दर वर्षी आषाढी एकादशीला संतजन माऊलीला म्हणजेच पांडुरंगाला भक्तीभावाने भेटायला जातात. हीच परंपरा महाराष्ट्रातील वारक-यांनी वारीच्या रूपाने जतन केली आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरातील पांडुरंगाचे सावळे ध्यान वारकरी त्यांच्या हृदयात समावून घेतात. पंढरपूरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली असून कटेवर हात ठेवून समपाद मुद्रेत उभी आहे. हीच मूर्ती सुरुवातीपासून पंढरपूरास आहे की, यादवकालाच्या अगोदर वेगळी मूर्ती होती? असे विविध प्रश्न उपस्थित केले गेले. या मागील महत्वाचे कारण म्हणजे पांडुरंग महात्म्यात केले गेलेले पांडुरंगाचे वर्णन.
आद्य मूर्ती निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा दुवा
श्रीविठ्ठल आणि पंढरपूरचे महात्म्य सांगणारे दोन महत्वाचे ग्रंथ उपलब्ध आहेत. या दोनही ग्रंथांचे नाव पांडुरंगमहात्म्य आहे. त्यातील एक स्कंद पुराणातील असल्याचा दावा करते तर दुसरे पद्मपुराणातील. स्कंद पांडुरंगमहात्म्य जुने असून अप्रकाशित आहे. तर पद्म पांडुरंगमहात्म्य 1869 साली मध्ये प्रथम प्रकाशित आहे. हे दोनही ग्रंथ श्रीविठ्ठल आणि पंढरपूरचा अभ्यास करण्यासाठीची महत्वाची साधने आहेत. या दोनही पांडुरंगमहात्म्यांत श्रीविठ्ठलाच्या मूर्तीचे एक वैशिष्ट्य सांगितले आहे. हे वैशिष्ट्य विठ्ठलाची आद्य मूर्ती निश्चित करण्यासाठी फार महत्वाचा दुवा आहे. ते लक्षण म्हणजे – मूर्तीच्या हृदयावर कोरलेला श्रीविठ्ठलाचा मंत्र.
पद्म पांडुरंगमहात्म्यात, श्रीविठ्ठलाने श्रीवत्सासोबतच मुक्तामाळेप्रमाणे शोभणारा षडक्षरी मंत्र धारण केला आहे असे वर्णन येते.
श्रीवत्सं धारयेन् वक्षे मुक्तमालां षडक्षराम् ।

तसेच वैजयंतीवर्णराजीवत्सवनमालिका म्हणजेच श्रीविठ्ठलाच्या वक्षावर शोभणाऱ्या अलंकारांच्या यादीत वर्णराजीचा उल्लेख म्हणजेच अक्षरावलीचा उल्लेखही येतो.
पद्म पांडुरंगमहात्म्यात पुढे परत, अनुष्टुभ छंद, ऋषी व्यास, देवता विष्णु असलेला असा आणि नारदाला सिध्दिप्रद ठरलेल्या हया मंत्राचे वर्णन वैशंपायन ऋषी श्रीविठ्ठलाच्या प्रियेला म्हणजेच पद्मेला सांगत आहेत.
छंदोSनुष्टुब् ऋषिर्व्यासो देवतास्य श्रियः पतिः ।
वैष्णवोSयं मनुः षडिभर्वर्णैनरिर्णेदसिध्दिदः ॥
त्याचप्रमाणे स्कंद पांडुरंगमहात्म्यात श्रीविठ्ठलाला महामंत्रयुतः म्हणून संबोधले आहे.
विठ्ठलाच्या इतर ग्रंथातही मूर्तीलक्षणाचा उल्लेख
हे मंत्राने युक्त असलेले श्रीविठ्ठलाचे मूर्तीलक्षण इतर अनेक ग्रंथातही स्पष्ट केलेले आहे. विठ्ठलसहस्रनामस्तोत्र आणि विठ्ठलाष्टोत्तरशतनामस्तोत्र या दोन ग्रंथात विठ्ठलाला अनुक्रमे षडक्षरमय आणि मंत्रावलीहृत्स्थ असे म्हटले आहे. नंतरच्या काळात श्रीधरस्वामी नाझरेकरांनी त्यांच्या दशाध्यायी पांडुरंगमहात्म्यात वारंवार देवाच्या हृदयावरील षडक्षरी मंत्राचा उल्लेख केला आहे. मात्र हे उल्लेख त्यांनी मूर्ती पाहून लिहिले आहेत की मूळ संस्कृत ग्रंथातून उद्धृत केले आहेत हे सांगणे कठिण आहे.
खरंच अशी अक्षरं कोरलेली मूर्ती आहे का?
सध्या पंढरपूरच्या मंदिरात स्थापन केलेल्या मूर्तीच्या हृदयावर अशी अक्षरे कोरलेली नाहीत. अ॒शी अक्षरावली असलेली मूर्ती मूळातच आहे का? की हे वर्णन केवळ ग्रंथांपुरते मर्यादित आहे असाही प्रश्न निर्माण होतो. की अशी षडक्षर मंत्रांनी युक्त मूर्ती कुठे इतर ठिकाणी स्थापन केली आहे असाही प्रश्न उपस्थित होतो.
माढे गावातील मूर्तीच्या छातीवर त्रिकोणी आकारात मंत्र
सोलापूर जिल्ह्यातील माढे तालुक्यात माढे गावात एक विठ्ठलमंदिर आहे अशी इतिहासाचार्य राजवाड्यांनी नोंद केली आहे. येथील विठ्ठलाच्या मूर्तीच्या हृदयावर खालील मंत्र त्रिकोणी आकारात कोरलेला आहे.
श्रीस्पर्शाद्यं सत्यनामाद्यं
षणषटू सदीर्घकं ॥ ष
टषटू दिनंत्यंतं स
सारं तं विदुर्बु
धाः ॥ श्री
वत्स

माढ्यातील मूर्तीवरील मंत्राचे स्कंद पुराणातील उल्लेखाशी साधर्म्य
मंदिराच्या उंबरठ्यावरील शिलालेखानुसार ते महादजी निंबाळकरांनी बांधले आहे असे स्पष्ट होते. निंबाळकर म्हणजे माढ्याचे जहागीरदार. त्यांचा जुना वाडा आजही माढ्यात आहे. तर या निंबाळकरांनी बांधलेल्या विठ्ठलमंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीच्या हॄदयावरील लेख स्कांद पांडुरंगमहात्म्यातील कूट श्लोकाशी साधर्म्य दर्शवितो. या लेखामुळे पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती माढे येथे स्थानांतरित केली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. सुलतानी काळातील संकटप्रसंगात पंढरपूर मंदिरातील मूर्ती हलविण्याची परिस्थिती उद्भवली होती हे सर्वश्रुत आहे.

भानुदासांकडील मूर्तीशी संबंध आहे का?
तसेच संत भानुदासांच्या काळात विजयनगरच्या हिंदू राजाने विठ्ठलाची मूर्ती स्वतःच्या राजधानीत नेल्याची आणि भानुदासाने ती परत आणल्याची कथा अनेक मराठी संतगाथांमध्ये येते. परंतु ह्या कथेच्या शहानिशा करण्याकरिता आवश्यक तेवढी साधने उपलब्ध नाहीत. भानुदासांच्या पारंपरिक घरातील म्हणजेच पैठण येथील एकनाथांच्या वाड्यातील विठ्ठलमूर्तीचे नाव विजय-विठ्ठल असून तिचे विधान विजयनगर कालीन विठ्ठलाच्या मूर्तीसारखेच आहे. शिवाय ती आकाराने फार लहान असल्याने ’देव भानुदासाच्या पडशीत मावण्याइतका लहान झाला असे संदर्भही प्रचलित आहेत. मात्र दाक्षिणी परंपरेनुसार विजयनगर येथील विठ्ठल वेंकटगिरीहून आला असे उल्लेख सापडतात.
अफझलखानाच्या स्वारीवेळी पंढरपूरातील मूर्ती हलवल्याचे पुरावे
तर अफजलखानाच्या स्वारीच्या वेळेस पंढरपूरातील विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरातून हलविली होती असे ऐतिहासिक पुरावे सापडतात. इसवी सन 1695 पासून चार ते पाच वर्ष औरंगजेबाची छावणी पंढरपूराजवळ होती आणि त्यावेळेस पंढरपूर क्षेत्र आणि देव संकटात असल्याचा उल्लेख मिळतात. त्यावेळी मूर्ती नजिकच्या गावांत हलविली असावी.
वि का राजवाड्यांच्या मते तत्पूर्वी इसवी सन 1659 मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळेसच कठिण प्रसंग टाळण्यासाठी मूर्ती माढे येते हलविली होती. आणि त्यानंतर अफजलखानाच्या मृत्यूनंतर ती परत पंढरपूरात आणली गेली. या स्मृतीप्रीत्यर्थच माढे येते निंबाळकरांनी विठ्ठल मंदिर बांधले असावे आणि त्या मूर्तीची मंदिरात स्थापना केली असावी.
स्कंद पुराणातील संदर्भांनी माढ्यातील मूर्ती घडवली का?
स्कंद पांडुरंगमहात्म्यात आद्य मूर्तीच्या लक्षणांमध्ये हॄदयावरील मंत्रावलीसोबतच अजून दोन लक्षणांचा उल्लेख आहे. ती म्हणजे कपाळावरील तृतीय नेत्र आणि दिंगबर बालगोपालाची मूर्ती. माढे येथील मूर्तीचे वर्णन पाहिल्यास तीही दिंगबर बालगोपालाची मूर्ती आहे. तिच्या कानात शंखाकार कुंडले, गळ्यात आणि हॄदयावर लोंबणारी अशा दोन माळा, यज्ञोपवित, माळेत कौस्तुभमणी, छातीवर मंत्र आणि श्रीवत्स चिन्ह, डाव्या हातात शंख आणि उजव्या हातात काठी आणि कमळ धारण करीत ते हात कटेवर विसावले आहेत. कपाळावर आडवा तृतीयनेत्र आहे.
या माढे येथील मूर्तीवर अनेक संशोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जरी माढे येथील मूर्ती ‘मूळ’ मूर्ती नाही असे मानले तरीही, याला पर्यायी मत असेही आहे की माढे येथे निंबाळकरांनी आद्य मूर्ती पंढरपूरास परत नेल्यानंतर तिचे स्मरण रहाण्याकरिता पुरातन मूर्तीची तंतोतंत जुळणारी मूर्ती बनवून स्थापन केली असावी.
हेही वाचा – भगवान परशुराम आणि मध्यप्रदेशचा संबंध
मूळ मूर्ती आणि सध्याच्या मूर्तीबाबत संभ्रम
प्रसिध्द धर्मशास्त्रज्ञ काशीनाथ उपाध्याय म्हणजेच बाबा पाध्यांनी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मूर्तीच्या वक्षस्थळावरील षडक्षर मंत्राचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते इसवी सन 1805 पर्यंत पंढरपूरच्या मंदिरात वर्णन असलेली मूर्ती सुरक्षित होती.
मग शेवटी असा प्रश्न उपस्थित होतो की इसवी सन 1805 पर्यंत पंढरपूरात असलेली ही आद्य मूर्ती गेली कुठे? इसवी सन 1873 मध्ये वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार कोण्या एका माथेफिरूने मूर्ती भंग केली होती. त्यामुळे या घटनेनंतर ती बदलली असवी असे अभ्यासकांचे मत आहे.
माहिती आणि फोटो संदर्भ – रा.चिं. ढेरे यांचे ‘श्री विठ्ठल महासमन्वय’ पुस्तक