आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण हसतो खूप, पण मोकळेपणानं रडतो कुठे? ऑफिसमध्ये बॉस समोर हसू आणतो, मित्र मैत्रिणींच्या गप्पांमध्ये हसतो, सोशल मीडियावर हसण्याचे इमोजी पाठवतो. पण रडण्यासाठी मात्र आपण जागा शोधतो. कधी टॉयलेटमध्ये जाऊन रडतो, गाडीत बसून रडतो तर कधी गॉगल लावून रडतो. जेणेकरून कुणाला कळणार नाही. आपलं रडणं आपण इतकं लपवतो, जसं काही ती एक खूप मोठी चूक आहे.
पण, यासाठीच मुंबईत एक अनोखा ‘क्राईंग क्लब’ सुरू झाला आहे. जिथे तुम्ही मनमोकळेपणाने रडू शकता, तुमचा मन हलकं करू शकता. तिथे तुम्हाला कुणी जज करणार नाही. चला, या क्लबबद्दल आणि ‘रडण्या’च्या या अनोख्या कल्पनेबद्दल जाणून घेऊया.
क्राईंग क्लबची कल्पना कुठून आली?
या क्राईंग क्लबची कल्पना जपानमधून आली आहे, जिथे याला ‘ruikatsu’ (रुइकात्सु) म्हणतात. याचा अर्थ ‘अश्रूंचा शोध’ किंवा ‘अश्रूंचा अभ्यास’ असा होतो. जपानमध्ये लोक एकत्र येतात, इमोशनल चित्रपट पाहतात किंवा हृदयस्पर्शी कथा ऐकतात आणि मनसोक्त रडतात. त्यांच्या मते, रडणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती एक नैसर्गिक गोष्ट आहे, जी शरीरासाठी खूप चांगली आहे.
विज्ञान काय म्हणतं?
विज्ञानानेही हे सिद्ध केलं आहे की रडणं हे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
स्ट्रेस हार्मोन कमी होतात: जेव्हा आपण खूप तणावात असतो, तेव्हा आपल्या शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो. रडल्यामुळे या हार्मोनची पातळी कमी होते आणि आपल्याला शांत आणि हलकं वाटतं.
विषारी पदार्थ बाहेर पडतात: संशोधनात असं आढळलं आहे की भावनांमुळे जे अश्रू बाहेर येतात, त्यात तणावाशी संबंधित काही विषारी रसायनं असतात. याचा अर्थ, आपण जेव्हा रडतो, तेव्हा आपलं शरीर अक्षरशः तणाव बाहेर काढून टाकतं.
भावनिक स्पष्टता मिळते: रडल्यामुळे आपल्याला आपल्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजतात आणि मनाला एक प्रकारची स्पष्टता मिळते.
समाजात रडण्याबद्दलचे नियम
आपल्या समाजात रडण्याबद्दल काही अलिखित नियम आहेत. लहानपणापासून पुरुषांना बायकांसारखं रडू नकोस, मर्द बनून राहा असं शिकवलं जातं. महिलांनाही ‘इमोशनल’ होऊ नका किंवा भावना लपवा असं सांगितलं जातं. याचा परिणाम असा होतो की आपण आपल्या भावना दाबून ठेवतो, ज्यामुळे मानसिक तणाव वाढतो.
पण हा क्राईंग क्लब याच नियमांना आव्हान देतो. इथे तुम्हाला तुमचा रडण्याचं कारण सांगायची गरज नाही. तुम्हाला फक्त रडायचं आहे आणि मन मोकळं करायचं आहे.
हेही वाचा : पार्टीचा नवा फंडा: खोटं लग्न आणि कॉफी रेव्ह!
‘हसल कल्चर’ विरुद्ध ‘क्राईंग क्लब’
आजकालच्या ‘हसल कल्चर’मध्ये आपण फक्त काम, काम आणि फक्त काम करतो. आपल्याला नेहमीच जास्त काम करा’, ज्यास्त महत्त्वाकांक्षी राहा’ असं सांगितलं जातं. ऑफिसमध्ये फक्त ‘आऊटपुट’ मोजलं जातं आणि भावनांना काहीच महत्त्व दिलं जात नाही. सोशल मीडियावर तर आपण फक्त आनंदी असल्याचा दिखावा करतो.
पण हा क्राईंग क्लब या सगळ्याच्या अगदी विरुद्ध आहे. तो आपल्याला सांगतो की भावना व्यक्त करणं हा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा आपण आपलं दुःख लपवणं बंद करतो, तेव्हा एकटेपणाही कमी होतो. इथे अनोळखी लोक एकत्र बसतात आणि कसलीही लाज न बाळगता रडतात. तुझं दुःख मोठं की माझं, असा काहीच भेदभाव नसतो.
काही लोक या क्लबवर टीका करतात आणि म्हणतात की हा फक्त एक ‘सेल्फ-केअर’चा नवीन व्यवसाय आहे. ते म्हणतात की फक्त रडल्याने मानसिक आरोग्याच्या मोठ्या समस्या सुटणार नाहीत. आणि त्यांचा हा मुद्दा बरोबरही आहे. फक्त रडल्याने सगळ्या गोष्टी ठीक होणार नाहीत. पण, हा क्लब त्या कामासाठी नाहीच.
जगात जिथे आपल्याला नेहमी ‘स्ट्रॉंग’ राहायला सांगितलं जातं, तिथे हा क्लब आपल्याला थोडासा ब्रेक देतो. तो आपल्याला आठवण करून देतो की रडणं ही एक नैसर्गिक आणि मानवी शारीरिक क्रिया आहे.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला रडावंसं वाटेल, तेव्हा एकटं बसून रडू नका. कदाचित तुम्हालाही अशा क्राईंग क्लबची गरज असेल, जिथे तुम्ही मनसोक्त रडून तुमचं मन हलकं करू शकता.