आजकालच्या धावपळीच्या जीवनात टेन्शन, स्ट्रेस आणि डिप्रेशन या गोष्टी खूप वाढल्या आहेत. बऱ्याचदा आपण यासाठी गोळ्या घेतो किंवा थेरपी करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? कोणताही व्यायाम किंवा औषधांपेक्षा डिप्रेशनवर जास्त प्रभावी अजून एक गोष्ट आहे,ती म्हणजे ‘डान्स’. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हे समोर आलंय की, डिप्रेशनवर ‘डान्स’ हा उपाय सर्वात जास्त परिणामकारक ठरतोय.
डिप्रेशन कमी करण्यासाठी गोळ्या किंवा थेरपी घेण्यापेक्षा, डान्स सर्वात उत्तम व्यायाम प्रकार आहे असं हे नवीन संशोधन सांगतंय.
डान्स थेरपी
नृत्य म्हणजे फक्त नाचणं नाही, ते आपल्या भावना व्यक्त करायचं, मनातल्या गोष्टी सांगायचं आणि स्वतःला मोकळं करायचं एक प्रभावी माध्यम आहे. शेकडो वर्षांपासून माणसं नृत्यातून आपलं मन मोकळं करत आली आहेत. आता तर ‘डान्स मुव्हमेंट थेरपी’ म्हणून याचा वापर मानसिक आरोग्यासाठीही केला जातोय.
डान्स थेरपी म्हणजे काय?
यात तुम्ही फक्त नाचत नाही, तर नाचता नाचता तुमच्या मनात काय चाललंय, तुमच्या मनातील भावनांचा तुम्ही शोध घेता. शरीराच्या हालचालीतून तुम्ही स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे ओळखायला लागता आणि यामुळे तुम्हाला बरं वाटतं, तुमचं मन शांत होतं.
संशोधनाचे निष्कर्ष काय सांगतात?
ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी 218 वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास केला. यामध्ये 14 हजार पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. या अभ्यासातून असं दिसून आलं की, डान्समुळे डिप्रेशनच्या लक्षणांमध्ये सातत्याने मोठी घट झाली. चालणे, जॉगिंग, योगा, स्ट्रेंथ ट्रेनिंग यांसारख्या व्यायामांपेक्षा डान्स जास्त फायदेशीर ठरला. इतकंच नाही, तर SSRI औषधं जी डिप्रेशनवर उपचारासाठी वापरतात किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) यांसारख्या प्रमाणित उपचारांपेक्षाही डान्सचा परिणाम चांगला होता.
सगळ्यांना डान्सचा फायदा होतो
या संशोधनाचे निष्कर्ष सर्व वयोगटातील आणि स्त्री-पुरुषांसाठी सारखेच होते. याचा अर्थ डान्समुळे प्रत्येकाचा मूड सुधारतो आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. मग तुम्ही लहान असाल किंवा मोठे, तरुण असाल किंवा वृद्ध, डान्स हा तुमच्यासाठी फायदेशीर आहेच.
डान्स करताना आपलं शरीर आणि मन दोन्ही एकत्र काम करतात. यामुळे नाचताना आपण आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतो.अनेकदा डान्स हा ग्रुपमध्ये किंवा मित्रांसोबत केला जातो. यामुळे लोकांसोबत बोलणं होतं. नवीन मित्र मैत्रिणी बनतात आणि एकटेपणा कमी होण्यास मदत होते. डान्समुळे मेंदूतील काही रसायने ज्यांना न्यूरोट्रांसमीटर म्हणतात ती वाढतात. यामुळे आपला मूड आपोआप चांगला होतो.
डिप्रेशनमध्ये लोक भूतकाळाचा विचार करत बसतात किंवा भविष्याची चिंता करतात. डान्स करताना आपण पूर्णपणे त्या क्षणात असतो, हालचाली आणि संगीतात हरवून जातो. याला ‘प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस’ म्हणतात. डान्स एक प्रकारची ‘सोमॅटिक थेरपी’ असल्याचंही म्हटलं आहे. जी आपल्याला विचारांच्या गर्दीतून बाहेर काढून वर्तमानात आणते.
डान्स थेरपीचे फायदे
डान्स थेरपीमुळे ताण, चिंता कमी व्हायला मदत होते. या थेरपीमुळे तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येतं आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. चिंता कमी करण्यापासून ते आघातातून बाहेर पडण्यापर्यंत आणि आत्मविश्वास वाढवण्यापर्यंत डान्स थेरपी अनेक मानसिक समस्यांवर उपयोगी आहे. या थेरपीमध्ये तुम्हाला एक सुरक्षित आणि आधार देणारं वातावरण मिळतं, जिथे तुम्ही भावनिकरित्या अधिक मजबूत होता.
कधीही उदास वाटल्यास किंवा मूड खराब झाल्यास, तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये एकटेच डान्स करा किंवा मित्रांसोबत एखाद्या पार्टीत जाऊन थिरका. हा आनंदाचा व्यायाम आपल्या मानसिक आरोग्यासाठी एक सोपं आणि खूप प्रभावी साधन आहे.
गोळ्या घेण्याऐवजी किंवा फक्त विचार करत बसण्याऐवजी, तुमच्या आवडत्या गाण्यावर थोडा वेळ डान्स करून बघा. कदाचित यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडेल.