरिद्रा युक्त उटणे त्वचेवर लावल्यास रंग उजळ होतो.
2.ताकाचा वापर – थोडं बेसन आणि हळद ताकात मिसळून लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि ट्यॅनिंग कमी होते.
3 कोरफड (Aloe Vera) – संध्याकाळी कोरफड जेल त्वचेवर लावल्यास दाह शमतो आणि ट्यॅनिंग कमी होते.
आपण थोडी जागरूकता आणि आरोग्याची काळजी घेतल्यास उन्हाळ्याचे दिवस निरोगी आणि आनंददायक होऊ शकतात.
पुढील भागात उष्माघात, फंगल इन्फेक्शन, पोटाचे विकार या अनुषंगाने उन्हाळ्यात घेण्यात येणारी काळजी हे वाचूया
3 Comments
Very nice information, Thanks 🙏
योग्य वेळी योग्य उपाय सुचवले,आभार
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. लग्न कार्यानिमित्त नागपूरला जावं लागतं आहे त्यामुळे विदर्भातील उन्हाचा सामना करण्यासाठी तुम्ही दिलेली माहिती मोलाची ठरेल. धन्यवाद.