उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. शहरांमध्ये एसी, कूलर आणि फ्रिजची सोय असल्याने लोकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळतो. पण गावाकडच्या भागात अजूनही वीजेची समस्या कायम आहे. सततच्या लोडशेडिंगमुळे तिथल्या लोकांना उन्हाळ्यात खूप त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर अन्न देखील लवकर खराब होतं आणि थंड पाण्याची तर बातच नका विचारू.
पण आपल्या पूर्वजांनी या समस्येवर एक साधा सोप्पा आणि मस्त उपाय शोधला होता तो म्हणजे मातीचा माठ. आजही हा ‘मातीचा फ्रिज’ म्हणून ओळखला जातो आणि अनेक ठिकाणी अजूनही त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात.
मातीचा फ्रिज म्हणजे काय?
आजच्या आधुनिक फ्रिजसारखाच, पण लाईटशिवाय चालणारा आणि नैसर्गिक थंडावा देणारा मातीचा फ्रिज म्हणजेच मिट्टीकूल फ्रिज. हा पारंपरिक फ्रिज पूर्णपणे मातीपासून बनवला जातो आणि त्याला कोणतीही वीज लागत नाही. त्यामुळे याचा उपयोग जास्त करून जिथे वीज उपलब्ध नाही किंवा वीजपुरवठा नियमित नाही अशा भागांमध्ये जास्त होतो.
मातीचा फ्रिज कसा बनतो?
या फ्रिजमध्ये दोन मातीची भांडी वापरली जातात. एक मोठं आणि दुसरं त्यापेक्षा थोडं लहान.
मोठ्या भांड्यात लहान भांडं ठेवतात आणि दोन्ही भांड्यांच्या मध्ये ओली वाळू भरली जाते. ही वाळूच या फ्रिजमध्ये थंड हवा तयार करायचं काम करते.या वाळूत असलेलं पाणी हळूहळू वाफ बनून उडून जातं. आणि पाण्याची वाफ होताना ती आतल्या भांड्यातली गर्मी शोषून घेते. त्यामुळे आतलं भांडं थंड राहतं. याच नैसर्गिक थंड प्रक्रियेमुळे आत ठेवलेलं अन्न, फळं, भाज्या, दूध आणि पाणी जास्त काळ थंड आणि ताजं राहतं.
या मातीच्या फ्रिजचे फायदे काय आहेत?
या उन्हाळी जुगाडचा म्हणजेच मातीच्या फ्रिजचा आणखी एक फायदा म्हणजे तो खूप स्वस्त आहे. महागडे इलेक्ट्रिक फ्रिज घेणं सगळ्यांनाच परवडत नाही. पण मातीचा फ्रिज बनवण्यासाठी लागणारे सामान अगदी कमी पैशात मिळतं.
हा फ्रिज बनवण्यासाठी माती, वाळू आणि पाणी वापरतात. या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत आणि सहज मिळतात. त्यामुळे हा फ्रिज पर्यावरणासाठी पण खूप चांगला आहे. तसंच या फ्रिजला वीज लागत नसल्यामुळे लाईट बिलचा खर्च वाचतो.
मातीच्या माठातलं पाणी प्यायला खूप गोड आणि चवीच लागतं. यामध्ये नैसर्गिक पद्धतीने अन्न थंड राहते. यामुळे अन्नाची चव आणि त्यातील पोषक तत्वे देखील टिकून राहतात.
शहरी लोकही या नैसर्गिक थंडाव्याच्या उपायाकडे वळत आहेत. खास करून शहरात ज्यांना आपल्या घरात वीजेवर चालणाऱ्या गोष्टी कमी करायच्या आहेत, ते मातीचा फ्रिज वापरायला लागले आहेत.
मातीच्या फ्रिजची काळजी कशी घ्यायची
मातीच्या फ्रीजमधली वाळू सतत ओली ठेवणं गरजेचं आहे. तसंच जास्त उष्णतेच्या काळात भांड्याची बाहेरची बाजू ओली ठेवावी लागते जेणेकरून थंडावाची प्रक्रिया सुरू राहील.