कलाकार होण्यासाठी कलाकारांना करावे लागलेले बदल

Artist: करिअर करण्यासाठी कोणतंही क्षेत्र निवडा, स्वतःमध्ये बदल हे करावेच लागतात. स्वतःची एक सिस्टीम बाजूला ठेवून दुसऱ्याच्या सिस्टीम मध्ये काम करण्यासाठी स्वतःला मोल्ड करावं लागतं.
[gspeech type=button]

“राजीव भाटियाचे सिनेमे हल्ली चालत नाहीत” किंवा “विशाल देवगणचा नवीन सिनेमा कधी येतोय ?” किंवा “अश्विनी शेट्टी इतकी स्लिम आणि फिट कशी आहे ?” अशी वाक्य कानावर पडल्यावर बॉलीवूड जवळून फॉलो न करणाऱ्यांना काही संदर्भ लागणार नाही. या सर्वांची परिचित नावं ही आहेत – राजीव भाटिया म्हणजे ‘अक्षय कुमार’, विशाल देवगण म्हणजे अजय देवगण’ आणि अश्विनी शेट्टी म्हणजे शिल्पा शेट्टी. कधी काळी सामान्य व्यक्तीचं आयुष्य जगणारी ही माणसं काही वर्षांपूर्वी आपली खोटी नावं घेऊन आपल्यासमोर आली आणि कायमची इथलीच झाली. आपलं खोटं किंवा बदललेलं नाव घेऊन ही मंडळी इतक्या आत्मविश्वासाने कशी वावरतात हा सामान्य व्यक्तींना नेहमीच पडणारा एक प्रश्न आहे.

पडद्यासोबत खऱ्या आयुष्यातला खोट्या नावाचा वावर

आपण साधं एखाद्या बस किंवा ट्रेनने आपल्या भावाच्या किंवा बहिणीच्या नावाने प्रवास करत असलो की, “दया, कुछ तो गडबड है” हे आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतं. ही कलाकार मंडळी आपली बँक खाती, पासपोर्ट, आधार कार्ड वगैरे वर असलेली नावं कधी वापरत असतील ? कशी लक्षात ठेवत असतील ? हा देखील एक प्रश्नच आहे. मोठ्या पडद्यावर अस्तित्वात नसलेली पात्र उभी करण्याआधी खऱ्या आयुष्यात खोटं नाव कॅरी करून जगणं ही कलाकारांची जणू एक परीक्षा असते असं आपण म्हणू शकतो.

व्यक्तिमत्त्वाला साजेसं नाव सांगणारे इंडस्ट्रीत तज्ज्ञ

“नावात काय ठेवलंय ?” असं शेक्सपिअर एकेकाळी बोलून, लिहून गेला होता. तेव्हा त्याला हे माहीत नसेल की, काही वर्षांनी बॉलीवूड, हॉलीवूड इंडस्ट्री वगैरे डेव्हलप होतील आणि तिथे तुमचं नाव, त्याला साजेशी इमेज यांचा देखील विचार केला जाईल. बॉलीवूडमध्ये तुमचं नाव हे तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसं आहे की नाही, हे सांगण्यासाठी तज्ज्ञ मंडळी ठाण मांडून बसलेली आहे. हेच कलाकारांना सुचवतात की, ‘फरहान अब्राहम’ हे नाव लोकांच्या तोंडात पटकन बसणार नाही. “तू स्वतःला ‘जॉन’ या नावाने लाँच कर, बघ कसा रातोरात स्टार होशील” आणि प्रेक्षकांना त्यांचा कडक ऍक्शन हिरो जॉन अब्राहम बघायला मिळतो.

दोन आलिया नकोत

आलिया अडवाणी म्हणजेच आजची आघाडीची, लोकप्रिय अभिनेत्री ‘कियारा अडवाणी’ ही देखील आपल्या जन्म नावाने बॉलीवूडमध्ये एंट्री करणार होती. पण, त्यावेळी ‘आलिया भट’ इंडस्ट्रीमध्ये पाय रोवून बसलेली असल्याने तिने ‘कियारा’ हे नाव स्वीकारलं. बॉलीवूडमध्ये बाहेरून एंट्री करतांना या गोष्टींचा जास्त विचार करावा लागतो. तुम्ही जर सेलिब्रिटीचे आपत्य असाल तर प्रेक्षक तुम्हाला ‘तैमुर’ सारख्या नावाने देखील लोकप्रिय करतील, तुमच्याबद्दल क्रेज बाळगतील.

अजय नावाचा सेल्फ ब्रँड

अजय देवगण सारखा अभिनेता जर ‘विशाल’ हे त्याचं स्वतःचं, खरं नाव घेऊन आपल्यासमोर आला असता तर फारसा फरक पडला नसता असं आपण इतक्या वर्षानंतर म्हणू शकतो. पण, त्याच्या निकटवर्तीय आणि पीआर एजन्सीला ते मान्य नव्हतं. त्यांना ‘अजय’ हे नाव छोटं आणि नावात एक ‘पंच’ असल्यासारखं वाटत होतं. आज ‘अजय देवगण’ एक सेल्फ ब्रँड आहे तो या त्याच्या बदललेल्या नावामुळे असा दावा देखील या एजन्सीज् करत असतात.

रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड

तामिळ सिनेमाचा दैवत ‘रजनीकांत’ अर्थात आपला मराठमोळा ‘शिवाजीराव गायकवाड’ देखील छोटी नावं लोकप्रिय होतात याचा दाखला देणारं एक उदाहरण आहे. बस कंडक्टर म्हणून एकेकाळी काम करणारा हा व्यक्ती आपल्या तिकीट काढण्याच्या आणि चिल्लर पैसे बॅगमध्ये टाकण्याच्या स्टाईलने प्रसिद्ध होतो आणि पुढे एक इतिहास घडवतो हे कोणत्याही समीक्षणाच्या पलीकडचं आहे. आपल्या जीवनशैलीत सतत केलेल्या बदलांमुळे, आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन आपलं स्वतःचं एक साम्राज्य निर्माण केल्यामुळे आज जगभरात ‘रजनी उर्फ थलायवा’ सरांचे फॅन्स आहेत.

नावात काहीतरी वेगळेपणा हवा

शिल्पा शेट्टी ही देखील अश्विनी शेट्टी म्हणून प्रेक्षकांसमोर आली असती तर काही फरक पडला नसता असं आपण म्हणू शकतो. पण, 90 च्या दशकांत जेव्हा शिल्पा शेट्टीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा कदाचित ‘अश्विनी’ हे नाव घरोघरी (म्हणजे वाईट नाही) असल्याने एखाद्या ‘स्टार’चं होऊ शकत नाही असं तिच्या एजन्सीला वाटलं असावं. बॉलीवूड कलाकार म्हणजे कोणीतरी फॅन्सी व्यक्तीमत्व ही त्या काळी फार मोठी धारणा होती. आज त्या बाबतीत प्रेक्षकांमध्ये बराच संयतपणा आला आहे. हे ते लोक आहेत ज्यांनी केवळ ते प्रोफेशन निवडलं आहे; ते फार ग्रेट आहेत आणि मी काहीच नाही ही भावना आजच्या पिढीत येत नाही. मूळ नाव हे अगदीच असामान्य असेल तरच आजच्या पिढीतील कलाकार आपलं नाव वगैरे बदलतील असा एक अंदाज आहे.

जय हेमंतचा टायगर

‘जय हेमंत श्रॉफ’ या नावाबद्दल आपण सहमत होऊ शकतो की, हे नाव जॅकी दादाच्या मुलाला शोभून दिसलं नसतं. अथेलेटिक बॉडी आणि फास्ट डान्सर असलेल्या ‘टायगर’ श्रॉफला आणि त्याच्या पीआर एजन्सीला हे नाव त्याच्या इमेजला जास्त साजेसं वाटलं आणि हा ‘हिरोपंती’ वाला स्टार लाँच झाला. एक बातमी अशी देखील आली होती की, जग्गु दादाच्या घरातील एका पाळीव कुत्र्याचं नाव हे ‘टायगर’ होतं जो कायम ‘जय हेमंत’च्या सोबत असायचा आणि त्याच्या आठवणीत हे नाव जॅकी श्रॉफने आपल्या मुलाला दिलं आहे.

कॉलेजमध्ये असताना पालकांनीच बदललं मुलाचं नाव

‘निशांत खुराणा’ची अशीच स्टोरी आहे. कॉलेजमध्ये असतांना “पाणि दा रंग वेख के…” या नितांत सुंदर गाण्याला संगीत आणि आपला आवाज देणाऱ्या आपल्या मुलाला ‘आयुष्मान’ हे नाव जास्त शोभून दिसेल असं त्याच्या पालकांना वाटलं आणि त्यांनी ते बदलून टाकलं. सामान्य माणूस असा कधी विचारही करणार नाही, कारण साधं नावात स्पेलिंग बदलायचं झालं की त्याच्यासमोर आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इथे कराव्या लागणाऱ्या बदलांची यादी समोर येते. एकता कपूर सारखे लोक तर तर सर्रास आपल्या, आपल्या सिनेमा, सिरीयलच्या नावासमोर कोणतंही लेटर जोडतांना बघत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. ‘श्वेता जुमानी’ यांचा या सर्व नाव बदलांमध्ये रोल होता हे देखील आपण सर्व जाणतो.

गौरंगदा

‘गौरंग चक्रबोर्ती’ या बंगालच्या मुलाने आपल्या ‘डिस्को डान्सर’च्या इमेजला साजेसं ‘मिथुन’ हे स्क्रीन नाव आपलंसं केलं आणि प्रेक्षकांमध्ये तो लोकप्रिय झाला. बॉलीवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वी हा मुलगा ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करायचा. आपल्या चंदेरी, सोनेरी रंगांच्या कपड्यांमुळे कायम चमकणारा हा डान्सर जेव्हा अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर आला तेव्हा देखील तितकाच चमकला. उटी मधील हॉटेल्स, टीव्ही शोज् ची निर्मिती, राजकारणात होऊ पहाणारं नाव या सर्वांचं श्रेय गौरंग हे ‘मिथुन’ या नावाला देत असतात.

करिअर करण्यासाठी कोणतंही क्षेत्र निवडा, स्वतःमध्ये बदल हे करावेच लागतात. स्वतःची एक सिस्टीम बाजूला ठेवून दुसऱ्याच्या सिस्टीम मध्ये काम करण्यासाठी स्वतःला मोल्ड करावं लागतं. बॉलीवूडमध्ये काम करतांना मात्र हे बदल जरा जास्त वैयक्तिक होतात, जे की आधी स्वतःला पचवावे लागतात आणि मग एक दुसरी व्यक्ती बनून जगासमोर सादर व्हावं लागतं. ज्यांना हे जमतं ते हा रस्ता निवडतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Seedwomen Rahi Popere : “ज्यात चमक असते, त्यात धमक नसते. जुनं तेच सोनं असतं” याची प्रचिती येऊन पुढच्या पिढीला उत्तम
Fishery : मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय 22 एप्रिल रोजीच्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाच्या निर्णयाची
Mirzapur: महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येत असलेल्या नेरी मिर्जापुर या गावाने शाश्वत विकासाचे वेगवेगळे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ