चांद्रवाहीन कालगणनेचा पहिला दिवस मराठी भाषिक गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. परंपरेप्रमाणे मराठी घराघरांत गुढी उभारली जाणार. पंचागाची पूजा होणार. वर्षफलाचे वाचन होणार. शालिवाहन शके 1947 ला सुरुवात होणार. हे ‘शालिवाहन शक’ म्हणजे नक्की काय? याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.
शक युग हे भारतीय पुरालेखनातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे कालगणन पद्धतींपैकी एक असून, त्याची सुरुवात 78 CE मध्ये झाली.
शालिवाहन नावाचा राजा नाही
शक युगाची सुरुवात नेमकी कशी झाली याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. एका प्रचलित मतानुसार कुशाण वंशातील राजा कनिष्क प्रथम याने शकयुगाची स्थापना केली असे मानले जाते. पण ह्या मताबद्दल विद्वानांमध्ये वाद आहेत. दुस-या एका प्रचलित मतानुसार शालिवाहन नावाच्या राजाने शक युग सुरु केले. मात्र शालिवाहन नावाच्या कुठल्याच राजाची ऐतिहासिक नोंद उपलब्ध नाही.
सातवाहनचे संस्कृतीकरण शालिवाहन
इतिहासतज्ज्ञ प्रभाकर देव यांच्या मते सातवाहन वंशातील प्रसिध्द राजा गौतमीपुत्राने इ.स. सन 78 मध्ये शक कालगणना सुरू केली. शालिवाहन हे सातवाहन शब्दाचे संस्कृतीकरण आहे. इसवी सनपूर्व 236च्या आसपास महाराष्ट्रातील पैठण आणि आसपासच्या परिसरात सातवाहन वंश राज्य करित होता. गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन वंशातील सगळ्यांत श्रेष्ठ सम्राट म्हणून प्रसिध्द होता. नाशिकच्या लेण्यांमध्ये या राजाशी संबधित सापडलेल्या एका शिलालेखानुसार इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्हणजेच इसवी सन 72 ते 95 या काळात गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर होता. मौर्यसाम्राज्यानंतर कुशाण, हूण, पल्लव, शक यासारख्या अनेक परकीय टोळ्यांनी उत्तर भारतावर अतिक्रमण केलं. गौतमीपुत्र सातकर्णीने मात्र दक्षिण भारताला या परकीय आक्रमणातून वाचविलं. गौतमीपुत्र सातकर्णीने या परकीय टोळ्यांपैकी शकांचा पराभव केला आणि त्यांना नामोशेष केलं. याची आठवण म्हणून शालिवाहन शक ही कालगणना सुरू झाली.
नवीन संशोधनानुसार चष्टन राजाने केली सुरुवात
अलीकडे झालेल्या आणि विद्वानांमध्ये मान्य असलेल्या संशोधनानुसार शक युग पश्चिम क्षत्रप राजवंशातील शासक चष्टनाने सुरू केले असावे. शक हे इराणमधल्या सिथिया प्रांतातून भारतात आले होते. येथे आल्यानंतर त्यांनी तत्कालीन भारतीय संस्कृती आत्मसात केली. प्रचलित धर्म स्वीकारले. शकांच्या क्षहरात आणि कार्दमक अशा दोन शाखा प्रचलित होत्या. क्षहरात शाखेतील नहपान राजाचे गुजरात आणि राजस्थानमध्ये राज्य होतं. पांडव लेण्यात सापडलेल्या शिलालेखानुसार तो नाशिक येथेही राज्य करीत होता. नाशिकजवळ गोवर्धन या ठिकाणी गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा पराभव केला आणि क्षहरातांचा पाडाव केला. त्यानंतर गुजरातमधील कार्दमक शाखेचा पहिला राजा चष्टन गादीवर आला. इसवी सन 78मध्ये चष्टनने स्वतःचं राज्य सुरू करून राज्याभिषेक शक सुरू केला. त्याने टंकीत केलेल्या नाण्यांवर त्याच्या राज्याभिषेक वर्षाचा उल्लेख येतो. हाच तो शकाचा पहिला उल्लेख. पुढे त्याच्या वंशातल्या राजांनी हे शक 300 वर्षं वापरले.
हे ही वाचा : भारतातल्या नवीन वर्षांमधील विविधता आणि वेगळेपणा
राज्यारोहणापासून काळ मोजण्याची परंपरा
त्याकाळी बहुतेक राजे स्वतःच्या राज्यारोहणापासून काळ मोजून त्यात अधिकृत दस्ताऐवज (शिलालेख, ताम्रपत्र) लिहित असत. उदा, सम्राट अशोक आणि सम्राट खारवेल यांनी त्यांच्या दस्ताऐवजांमध्ये स्वत:चा राज्यारोहण काळ वापरला आहे. तशीच शक ही चष्टनाच्या राज्याभिषेकाची कालगणना होती.
शक शब्दाचा अर्थ कालगणना म्हणून रूढ झाला
शककुलाने गुजरात आणि माळवा या भागात अनेक वर्षं राज्य केल्यामुळे शक कालमापन आसपासच्या प्रदेशांमधे प्रचलित झालं. त्यामुळे त्याचा उल्लेख शक-काल असा केला जाऊ लागला. पुढे शक हाच शब्द कालगणनावाचक म्हणून रूढ झाला. विशेषतः दक्षिण भारतातील शिलालेखांमध्ये शक-कालाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला. कंबोडिया आणि जावा येथील संस्कृत शिलालेखांवर देखील याचा प्रभाव दिसून येतो.
वेगवेगळ्या राज्यांनी वापरली शककालगणना
शक युगातील तारखा विविध प्रकारांनी नोंदल्या जातात, जसे की शक-(नृप)-काले ……, शक वर्षेषु अतीतेषु ……, शक वर्षे ……, शालिवाहन-शके ……, शक …… . विदर्भामधील हिस्सेबोराळा येथील देवसेन वाकाटक नृपतीच्या शिलालेखात शकानाम् 380 असा उल्लेख आढळतो. बदामीचे चालुक्य राजेही शिलालेखांमधे शक-वर्ष, शक-नृपति-राज्याभिषेक-संवत्सर, शक-नृपति-काल असा स्पष्ट उल्लेख करतात. आठव्या शतकातील महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राजेही स्पष्टपणे शक-नृप-काल किंवा शक-नृप-संवत्सर असा उल्लेख करतात. वराहमिहिरानेही बृहत्संहितेत शकेन्द्र-काल आणि शक-भूप-काल असा उल्लेख करून ही कालगणना वापरली आहे.
हे ही वाचा : देशोदेशीच्या नूतन वर्षाच्या परंपरा
शिवराज्याभिषेक शक
साधारण नवव्या दहाव्या शतकानंतर शक-कालाचा उल्लेख संक्षेपाने शक-संवत असा केलेला आढळतो. कालौघात हा उल्लेख इतका रूढ झाला की शक शब्दाचा अर्थ कालगणना म्हणून घेतला जातो. याचे उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्यारोहणानंतर सुरु केलेल्या कालगणनेला आपण शिवराज्याभिषेक शक असे म्हणतो. इ.स. च्या बाराव्या मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे आढळलेल्या परमार राजा उदयादित्याचा शिलालेख, पंढरपूरचा शिलालेख, तासगावचा ताम्रपट यांत काळाचा उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो. यावरून पंधराव्या शतकापर्यंत शक म्हणजे कालगणना हा अर्थ चांगलाच रूढ झालेला दिसतो.
ही पुराव्यांच्या आधारे शालिवाहन शकाची कथा. बाकी त्या शकाचे हिंदू नववर्षाशी जोडला गेलेला संबंध, शालिवाहनाने पराभूत केलेया शकांच्या गोष्टी हे नंतरच्या काळात झालेली जडनघडन आहे.