सध्या पुन्हा एकदा कोविड विषयक बातम्यांनी जोर पकडला आहे. विविध माध्यमांमधून “कोविड वाढतोय … ” “कोविडची लाट येईल का ?” … “कोविड किती राज्यात पसरला”… अशा प्रकारच्या बातम्या आपल्यासमोर येत आहेत आणि त्या वाचून पुन्हा एकदा आपल्या मनावर भीतीचा पगडा सुरू होत आहे.
भीती वाटणे अगदी साहजिक आहे. कारण आपण सर्व एका खूप मोठ्या जागतिक महासाथीमधून वाचलेलो आहोत. या महासाथीदरम्यान आपण ऑक्सिजन बेडसाठी लागलेल्या रांगा बघितल्या, सतत पेटणाऱ्या चिता बघितल्या, तसेच अनेकांनी आपले प्रिय कुटुंबीय यामध्ये गमावले. अनेकांचे व्यवसाय यादरम्यान ठप्प झाले . मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. न भूतो ना भविष्यती असे अनुभव आपण या काळात घेतले. त्यामुळे जेव्हा जेव्हा कोविड वाढतोय अशा बातम्या आपण ऐकतो त्या वेळेला “कोविडची लाट येईल का” हाच प्रश्न आपल्या मनामध्ये उभा राहतो.
सध्या सुरू असलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, त्या कृपया समजून घ्या.
कोविड जगात स्थिर झालेला विषाणू
कोविड हा आता नवा आजार राहिलेला नाही. हा एक पाच वर्षांपूर्वी जगामध्ये प्रवेशित झालेला विषाणू आहे . गेली पाच वर्षे या विषाणूचा प्रसार आणि संसर्ग अनेक लोकांना झालेला असल्याने आपणा सर्वांच्या शरीरामध्ये याविरुद्ध काही ना काही रोगप्रतिकारक शक्ती आता उपलब्ध आहे. सार्वत्रिक लसीकरणामुळे देखील आपणा सर्वांच्या शरीरामध्ये अँटिबोडीज उपलब्ध आहेत. त्या कमी जरी झाल्या तरी संसर्ग झाल्यानंतर लगेच वाढू शकतात. त्यामुळे आपण पूर्वी कोविडच्या मोठ्या लाटा बघितल्या तशा सार्वत्रिक लाटा तयार होण्याची शक्यता आता कमी आहे.
ओमायक्रोन विषाणू – JA.1
सध्या कोविडचा जो उपप्रकार सर्वत्र दिसून येत आहे तो आहे JA.1 . हा ओमायक्रॉनचा प्रकार आहे. ओमायक्रोन विषाणू म्हणजे सध्याचा JA.1 – हा एक सौम्य लक्षणांचा आजार निर्माण करतो. बऱ्याच लोकांमध्ये याचा संसर्ग झाल्यानंतर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ज्यांना लक्षणे दिसतात त्यांच्यामध्ये ताप, सर्दी, खोकला, बऱ्याचदा थकवा, डोकेदुखी, अंगदुखी अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात. अशाप्रकारे केवळ लक्षणांवरून हा कोविड आहे की नाही हे ओळखणे तसे अवघड आहे. ज्याला आपण वायरल आजार म्हणतो तशा पद्धतीचे चित्र आता कोविडच्या संसर्गामध्ये दिसू शकेल. हा आजार सौम्य वाटला तरी देखील ज्यांच्यामध्ये इतर सहव्याधी आहेत तसेच जे वयस्कर व्यक्ती आहेत आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा रुग्णांमध्ये याचे गंभीर रूप दिसू शकते. अशा व्यक्तींनी अधिक काळजी घ्यायला हवी.
हे ही वाचा : कोविड आणि मेंदू संबंधित आजार
सुरक्षेची काळजी कशी घ्यावी
कोविडपासून सुरक्षित कसे राहायचे हे आता आपल्या सर्वांना माहीत आहे. कोविडचा धोका कोणाला आहे हे देखील आपल्याला माहित आहे. ज्यांना धोका अधिक त्यांनी अधिक काळजी घ्यायची आणि आपण त्यांना अधिक सुरक्षित ठेवायचे. यासाठी पुढील कृती करता येतील.
1. घरातील कोणालाही सर्दी खोकल्यासारखी लक्षणे असतील त्यांनी जोखीम असलेल्या व्यक्तींपासून अंतर राखावे. शक्यतो आजारी व्यक्तींनी घरात आणि बाहेर जाताना मास्क वापरला तर सर्वांचे रक्षण होईल.
2. ज्यांना जोखीम जास्त आहे त्यांनी आणि ज्यांना जोखीम घ्यायची नाही त्यांनी- वायुविजन नसलेल्या, बंदिस्त आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा. मास्क सहसा N 95 किंवा सर्जिकल मास्क असावा.
3. हातांची स्वच्छता आणि हात तोंडाजवळ न नेणे हा उपाय सुरक्षा वाढवतो.
4. पुरेशी झोप, व्यायाम आणि सकस आहार यामुळे आपली इम्युनिटी योग्य प्रकारे काम करते.
5. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे ही लक्षणे आता JA.1 च्या आजाराचीही असू शकतात. आजार सहसा स्वतःहून कमी होतो. लक्षणानुरूप उपचार आवश्यक आहेत. संसर्ग प्रसार होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच आजार गंभीर रूप घेत आहे का यासाठी रुग्णाच्या श्वासांच्या संख्येवर लक्ष ठेवावे. धाप लागत आहे असे वाटल्यास तातडीने रुग्णालयात न्यायला हवे. ज्यांना सहव्याधी आहेत किंवा वय अधिक आहे किंवा इम्युनिटी कमी आहे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. लहान मुलांच्या बाबतीत देखील डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कोविडची शंका असल्यास तपासणी करण्यास हरकत नाही. ज्यांनी लसीचे दोन डोस आणि बूस्टर डोस घेतलेला असेल त्यांच्यामध्ये इतरांपेक्षा थोडी जास्त इम्युनिटी असू शकेल.
6. कोविड आता सौम्य लक्षणे दाखवत असला तरी देखील काळजी का घ्यायची असे तुम्हाला वाटेल. JN.1 याची प्रसार क्षमता खूप जास्ती आहे. रुग्णाचा अगदी छोटा संपर्क आला तरी देखील संसर्ग होऊ शकतो. तसेच आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी असेल आणि तुम्हाला त्याचा संसर्ग झालेला असेल तरीदेखील पुन्हा संसर्ग होऊ शकतो. कारण immune evasion मोठ्या प्रमाणात आहे. हेच कारण आहे की रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे. संसर्ग टाळण्यासाठी इम्युनिटीचा उपयोग होत नाही मात्र, गंभीर आजार टाळण्यासाठी नक्कीच होतो. यामुळे इतर काळजी घेणे महत्त्वाचं आहे. तसेच या उपप्रकारामुळे देखील लॉंग कोविड होण्याचा धोका असतो आणि शरीरातील इतर अवयव देखील बाधित होतात. त्यामुळे संसर्ग टाळणे हेच अधिक महत्त्वाचे.
7. कोविड आता आपल्यासह वस्तीला आला आहे. आणि हा वस्तीला असणारा आजार जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्याचं डोकं वर काढणार आहे. ठराविक कालावधीनंतर विशेषतः भारतातील उच्च तापमानाच्या काळामध्ये, जेव्हा हवेतील आर्द्रता कमी असते, त्यावेळेस कोविडच्या केसेस जास्त प्रमाणात दिसतात असे अभ्यासात दिसून आले आहे.
ज्यावेळी कोविड वाढतोय अशा बातम्या दिसतात त्यावेळी घाबरण्याऐवजी सावध व्हा आणि कोविड आपल्यापर्यंत पोहोचणार नाही यासाठी जे उपाय करायचे असतात ते पुन्हा सुरू करा. मनातल्या भीतीवर मात करा.
यापुढील बातम्यांवर लक्ष ठेवूया. जर नवा उपप्रकार निर्माण झालेला नसेल, तसेच आजाराची गंभीरता वाढलेली नसेल तर चिंता करण्यासारखी कोणतीही बाब नाही . सरकारकडून ज्या सुरक्षेच्या उपायोजना व सूचना मिळतील त्यांचे पालन करून आपण अधिक सुरक्षित होऊया.
कोविड पासून सुरक्षित राहणे आता अतिशय सोपे आहे. स्वतःला आणि एकमेकांना आपण सुरक्षित ठेवू शकलो तर आपण कोविडला नेहमीच हरवू शकतो. कोविडविरुद्ध आपली एकजूट हीच आपली सुरक्षा आहे.