या वर्षी 2 डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली गावातील श्री वेतोबाचा वार्षिकोत्सव संपन्न झाला. वेतोबा म्हणजे नेमकी कोणती देवता? कोकणाशी संबंध काय? ह्या लेखात समजून घेऊयात.
शिवपुराणातील शिवाचा द्वारपाल!
वेतोबा म्हणजेच वेताळ. प्राचीन संस्कृत साहित्यात येणारी वेताळाची वर्णने त्याला क्रूर डोळ्यांचा, महाकाय, रक्तमांस खाणारा, सदैव युद्धोद्यत आणि शस्त्रधारी म्हणून दर्शवितात. शिवपुराणानुसार वेताळ मूळात शिवाचा द्वारपाल होता. एकदा त्याने दारापाशी आलेल्या पार्वतीला अडवले, म्हणून तिने त्याला ‘तू पृथ्वीवर मनुष्यजन्म घेशील’ असा शाप दिला. अशारीतीने द्वारपाल वेताळरुपाने पृथ्वीवर आला.
शिवदूत ते शिवगण पुराणातील विविध संदर्भ
कालिकापुराणात वेताळाच्या उत्पत्तीसंबंधी वेगळी कथा येते. वेताळ हा पूर्वजन्मी भृङ्गी नावाचा शिवदूत होता. पार्वतीने शाप दिल्याने तो आणि त्याचा महाकाल नावाचा भाऊ, या दोघांनी पृथ्वीवर अनुक्रमे वेताळ व भैरव म्हणून चंद्रशेखर राजाची राणी तारावती हिच्या पोटी जन्म घेतला. हे दोन पुत्र तारावतीला शंकरापासून झाले होते. त्यामुळे चंद्रशेखर हा त्यांचा पालक-पिता असल्याने हे दोघे चंद्रशेखराचे औरस पुत्र म्हणून मानले जात नव्हते. शेवटी चंद्रशेखराने आपली सर्व संपत्ती आपल्या औरस पुत्रांमध्येच वाटून टाकल्यामुळे वेताळ व भैरव तप करण्यासाठी अरण्यात गेले. पुढे वसिष्ठ ऋषींच्या कृपेने त्यांना शिवाचे दर्शन घडले आणि कामाख्या देवीच्या अनुग्रहाने त्यांना शिवगणात स्थान मिळाले. अशा रीतीने वेताळ शिवगण म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय तो भूत, प्रेत आणि पिशाचांचा अधिपतीही मानला जातो. सध्या वेताळ ग्रामदेवता म्हणून भारताच्या विविध भागात पूजला जातो.
वेताळ म्हणजेच वेतोबा
वेताळाचे वैशिष्ट्यपूर्ण रूप तळकोकणात आढळते. तळकोकणात वेताळ वेतोबा म्हणून प्रसिद्ध आहे.
मराठी भाषेत काही नामांना आदर किंवा जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी ‘बा’ हा प्रत्यय लागतो. किंवा काही वेळा भीतीदायक नामांना ‘बा’ हा प्रत्यय लावून त्यांचे सौम्य आणि भीती असे दोनही आयाम दर्शविले जातात. उदाहरणार्थ वाघोबा. असेच काहीसे वेतोबा ह्या त्याच्या नावाबद्दल सांगता येईल. वेतोबा नाव वेताळाचे सौम्य आणि संरक्षक रूप दर्शविते.
मध्यरात्री गावात पेट्रोलिंग
तळकोकणात वेतोबा राखणदार आणि संकट निवारक म्हणून पिढ्यान पिढ्या भक्तांचे श्रध्दास्थान आहे. हातात दंड आणि खांद्यावर घोंगडी घेऊन तो मध्यरात्री गावाचे रक्षण करित गावातून हिंडतो, अशी लोकसमजूत आहे. त्यामुळे तळकोकणात गावोगावी वेतोबाची मंदिरे आढळतात. त्यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे वेंगुर्लेपासून १२ कि.मी. अंतरावरील आरवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा.
आरवलीचे दुमजली प्रशस्त मंदिर
वेतोबाचे मंदिर प्रशस्त आणि दुमजली असून कोकणात आढळणा-या शैलीचे आहे. फार पूर्वी ते लाकडी असावे असे वाटते मात्र कालौघात त्याचा जीर्णोध्दार झालेला आढळून येतो. सध्या अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. 1660 मध्ये बांधले गेले असे उल्लेख आढळतात. मात्र सभामंडप सुमारे इ.स. 1892 ते 1900 च्या दरम्यान बांधला गेला आहे. देवालयाचा नगारखाना तीन मजल्यांचा आहे.
फणसाचे लाकूड गावात वापरात नाही!
कोकणात वेताळाच्या मूर्ती काष्ठाच्या, मुख्यत्वे करून फणसाच्या लाकडाच्या असतात. मात्र काष्ठाच्या विग्रह सततच्या पूजेमुळे झिजत असल्याने कालौघात ते दगडांत किंवा धातूंत घडवले गेले. आरवलीत पूर्वी वेतोबाची मूर्ती फणसाच्या लाकडाची होती. म्हणून गावात फणसाचे लाकूड बांधकामात व इतर व्यवहारात वापरत नाहीत असे स्थानिक सांगतात. सध्या असलेली मूर्ती नऊ फुटाची उंच असून काळ्या पाषाणाची 1996 मध्ये घडवून घेतलेली आहे. ही मूर्ती भव्य मानवाकृती असून समपाद मुद्रेत आहे. तिला शुभ्र धोतर नेसवले जाते. वेतोबा द्विभुज असून त्याच्या उजव्या हातात खड्ग असून डाव्या हातात कणीपात्र आहे. मूर्तीच्या चेह-यावरील भाव प्रसन्न, आश्वासदायक पण तरीही भीतीदायक आहे. हेच ते वेतोबाचे सौम्य आणि भीती असे दोनही आयाम दाखवणारे रूप.
वेतोबाला सालईच्या पानांनी कौल
गावाचा राखणदार आणि संकट निवारक असल्याने कोठत्याही कामाचा आरंभ आणि समस्यांचे निवारण वेतोबाला कौल लावून केले जाते. कोकणात कौल लावण्याची प्रथा रूढ आहे. त्यानुसारच वेतोबाला कौल लावला जातो. त्यासाठी सालई झाडाची 33 पाने वापरतात. वेतोबाच्या जागृत असण्याच्या आणि कौल देण्यावर भाविकांचा फार श्रध्दा आहे आणि ह्या श्रध्दा सांगणा-या विविध कथा भाविक वेळोवेळी आळवतात.
चपलाचे जोड आणि केळ्याचे घड
वेताळाच्या दैवतशास्त्रानुसार वेतोबा रात्री पूर्ण गावभर, गावाचे रक्षण करित फिरत असतो. परिणामी त्याचे जोडे झिजतात. म्हणून वेतोबाला दीड ते दोन फूट लांबीचे चामड्याचे जोडे अर्पण केले जातात. ही जोडे अर्पण करण्याची प्रथा नवस प्रथेशी जोडली गेल्यामुळे आता नवस पूर्ण झाल्यावर भक्त वेतोबाला जोडे अर्पण करतात. मंदिरात नवसाच्या जोडांचा ढीग दिसतो. वर्षातून दोनदा, कार्तिक शुध्द पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमेस हे वेतोबाच्या जत्रेचे दिवस आहेत. वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य प्रसिद्ध आहे.