वाघ शिकार कशी करतात तुम्हाला माहीत आहे का? त्यांची डरकाळी ऐकूनच अंगावर शहारे येतात. वाघ शिकार करतात तेव्हा फक्त दात आणि पंजा वापरत नाहीत. ते शिकारीसाठी त्यांचा जिभेचादेखील वापर करतात. त्यांची जीभ नुसती चवीसाठी नसते, तर शिकार फाडण्यापासून ते स्वतःला स्वच्छ ठेवण्यापर्यंत अनेक गोष्टी करते. चला तर मग, वाघाच्या जिभेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आपल्याला वाटतं की वाघ शिकार पकडतात आणि दात व पंजाने फाडतात. पण, ते शिकार कापण्यासाठी त्याच्या जिभेचा वापर करतात. जीभेने चाटून मांस आणि हाड वेगळी करतात. ऐकायला थोडं विचित्र वाटेल,पण हे खरं आहे. त्यांची जीभ एक खास हत्यारच असते.
वाघाच्या जीभेवरील पॅपिली ‘papillae’
तुम्ही जर कधी वाघाची जीभ जवळून पाहिली, तर तुम्हाला दिसेल की त्यांच्या जिभेवर शेकडो छोटे-छोटे, काटे असतात. या काट्यांना पॅपिली (Papillae) म्हणतात. हे पॅपिली आपल्या घरातल्या घासणीसारखे किंवा उलटे केलेल्या हुकसारखे दिसतात. हे काटे आपल्या नखांमध्ये असणाऱ्या ‘केराटिन’ प्रथिनापासूनच तयार झालेले असतात. म्हणूनच ते इतके मजबूत आणि खरखरीत असतात.
या काट्यांचा उपयोग काय?
जेव्हा वाघ एखाद्या प्राण्याची शिकार करतो आणि शिकारीला चाटतो, तेव्हा हे काटे त्याला शिकारीच्या शरीरावरून केस, पंख किंवा मांस सहजपणे काढून टाकायला मदत करतात. आपण जेव्हा चिकन खातो, तेव्हा लेगपीसमधून किंवा बकऱ्याच्या मांसातून काही भाग पूर्णपणे काढू शकत नाही, तो तसाच राहतो. पण वाघ त्याच्या जिभेचा वापर करून शिकारीचा प्रत्येक तुकडा, अगदी जो भाग थेट खाल्ला जात नाही तोही, व्यवस्थित खाऊन घेतो. त्यांची जीभ एका किसणीसारखीच काम करते.
पण, जेव्हा वाघीण आपल्या लहान पिल्लांना चाटते, तेव्हा ती अगदी हळूवारपणे आणि प्रेमाने चाटते. तेव्हा हे काटे पिल्लांना अजिबात लागत नाहीत.
हेही वाचा ‘अँटीबायोटिक रेझिस्टन्स’वर बेडकाची त्वचा गुणकारी !
आवश्यकतेनुसार पॅपिलीचा वापर
जेव्हा वाघ चालत असतो किंवा आराम करत असतो, तेव्हा त्याचे हे पॅपिली जिभेवर आतल्या बाजूला वळलेले असतात. त्यामुळे त्याला काही त्रास होत नाही. पण जेव्हा वाघ शिकार पकडण्यासाठी लढत असतो किंवा ते खात असतो, तेव्हा हे पॅपिली बाहेर येतात आणि त्यांचं काम करतात. हे वाघाच्या जिभेचे एक खास वैशिष्ट्य आहे. त्याला विविध कामांसाठी त्याची जीभ लवचिकपणे वापरता येते.
केवळ शिकारीसाठी नाही तर स्वच्छतेसाठीही जिभेचा उपयोग
वाघाची जीभ फक्त शिकार करण्यासाठी किंवा खाण्यासाठी वापरली जात नाही. हीच जीभ वाघाला आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी देखील मदत करते. तुम्ही कधी मांजरीला स्वतःला चाटून साफ करताना पाहिलंय का? अगदी तसंच, वाघसुद्धा स्वतःला चाटून साफ करतो.
वाघ जेव्हा स्वतःला चाटून साफ करतो, तेव्हा त्याच्या शरीरावरील धूळ आणि तुटलेले केस निघून जातात. तसेच, त्याच्या शरीरावर असलेलं नैसर्गिक तेल पूर्ण अंगावर पसरतं. यामुळे वाघाचं शरीर पाण्यापासून सुरक्षित राहतं. हे तेल त्याच्या त्वचेला आणि केसांवर एक सुरक्षा कवच तयार करतं. यामुळे वाघ ओलावा आणि थंडीपासून वाचतो. वाघ आपल्या जिभेचा उपयोग अन्नाला लहान तुकड्यांमध्ये तोडण्यासाठीही करतो. जर त्याने एखाद्या पक्ष्याची शिकार केली असेल, तर त्याचे पंख काढण्यासाठी जिभेचा वापर करतो. वाघाची जीभ त्याच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे.
वाघाची ताकद
वाघाची चावण्याची ताकद इतकी जास्त असते की तो हाडही सहज फोडू शकतो. त्याचे पंजे इतके तीक्ष्ण असतात की ते सहज काहीही फाडू शकतात. पण, जर एखाद्या मैत्रीपूर्ण वाघाने तुम्हाला चाटले, तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. पाळीव मांजरींसारखेच, वाघसुद्धा अनेकदा त्यांच्याच प्रजातीच्या इतर वाघांना किंवा ज्या माणसांची त्यांना सवय झाली आहे, ज्यांना ते ओळखतात अशा व्यक्तींना वाघ प्रेमाने चाटतात, आक्रमकतेने नाही.