वर्धा जिल्ह्यातील मिर्झापूर हे गाव महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे ‘सौर ऊर्जा ग्राम’ ठरले आहे. या गावात 132 कुटुंब आणि गावची लोकसंख्या 425 आहे.
नैसर्गिक साधन संपत्तीवर सर्वांचा अधिकार असतो. ती पुढील पिढ्यांच्या उपयोगी पडावी म्हणून सर्वांनी अपारंपारिक ऊर्जेचा म्हणजे सौर,पवन,जल ऊर्जा यासारख्या माध्यमांचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. आपली विजेची गरज पूर्ण करण्याकरिता सौर ऊर्जा हा एक सुंदर पर्याय आहे. महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येत असलेल्या नेरी मिर्जापुर या गावाने शाश्वत विकासाचे वेगवेगळे प्रयोग गावात राबविण्यास सुरुवात केली. गावातील सर्व घरांवर सौर ऊर्जा पॅनल बसवून महाराष्ट्रातील अधिक लोकसंख्येचे पहिले सौर ऊर्जा ग्राम होण्याचा मान देखील प्राप्त केला.
समृद्ध गाव ते पुनर्वसित गाव
1982 मध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी याकरता लोअर वर्धा प्रकल्प सुरू झाला होता. या प्रकल्पामुळे आर्वी तालुक्यातील 22 गावे बाधित झाली. त्यात नेरी मिर्जापुर या गावाचा समावेश होता. वर्धा नदीकाठी असलेल्या या गावातील जमीन अत्यंत सुपीक होती. मात्र प्रकल्पामुळे बाधित होणार असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेती गेली आणि घरंही गेली. 2007 मध्ये या गावातील लोकांचे पुनर्वसन आर्वी शहरा नजीक करण्यात आले.
पुनर्वसनाच्या रखडलेल्या कामांमुळे फटका
पुनर्वसनाच्या ठिकाणी लोक पुन्हा मनावर दगड ठेवून राबायला लागले. स्थिर स्थावर झालेत. 2015-16 साली या गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. पुनर्वसित गाव म्हणून गावाला नागरी सुविधा 2007 मध्ये प्राप्त व्हायला पाहिजे होत्या. पण 2016 पर्यंत या सुविधा न मिळाल्यामुळे गावातील परिस्थिती अतिशय दयनीय होती. गावात पिण्याचे पाणी, रस्ते, लाईट, सांडपाणी अशा अनेक पायाभूत गोष्टींच्या समस्या होत्या.
बाळाभाऊ सोनटक्के हे तरुण सरपंचपदी बिनविरोध निवडले गेले. गावकऱ्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत बाळाभाऊंनी गावातील समस्या सोडविण्याकरता पुढाकार घेतला. गावातील समस्या, लोकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी या सर्व बाबी बाळूभाऊ सोनटक्के यांनी आधी समजावून घेतल्या.
हेही वाचा : पंचायतराज व्यवस्था – स्वरुप आणि वास्तव
समस्यांवर मात करीत उपक्रमाची आखणी
गावातील सर्वात प्रमुख समस्या ही पाणी टंचाईची होती. 2017 मध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत नेरी मिर्जापुर या ग्रामपंचायतीने भाग घेतला. लोक सहभागातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली.
गावातील सर्व सार्वजनिक विहिरीला विहीर पुनर्भरण शोषखड्डा, गावातील प्रत्येक घरी शोषखड्डा बांधकाम, गावातील पडीक जमिनीवर सीसीटी बांध, गावालगतच्या शेतात कंटूरबांध, शेत तलाव असे निरनिराळे प्रयोग करून गावाला पाणीटंचाई पासून मुक्त करण्याचा गावकऱ्यांनी संकल्प केला. गावकऱ्यांच्या परिश्रमाला फळ मिळाले.
सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये 7 लाखांचं बक्षीस
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावाने तालुकास्तरीय दुसरा क्रमांक प्राप्त करीत सात लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळविले. यामुळे गावकऱ्यांच्या उत्साहात भर पडली. अधिक जोमाने गावाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी ठरविले. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय बांधकाम, गावातील खाली जागा असलेल्या कुटुंबाकडे परसबाग, गावातील प्रत्येक कुटुंबाकडे नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा, गावातील प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक कचरा पेटी वापर, गावातील सर्व घरांना पती-पत्नी संयुक्त नावाचे फलक, गावातील प्रत्येक घरात ग्रामगीता वाचन, गावात समुदायिक प्रार्थना असे उपक्रम सुरू झाले. गावातील लोकांचे आरोग्य व पर्यावरण प्रश्नाला महत्त्व दिले गेले.
स्मार्ट ग्राम अभियान
गावातील सार्वजनिक जागेला जाळीची भिंत उभारून सुरक्षित केले गेले. स्ट्रीट लाईटकरता LED लाईट बसवण्यात आले. शासकीय इमारतीचे सुशोभीकरण, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर सौर उर्जा प्रकल्प उभारणी करण्यात आली. गावात वाहनांसाठी ई-चार्चीग स्टेशन उभारले. काही शासकीय इमारतींसमोर पेवर ब्लॉक बसवण्यात आले.
प्लास्टिक कचरा संकलन शेड, कचरा वर्गीकरण प्रकल्प, जल, जमीन, अग्री, वायू, आकाश या पंच तत्वाचे पालन करीत माझी वसुंधरा उपक्रम, महिलांच्या शाश्वत विकासासाठी महिला उद्यमिताभवन, सार्वजनिक वाचनालय प्रार्थना मंदिर, शुद्ध व थंड पाणी प्रकल्प इत्यादी उपक्रम हाती घेतले.
पुरस्काराचा ओघ
लोक सहभागातून गावात भरीव कार्य होऊ लागले. त्याची दखल शासनाने घेतली. परिणामतः गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार रुपये पाच लाख, स्मार्ट ग्राम पुरस्कार रुपये चाळीस लाख, मिशन समृद्धी प्रोत्साहन पुरस्कार दहा लाख रुपये, माझी वसुंधरा अभियान 4.0 राज्यस्तरीय पुरस्कार 50 लाख रुपये असे पुरस्कार प्राप्त झाले. गाव सुंदर, स्वच्छ, हिरवेगार झाले. राज्याच्या अनेक ठिकाणावरून विकासाचे वारकरी या गावाला भेट देण्याकरता येऊ लागले.
हेही वाचा : सर्वसमावेशक पंचायत व्यवस्था
100% सौर ऊर्जा ग्राम
सरपंच बाळाभाऊ सोनटक्के यांनी आपले गाव 100% सौर ऊर्जा ग्राम करण्याचा निर्धार केला. तसा विचार ग्रामसभेपुढे मांडला आणि गावकऱ्यांनी साथ त्यांना दिली. 2024-25 या वर्षात या गावाने संपूर्ण गाव सौर ऊर्जा आधारित करून शून्य विज बिल धोरण राबविण्याचे ठरविले. तसा ठराव ग्रामसभेत पारित करून प्रस्ताव शासनाकडे सादर केला. सरपंच बाळाभाऊ सोनटक्के यांनी सौर ऊर्जा ग्राम अभियानाअंतर्गत स्वतः वैयक्तिक लक्ष घालून घरोघरी लोकांना याचे महत्त्व समजावून सांगितले व गावातील शंभर टक्के कुटुंबाचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घेतले. सर्व गाव सौर ऊर्जा ग्राम अभियानात सहभागी झाला . प्रत्येक घराच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल लावण्यात आले आणि हे गाव 2025 मधील अधिक लोकसंख्येचे महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जा ग्राम ठरले.
सौर ऊर्जेची निकड आणि महत्व लक्षात घेता या गावावरून प्रेरणा घेत इतरही अनेक गावांनी सौर ऊर्जा ग्राम होण्यासाठी प्रयत्न केल्यास निसर्ग संतुलन राखण्यासाठी काही अंशी सर्वांचा हातभार लागेल.
1 Comment
सुंदर