प्रसूती म्हणजे आईचा दुसरा जन्म म्हणतात. यानंतर प्रत्येक आईची खरी परीक्षा सुरु होते. कारण तेव्हा आईला अगदी तान्हुल्या बाळाची काळजी घेणे, आईची स्वतःची रिकव्हरी आणि मुख्य म्हणजे स्तनपान करणे अशी तारेवरची कसरत करावी लागते. स्तन्य/ आईचे दूधाने (ब्रेस्टमिल्क) बाळाचे उत्तम पोषण होतं, हे आपल्या सगळ्यांना आता माहीतच आहे. पण ह्यामुळे आईलाही अनेक चांगले फायदे होतात.
स्तनपानाचे आईच्या आरोग्यावर होणारे चांगले परिणाम
- आई आणि बाळाचे एकमेकांशी छान नाते निर्माण होते
- आईला डिलिव्हरी नंतर वजन कमी होण्यास मदत होते
- गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते
- भविष्यात डायबिटीस, हृदय विकार आणि ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो
या नाजूक वेळेत बाळाइतकीच आईच्या आहार आणि आरामाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
आईचा आहार
आहाराबद्दल विचार करताना बाळाला दूध व्यवस्थित पुरेल एवढे यावे आणि आईची रिकव्हरी चांगली व्हावी या दोन्ही मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे. बरेच लोकं बाळाला त्रास होईल म्हणून बऱ्याच गोष्टी आईला खाऊच देत नाहीत. असे न करता आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने सर्व आवश्यक पोषणमूल्ये मिळतील आणि आई किंवा बाळाचे आरोग्य चांगले राहील असा आहार घेणे गरजेचे आहे.
पातळ पदार्थ/ काला
डिलिव्हरीनंतर आईची पचनशक्ती फार कमी झालेली असते आणि दूध तयार करण्यासाठी भरपूर पाणी आवश्यक असते. म्हणून पाणी भरपूर प्यावे. दूध पाजायच्या आधी आणि नंतर आईला एक-एक पेला पाणी प्यायला द्यावे. शिवाय गरम गरम सूप, खिरी, कांजी, पातळ डाळ खिचडी, पातळ भाज्या, आमटी, भाकरी आमटीत चुरून इत्यादींचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा.
दूध वाढीसाठी आवश्यक पदार्थ
- शतावरी कल्प : दोन दोन चमचे दुधातून दिवसातून दोन वेळा घ्यावे.
- अळीव/ हलीम- लाडू, खीर
- मेथीचा लाडू, फोडणीत मेथीदाणे घालणे आणि मेथीची भाजी
- सुकामेवा
- राजगिरा
- लसूण, आलं / सुंठ, सुकं खोबरं
- बाजरीची भाकरी, खिचडी, लापशी
- खसखस
- ओवा
- बाळंतशोपा
- खायचं पान/ विडा
- आईला देण्याचे सर्व पदार्थ ताजे केलेले, शक्यतो गरम आणि पचायला हलके असावेत
- हरभरे, हरभरा डाळ, छोले, राजमा यासारखे वातकारक पदार्थ शक्यतो टाळावे
- तळलेले पदार्थ शक्यतो सुरूवातीच्या दिवसात खाऊ नये
- याशिवाय थंड पदार्थ म्हणजे आईस्क्रीम, सरबते, कोल्ड ड्रिंक, मिल्कशेक इत्यादी देणे टाळावे
- प्रेग्नन्सीपेक्षा सुद्धा स्तनपान करणाऱ्या आईला जास्त कॅलरीजची आवश्यकता असते. त्यामुळे तिच्या भुकेनुसार कर्बोदके, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ इत्यादी असलेला समतोल आहार द्यावा
आराम आणि मानसिक आरोग्य
बाळ दर दोन तीन तासांनी दूध पित असल्यामुळे आईला सलग झोप मिळणे कठीण होते. तेव्हा दिवसभरात बाळ जेव्हा झोपेल तेव्हा आईनेही आराम करावा. जेणेकरून रिकव्हरी पटकन होण्यास मदत होईल. डिलिव्हरी नंतर अचानक हार्मोन्स मध्ये होणारे बदल, शिवाय वाढलेली जबाबदारी, अपुरी झोप इत्यादी अनेक कारणांमुळे काही स्त्रियांना नैराश्य येते. यावर उपाय म्हणून बाळाशी जास्तीत जास्त कनेक्ट व्हायचा प्रयत्न करणे, घरच्या माणसांनी आईला आराम करण्यास, बाळा व्यतिरिक्त दिवसातील निदान अर्धा तास तरी तिच्या आवडीच्या गोष्टी करण्यास प्रोत्साहित करावे. अश्या गोष्टी केल्यास हा प्रवास त्या स्त्री साठी अधिक सुकर होऊ शकेल.
आईला दूध पुरेसे येत नसेल किंवा काही कारणांनी बाळाला घेता येत नसेल तर अशा वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने आईच्या दुधाच्या सारखेच बनवलेले फॉर्म्युला दूध बाळाला द्यावे. कधी कधी बाळाला असं बाहेरचं दूध द्यावं लागल्यावर आपण कुठे तरी कमी पडतोय, अशी भावना अनेक स्त्रियांमध्ये येते. परंतु फॉर्म्युला दुधाच्या वेळा पाळणे आणि त्यासाठी लागणाऱ्या स्वच्छतेची काळजी घेणे अधिक जिकरीचे काम आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या बाळासाठी आधीच खूप चांगल्या गोष्टी मनापासून करत आहात, तेव्हा अपराधी वाटून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही.
3 Comments
खुप छान लिहिले आहेस… 😊👍🏻
Good information 👍
प्रत्येक लेख माहितीपूर्ण 👌👌👌👌👌