गेल्या काही वर्षांत, मधुमेहाचा आजार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतोय. धावपळीचं आयुष्य, व्यायामासाठी नसलेला वेळ आणि आपल्या रोजच्या खाण्यापिण्यातले बदल यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढत आहेत. एकेकाळी फक्त वयस्कर व्यक्तींना होणारा हा आजार आता तरुणांमध्येही सर्रास दिसतोय, इतकंच नाही तर लहान मुलांना आणि अगदी नवजात बालकांनाही मधुमेह होत असल्याचं चित्र आहे.
मधुमेह झाल्यावर आपल्या रक्तातील साखरेची पातळी ही कधी खूप कमी होते, तर कधी खूप वाढते. ही साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना रोज बोट टोचून साखरेची तपासणी करावी लागते. अनेक रुग्णांना तर इन्सुलिनचे इंजेक्शनही घ्यावे लागते. पण आता यावर एक खूप चांगली आणि सोपी पद्धत लवकरच उपलब्ध होणार आहे. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना’ आणि ‘एनसी स्टेट’ येथील शास्त्रज्ञांनी एक ‘स्मार्ट इन्सुलिन पॅच’ तयार केला आहे. हा पॅच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नक्कीच फायदेशीर असेल.
स्मार्ट इन्सुलिन पॅच कसं काम करेल?
स्मार्ट इन्सुलिन पॅच हा दिसायला अगदी एका पैशाच्या नाण्याएवढा छोटा आहे. पण या छोट्याशा पॅचवर शंभरहून अधिक अतिशय बारीक सुया आहेत. या सुया आपल्या पापणीच्या केसांएवढ्या बारीक आहेत. त्यामुळे आपण जेव्हा हा पॅच आपल्या शरीरावर लावू तेव्हा अजिबात दुखणार नाही आणि सुई टोचल्याचं जाणवणारही नाही.
पॅच मधील प्रत्येक लहान सुईत ‘वेसिकल्स’ नावाच्या छोट्या पिशव्या आहेत. या पिशव्यांमध्ये इन्सुलिन भरलेलं असतं. जेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, तेव्हा हा पॅच लगेच ते ओळखतो आणि त्यामध्ये असलेले वेसिकल्स लगेच फुटतात आणि त्यामधलं इन्सुलिन थेट आपल्या रक्तात मिसळतं. तसंच या पॅचमध्ये काही खास एन्झाईम्स आहेत. हे एन्झाईम्स रक्तात वाढलेले ग्लुकोज शोषून घेतात आणि त्यामुळेच वेसिकल्स फुटून इन्सुलिन बाहेर पडतं. तुम्हाला जराही वेदना न होता ही सगळी प्रकिया आपोआप होते.
हेही वाचा: मधुमेहावर औषध! आनुवंशिक बदल केलेल्या गाईच्या दुधात मानवी इन्सुलिन तयार करण्यात आले.
या पॅचचे फायदे काय आहेत?
या स्मार्ट इन्सुलिन पॅचचा वापरामुळे अनेक फायदे आपल्याला होणारा आहेत. रोज बोट टोचून साखर तपासण्याच्या किंवा इंजेक्शन घेण्याच्या त्रासातून आणि वेदनांपासून पूर्णपणे सुटका मिळेल. कारण हा पॅच स्वतःच आपलं काम करतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना रोजच्या किचकट उपचारातून आराम मिळेल. तसंच इन्सुलिनचं प्रमाण कमी-जास्त होण्याची भीती राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मधुमेहामुळे होणाऱ्या गंभीर समस्या जसे की अंधत्व, अवयव निकामी होणं किंवा कोमात जाण्यासारख्या गोष्टी टाळता येतील.
हा पॅच ची खास गोष्ट म्हणजे, रुग्णाच्या वजनानुसार आणि त्यांच्या शरीराला किती इन्सुलिनची गरज आहे त्यानुसार हा पॅच तयार करता येऊ शकतो.
सध्या, उंदरांवर या पॅचची यशस्वी चाचणी करण्यात आली आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले. शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आलं आहे की, माणसांवर या पॅचची चाचणी व्हायला अजून काही वर्षं लागतील. भविष्यात या पॅचचा वापरामुळे जगभरातील लाखो मधुमेहाच्या रुग्णांचं जीवन अधिक सुरक्षित, सोपं आणि कमी वेदनादायक होऊ शकेल.



