गेल्या भागात आपण जागतिक हवामानाचं वर्गीकरण कसं केलं जातं आणि त्याचा उपयोग आपल्या आजूबाजूचा निसर्ग समजून घेण्यासाठी कसा होऊ शकतो ते पाहिलं. आपल्याकडील वातावरणात कशाप्रकारची जैवविविधता तयार होणं सहज शक्य आहे ते कळलं की, डिझाईन स्ट्रॅटेजी ठरवणं सोपं होतं. आज मूल्यमापन करण्यासाठी महत्वाचे असलेले आणखी काही घटक पाहूया.
- समुद्रकिनाऱ्यापासून अंतर
आपल्या ठिकाणाचं समुद्रकिनाऱ्यापासून किंवा इतर मोठ्या जलाशयापासून असलेलं अंतर, हवामानावर मोठा बदल घडवतं. समुद्राचे खारे वारे दिवसभरातील तापमानात होणारे चढउतार कमी करतात. हवेतील आर्द्रता वाढवतात. वनस्पतींच्या पानांवर आणि एकूणच प्रत्येक पृष्ठभागावर मीठाचा थर जमा करतात. वर्षभराचं सरासरी तापमान, आर्द्रता, पाऊस, वारा हे सर्व जसजसं समुद्रापासून दूर जाऊ तसतसं बदलत जातं. वातावरण कोरडं होत जातं.
- सूर्याची दिशा
सूर्याचा प्रकाश उत्तरायणात व दक्षिणायनात वेगवेगळ्या कोनातून पृथ्वीवर येत असतो. सूर्योदय आणि सुर्यास्ताची वेळ रोज बदलत असते. त्यासोबतच दिवसातून किती तास सूर्यप्रकाश उपलब्ध असेल ते बदलतं, ज्याचा थेट परिणाम वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषणावर, दिवसभरातल्या उष्णतेवर होतो. कोणत्या दिशेला कोणती वास्तू असावी आणि कोणत्या वनस्पती असाव्यात इत्यादी गोष्टी ठरवण्यासाठी सूर्याच्या दिशेची नोंद घेणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या वेबसाईटवर पृथ्वीच्या पाठीवर कुठेही कोणत्याही ऋतूत सूर्यप्रकाश कोणत्या दिशेने येईल आणि सूर्योदय व सूर्यास्त नेमका कोणत्या वेळी होईल, म्हणजेच दिवसातून किती वेळ सूर्यप्रकाश उपलब्ध असेल हे पाहता येईल:
- नैसर्गिक आपत्तीप्रवण क्षेत्र
तुम्ही जिथे आहात तिथे विध्वंसक नैसर्गिक संकटं येण्याची शक्यता किती आहे? ह्याची माहिती घेणेही महत्वाचं असतं. म्हणजे संकटाचा सामना करण्यासाठी आधीच तयारी करता येते. उदा. जपानच्या किनाऱ्यावर त्सुनामी येऊ शकतात. ज्या भागात टेल्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर घासत असतात, अशा ठिकाणी मोठे भूकंप येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ आपला उत्तरेकडील हिमालयाचा भाग किंवा रिंग ऑफ फायर ह्या नावाने ओळखला जाणारा प्रशांत महासागराभोवतीचा भूभाग. ह्या भागामध्ये काही जिवंत ज्वालामुखीही आहेत.
मोठ्या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात पूर येण्याची शक्यता जास्त असते तर हिमालयासारख्या अस्थिर पर्वतात भूस्खलनाचा धोका जास्त असतो. ह्याव्यतिरिक्त काही ठिकाणी मोठमोठे वणवे लागण्याचीही शक्यता असते तर काही ठिकाणी बर्फ किंवा प्रचंड थंडी पडण्याची.
जागतिक हवामान समजून घेतल्यावर आपण आणखी जवळून आपल्या जागेकडे पाहू शकतो. ही जागेच्या मूल्यमापनातली दुसरी पायरी.
2.स्थानिक भूगोल आणि हवामान:
- भूरूपे (Landform)
आपलं शेत एखाद्या टेकडीवर आहे की पठारावर, समुद्र किंवा नदीजवळ आहे की डोंगराच्या पायथ्याशी, जमीन तीव्र उताराची आहे की समतल ह्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. शेत एखाद्या टेकाडावर असेल तर उतार पूर्वेकडे आहे की पश्चिमेकडे ह्यावर तिथे किती ऊन पडेल, सकाळचं, संध्याकाळचं तापमान किती असेल, वारा कसा वाहील हे ठरते.
उदा. आमची एक शेतजमीन डोंगरावर आहे, तर एक गावाच्या खालच्या बाजूला, जिथे संपूर्ण गावाचा पाणलोट जमा होतो तिथे आहे. दोन्ही ठिकाणी पाऊस जरी साधारणपणे सारखाच पडत असला तरी डोंगरावर असलेल्या शेताची धूप मोठ्या प्रमाणावर होते, पाणी साचून राहत नाही. तर खालच्या शेतात वर्षानुवर्षे प्रत्येक पावसाळ्यात येत राहिलेल्या पुरामुळे गाळाच्या मातीचा खोल थर तयार झाला आहे. उतार कमी असल्याने जमिनीची धूप त्यामानाने कमी होत असली तरी संपूर्ण पावसाळा जमिनीत खूप पाणी साचून राहतं. पावसाळ्यात एक दोनदा पूर येतो. डिझाईन करताना ह्या गोष्टींचा विचार आवश्यक असतो.
- पाणलोट क्षेत्र
प्रत्येक जागेवर पावसाचं पाणी कोणत्या दिशेने, कसं आणि किती वाहणार आहे हे अभ्यासणे गरजेचे आहे. ह्यासाठी जागेचा Contour line Map (समुद्रसपाटीपासून समान उंचीवर असणाऱ्या उंचवट्यांना जोडणारी काल्पनिक रेषा) असणे उपयुक्त ठरतं. पाणी नेमकं कुठे, कशाप्रकारे अडवता/खेळवतां येईल, पाणी जमिनीत मुरवायचं की त्याला माती वाहून जाणार नाही अशा पद्धतीने बाहेर काढायचं, पूर येण्याची शक्यता किती आहे किंवा आपल्या शेतात नक्की कुठे पाणी उपलब्ध होऊ शकेल हे कंटूर नकाशावरून कळतं. त्याचबरोबर आपलं शेत पाणलोट क्षेत्रात नेमकं कुठे आहे ह्यावरुन माती कशाप्रकारची असू शकेल ह्याचा अंदाज येतो.
जागेचा सर्वे करून देणाऱ्या व्यक्ती एक फूट किंवा एक मीटर ग्रेडियंट असलेला कंटूर नकाशा काढून देऊ शकतात. www.contourmapgenerator.com सारख्या काही वेबसाईट्सवरून आपणही आपल्या जागेचा कंटूर नकाशा काढू शकतो. उदाहरण म्हणून खाली ह्या साईटवरून बनवलेला एक कंटूर नकाशा दाखवला आहे.
एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे जमिनीला उतार जेवढा तीव्र तेवढ्या कंटूर नकाशातल्या रेषा जवळजवळ येतात. आपल्या गरजेप्रमाणे ग्रेडियंट सेट केला की आपण हवा तसा नकाशा मिळवू शकतो. स्वेल्स, ट्रेंच, बंड्स, वगैरेंची रचना करण्यासाठी ह्याची मदत होते.
- माती
कोट्यावधी वर्षांच्या भौगोलिक, जैविक आणि रासायनिक प्रक्रियांमधून माती घडत असते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न प्रकारचे भौतिक, रासायनिक गुण असलेली माती पाहायला मिळते. घाटावरची काळी माती, उत्तर कोकणातली मुरूम, तळकोकण आणि गोव्यात असलेली लाल माती, गंगेच्या किनारी असलेली गाळाची माती ही काही वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे. ह्या प्रत्येक प्रकारच्या मातीचे काही विशिष्ट गुण असतात. मातीचा रंग, टेक्स्चर (म्हणजे मातीतल्या मोठ्या, मध्यम आणि लहान कणांचा आकार आणि प्रमाण किती आहे), कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, pH, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इत्यादी गोष्टी वेगवेगळ्या असतात. ह्या व्यतिरिक्त मातीत किती ऑर्गनिक कार्बन आहे, सूक्ष्मजीवाणूंचे प्रकार आणि संख्या किती आहे, रॉक फॉस्फेट सारख्या एखाद्या घटकांची कमतरता (जी फार कमी ठिकाणी आढळते) किंवा चुनखडी प्रमाणापेक्षा अधिक आहे का इत्यादी माहिती आधीच घेतली तर माती समृद्ध आणि सुपीक बनविण्यासाठी नेमकं काय करावं लागेल ते कळतं.