‘के-ड्रामा’ म्हणजेच कोरियन कलाकृती हे आता जवळपास सर्वांना माहिती झालं आहे. ओटीटीवर कोरियन सिरीज या सध्या एकेकाळी एकता कपूरच्या ‘क’ची बाराखडी असलेल्या सिरियल्स जशा लोकप्रिय झाल्या होत्या तितक्याच लोकप्रिय झाल्या आहेत. इतकी वर्ष कोरिया म्हटलं की डोळ्यासमोर फक्त दोन गोष्टी यायच्या. एक तर ह्युंदाईची कार आणि दुसरं उत्तर कोरियाचा घातक प्रशासक किम ज्याने कोरोना काळात त्याच्याच देशातील लोकांना ‘दिसता क्षणी गोळी घाला’ असे पोलिसांना आदेश दिले होते.
दक्षिण कोरिया आणि मनोरंजन क्षेत्र
दक्षिण कोरिया हा देश मात्र वेगळा आहे. प्रगतिशील आहे. सर्वसमावेशक आहे. मनोरंजन ही इंडस्ट्री जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा अजून सुधारण्यासाठी मदत करू शकते, हे लक्षात आल्यामुळे कदाचित दक्षिण कोरियाने वेगळा पवित्रा घेतला. त्यांनी बॉलीवूड प्रमाणे आपल्या देशातील कलाक्षेत्राला अनुदानित करून प्रोत्साहन दिलं.
परिणामी, दक्षिण कोरियातील सेऊल हे शहर मुंबई प्रमाणे मनोरंजन नगरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. नामसन टॉवर, गियांकबंग पॅलेस, ग्वांगव्हामून स्क्वेअर, हालसन नॅशनल पार्क ही दक्षिण कोरियातील अशी ठिकाणं आहेत ज्यांची नावं कदाचित आपल्याला माहीत नाहीत. पण आपण ही कोणत्या ना कोणत्या सिरीज मध्ये नक्कीच बघितली असतील.
प्रेषकांची नकारात्मकते ऐवजी सकारात्मकतेला पसंती
भारतीय प्रेक्षक हा कोरियन कंटेंटकडे का आकर्षित झाला असेल? याचं उत्तर हे त्यांच्या कथांमध्ये, कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसणारी निरागसता हे कदाचित असू शकेल. भारतीय सिरीज किंवा सिरियल्स मध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने कुटुंब व्यवस्था, नातीसंबंध यांच्याबद्दल नकारात्मक कंटेंट बघायला मिळत आहे. भारतीय संस्कृतीची जी जमेची बाजू आहे त्यावरच जेव्हा भारतीय निर्माते, कथाकार प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले. त्यामुळे प्रेषकांनी इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. आज भारतातील कोणत्याही भाषेतील सिरीज बघा, त्यामध्ये एक तर कुटुंबातील वाद, कट कारस्थानं दाखवतात किंवा लग्न झालेल्या जोडप्यांची विवाहबाह्य संबंध दाखवतात. प्रेक्षकांना तुम्ही तोच तोच कंटेंट दाखवून किती वर्ष बांधून ठेवू शकतात ?
भारतामध्ये कोरियन ड्रामाची क्रेझ
‘के-ड्रामा’च्या सिरीजमध्ये प्रेक्षकांना ‘फॅमिली बॉण्ड’ दिसला. त्यांच्या सिरीजमध्ये देखील भांडणं दाखवली जातात. पण, त्यामुळे कोणी कोणाला जीवे मारण्याची धमकी देत नाही किंवा कट रचत नाही. मात्र हे सगळं आपल्या सिरीजमध्ये सर्रासपणे होताना दिसतं. आयुष्यातील आव्हानांचा सामना कसा करावा? हे सांगतांना ‘के-ड्रामा’ ची ‘फॅमिली बाय चॉईस’ ही सिरीज तरुण मुलांच्या भावविश्व देखील व्यवस्थित टिपते. या सिरीजमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की, तीन वेगवेगळ्या स्वभावाच्या भावंडांना खूप वर्षानी एकमेकांना भेटण्याचा, एकत्र राहण्याचा योग येतो. लहानपणीचा ज्या भावाला आपण हक्काने काहीही बोलायचो, त्याला आता स्वतःची मतं आहेत, त्यांचा आपण आदर केला पाहिजे आणि एकत्रितपणे छान जगलं पाहिजे असा सुंदर संदेश या ‘के-ड्रामा’ने दिला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली.
नॉस्टेल्जिक कंटेटची निर्मिती
’18 अगेन’ या काल्पनिक कोरीयन सिरीजचं असं कथानक आहे की, एक चाळीशी जवळ आलेला व्यक्ती हा एका जादूने परत एकदा 18 वर्षांचा होतो. जो काळ आपला जगायचा राहिला आहे तो ही व्यक्ती परत एकदा जगते. आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर परत एकदा भरभरून प्रेम करते. ‘नॉस्टॅल्जीया’ हा सध्या खूप लोकप्रिय कंटेंट असल्याने हा विषय प्रेक्षकांना आवडणं सहाजिकच होतं.
‘रिप्ले 1988’ ही सिरीज देखील याच विषयावर आहे. या सिरीजमध्ये आजच्या काळातील दोन मित्रांचं कुटुंब हे एकत्र भेटतात. त्यांनी 1990 च्या दशकांत जगलेलं बालपण आणि आजच्या मुलाना मिळणारं बालपण यामध्ये किती तफावत आहे यावर प्रकाश टाकते. काळ बदलतो, पण घट्ट मैत्री टिकून राहते हे या सिरीजमध्ये वारंवार सांगण्यात आलं आहे.
कौटुंबिक नातेसंबंध जपणाऱ्या कथा
‘अवर ब्ल्यूज’ ही कोरियन सिरीज देखील जिजू आयसलँडवर रहाणाऱ्या दोन कुटुंबाची कथा सांगते. ज्यामध्ये त्या कुटुंबाच्या आर्थिक संघर्षाचा उल्लेख करण्यात आला आहे. आर्थिक नुकसान होताना देखील कुटुंबातील व्यक्ती एकमेकांवर त्याचं खापर फोडत नाहीत, परिस्थितीचा संबंधावर फरक पडू देत नाहीत आणि एकत्रितपणे परिस्थितीचा सामना करतात.
जवळपास हाच संदेश ‘के-ड्रामा’च्या ‘लाईफ इज् ब्युटीफुल’ या सिरीजमध्ये दिला आहे. एका कुटुंबातील तीन पिढ्यांची विचार करण्याची वेगवेगळी पद्धत, तरीपण एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी चाललेली धडपड ही प्रेक्षकांना खूप सकारात्मकता देणारी ठरली.
तरुणाईला आकर्षित करणारे विषय
‘के-ड्रामा’ सिरीज या केवळ फॅमिली ऑडियन्स वरच लक्ष केंद्रित करून आहे असं नाहीये. त्यांनी ‘माय लिबरेशन नोट्स’ सारख्या सिरीज मधून तरुणांना आवश्यक वाटणारं ‘व्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयाला देखील योग्यपणे सादर केलं आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कुटुंबाच्या प्रश्नांना साईड लाईन करणाऱ्या युवकांसाठी या सिरीजमध्ये एक विशेष संदेश दडलेला आहे. तीन तरुण भावंडांची ही कथा प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आसपास घडणारीच वाटते.
रहस्य कथा
‘के-ड्रामा’ मध्ये जीवनाची ‘डार्क साईड’ अगदीच झाकली जाते असंही नाहीये. ‘लिटिल वूमन’ ही सिरीज ही एका कुटुंबातील काही भ्रष्ट लोकांची रहस्य उलगडून सांगणारी आहे. एका कादंबरीवर आधारित असलेली ही सिरीज आधुनिक काळातील सर्वात चांगली, फास्ट रहस्य कथा असल्याचं कित्येक प्रेक्षकांनी आपलं मत आयएमडीबी वर नोंदवलं आहे.
‘स्काय कॅसल’ ही कोरियन सिरीज सुद्धा कुटुंबात पालकांना कडून मुलांना वाढवताना होणाऱ्या चुका आपल्याला दाखवते. उच्चभू लोकांचं राहणीमान दाखवणारी ही कथा वरून मजबूत दिसणारे पण आतून कमकुवत असणाऱ्या नात्यांचा उल्लेख करते. ‘सोशल प्रेशर’ मुळे काही परिवारांमध्ये किती गोष्टींचा दिखावा केला जातो हे ही सिरीज आपल्या मधुर भांडारकर यांच्या एखाद्या रिअलिस्टिक सिनेमाप्रमाणे आपल्या समोर ठेवते.
रॉयल कोरियन ड्रामा
सामान्य माणसांच्या जीवनातील कथा, घटनांना छोट्या पडद्यावर स्थान देतांनाच ‘के-ड्रामा’ सिरीज या राजे, राजवाडे यांच्या ‘रॉयल फॅमिली’ मध्ये सुरु असलेल्या राजकारणाची सुद्धा बाजू दर्शवते. ‘अंडर द क्विन्स अंब्रेला’ या सिरीजमध्ये निर्मात्यांनी एका आईचं आपल्या मुलांवर असणारं प्रेम आणि त्यांना वाढवताना तिला सामना कराव्या लागणाऱ्या घटना या खूप संवेदनशीलपणे दाखवल्या आहेत.
कोरियन सिनेमा
‘के-ड्रामा’ हा लोकप्रिय होण्यासाठी केवळ त्यांच्या वेबसिरीजच नाही तर सिनेमांचा कंटेंट सुद्धा कारणीभूत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘मेलो मुव्ही’चा टिझर देखील प्रेक्षकांना असाच फ्रेश कंटेंट असणारी प्रेमकथा वाटत आहे. भारतीयांमध्ये देखील लोकप्रिय असलेला ‘चोई वू शीक’ हा सिनेमाचा नायक असणार आहे.
’20थ सेंच्युरी गर्ल’ हा सिनेमा सुद्धा रोमँटिक पठडीतला आहे. 17 वर्षांची एक मुलगी जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडते तेव्हा ती जगाकडे कशी बघते ? आणि जग तिच्याकडे कसं बघतं ? हे या सिनेमातून खूप सुंदर आणि तितक्याच हार्ड हिटिंग पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.
‘ट्यून इन फॉर लव्ह’ हा सुद्धा एक रोमँटिक सिनेमा आहे ज्याची कथा ही 1994 मधील आयएमइफ क्रायसिस म्हणजे आंतरराष्ट्रीय मोनेटरी फंड या कोरियामध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याच्या वेळी भेटलेल्या एका जोडप्याची प्रेमकथा आहे.
2003 मध्ये प्रदर्शित झालेला कोरियन सिनेमा ‘द क्लासिक’ देखील ‘मस्ट वॉच’ म्हणून नेहमीच रिकमेंड केला जातो. या सिनेमामध्ये दोन ‘लव्ह ट्रॅगल’ दाखवण्यात आले आहेत. ज्यापैकी एक हा सध्याच्या काळात सुरू आहे आणि एक हा आधी होऊन गेला आहे. दोन कथांचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन हे दिग्दर्शकाने हळुवारपणे दाखवलं आहे.
‘बी विथ य’ हा सिनेमा देखील खूप संवेदनशील आहे, ज्यामध्ये नायिका ही कमी वयात जगाचा निरोप घेते. पण, तिच्या मुलाला आणि पतीला तिचा भास होत असतो आणि एका प्रकारे ती कायम त्यांच्या सोबतच असते.
‘के-ड्रामा’च्या सिरीज, सिनेमांच्या विषयावरून एक लक्षात येतं की, प्रेक्षकांना मनोरंजन म्हणजे फार काही रॉकेट सायन्स नको आहे. साधे, हलकेफुलके विषय निवडा, विषयाशी प्रामाणिक रहा, मध्येच मूळ कथा बाजूला ठेवून वेळ भरवण्यासाठी प्रणय दृश्यांचा मसाला टाकू नका. मायबाप प्रेक्षक तुम्हाला नक्कीच भरभरून प्रेम देतील.