डेन्मार्क हा देश एक अनोखा आणि महत्त्वाचा विषय त्यांच्या मुलांना शिकवत आहे. डेन्मार्क त्यांच्या देशातील लहान मुलांना शाळेत भावनात्मक शिक्षण देत आहे. डेन्मार्कमध्ये 1993 पासून 6 ते 16 या वयोगटातील प्रत्येक मुलासाठी आठवड्यातून एकदा ‘भावनात्मक शिक्षणाचा’ तास घेणं सक्तीचं आहे. या खास पद्धतीमुळे डेन्मार्कमध्ये मुलांना एकमेकांना त्रास देण्याचं प्रमाण खूप कमी आहे.
डेन्मार्कमध्येअभ्यासातील विषयांप्रमाणेच ‘भावनात्मक शिक्षण’ही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं.
‘Klassens tid’ – भावनात्मक शिक्षणासाठी खास वेळ
डेन्मार्कमध्ये शाळेत ‘Klassens tid’ नावाचा एक विशेष तास असतो. हा तास फक्त भावना, मैत्री आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी असतो. या तासात मुलांना अभ्यास किंवा इतर कुठल्याही विषयांचा विचार करावा लागत नाही.
या अभ्यासात मुलं एका वर्तुळात बसतात आणि त्यांच्या आयुष्यातील खऱ्या समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलतात. उदाहरणार्थ, मित्रांसोबत झालेले वाद, कुणाला एकटं वाटत असेल किंवा कुटुंबातील काही अडचणी. या बोलण्यादरम्यान, मुलं एकमेकांचं बोलणं शांतपणे ऐकतात. आणि मदत करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी बोलता-बोलता ते एकत्रितपणे पारंपरिक केकही बनवतात.
ही पद्धत ‘सहानुभूती’ आणि ‘hygge’ (हायग) या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आधारित आहे. ‘hygge’ म्हणजे आरामदायक, शांत आणि आनंदी वातावरण. यातून मुलांना एकमेकांविषयी सहानुभूतीची चांगली सवय लागते.
दयाळूपणा मेंदूला सक्षम बनवतो
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की दयाळूपणा मेंदूला अधिक सक्षम बनवतो. जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल सहानुभूती दाखवतो, तेव्हा आपल्या मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच मेंदूचे नियंत्रण केंद्र हा भाग अधिक सक्रिय होतो. हा भाग आपल्याला महत्त्वाचे निर्णय घेण्यास, स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास आणि योग्य-अयोग्य विचार करण्याची क्षमता देतो. डेन्मार्कमध्ये फक्त दयाळूपणा शिकवत नाहीत, तर तो मुलांच्या मेंदूत रुजवला जातो. यामुळे त्यांची भावनिक आणि बौद्धिक वाढ होते.
या संदर्भात, ड्यूक युनिव्हर्सिटी आणि पेन स्टेट यांनी 750 मुलांचा 20 वर्षे अभ्यास केला. त्या अभ्यासानुसार, ज्या मुलांमध्ये लहानपणी सहानुभूतीचे गुण होते, ती मुलं 25 वर्षांची झाल्यावर ग्रॅज्युएट होण्याची आणि चांगली नोकरी मिळवण्याची शक्यता जास्त होती. नुसते चांगले गुण मिळवण्यापेक्षा सामाजिक कौशल्ये जास्त महत्त्वाची आहेत. ही सामाजिक कौशल्ये ठरवतात की आपण दुसऱ्यांसोबत किती चांगल्या प्रकारे काम करू शकतो. अडचणींमधून कसे बाहेर पडतो आणि आपल्यावर लोक किती विश्वास ठेवतात. डेन्मार्क मुलांना हीच कौशल्ये दर आठवड्याला शिकवतो.
सकारात्मक परिणाम आणि सहकार्याचे महत्त्व
डेन्मार्कच्या या शिक्षण पद्धतीमुळे तिथे मुलांमध्ये एकमेकांना त्रास देण्याचं प्रमाण खूप कमी आहे. केवळ 6.3% मुलांनाच नियमित त्रास होतो, जे युरोपमधील सर्वात कमी दरांपैकी एक आहे.
पारंपरिक शाळांमध्ये आपण नेहमी स्पर्धेला आणि वैयक्तिक यशाला जास्त महत्त्व देतो. पण डेन्मार्कमध्ये सहकार्याला (collaboration) जास्त महत्त्व दिलं जातं. तिथे 60% काम टीममध्ये मिळून केलं जातं. “वैयक्तिक यशापेक्षा सामूहिक यश नेहमीच मोठं असतं” हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे.
शैक्षणिक कौशल्ये करिअर घडवतात, पण सामाजिक कौशल्ये आयुष्य घडवतात. हे डेन्मार्कच्या शिक्षण पद्धतीचं सार आहे. लहानपणीच मुलांना सहानुभूती शिकवली, तर ती त्यांच्या स्वभावाचा एक भाग बनते.
डेन्मार्कमधील विद्यार्थ्यांना वर्गात सर्वात हुशार किंवा बेस्ट बनण्यासाठी शिकवलं जात नाही, तर आपला वर्ग अधिक चांगलाकसा बनेल हे शिकवलं जातं.