सध्या, मधुमेह असलेल्या लोकांना बॅक्टेरियाच्या मदतीने तयार केलेल्या इन्सुलीनवर अवलंबून राहावे लागते. हे इन्सुलीन कॉम्प्लेक्स लॅबोरेटरीमध्ये तयार केले जातात. परंतु, आता एक नवीन संशोधन करण्यात आले आहे, यामध्ये गाईच्या दुधातून इन्सुलीन तयार करता येणार आहे.
गाईंमधील नैसर्गिकरित्या दूध तयार करण्याच्या क्षमतेचा वापर या पद्धतीत करण्यात आला आहे. या पद्धतीनुसार नवी प्रोइन्सुलीन तयार केला जाईल. गाईच्या स्तनांमध्येच हा प्रोइन्सुलीन सक्रिय इन्सुलीनमध्ये रूपांतरित होतो.
इलिनॉय विद्यापीठातील प्राणी वैज्ञानिक मॅट व्हीलर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी अशाप्रकारच्या विशिष्ट गायींचं संकरण केलं आहे. या गायींच्या दुधात मानवी इन्सुलीन मिळते. या संशोधनाचा तपास बायोटेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यामुळे इन्सुलिनच्या पुरवठ्याशी संबंधित समस्या सोडवता येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या, मधुमेह रुग्णांसाठी वापरले जाणारे इन्सुलीन मुख्यतः आनुवंशिक बदलांनी तयार केलेल्या जीवाणू किंवा यीस्टच्या मदतीने तयार केले जाते. जर ही नवीन पद्धत यशस्वी ठरली तर इन्सुलिन उत्पादनात मोठा बदल घडेल.
या संशोधनाने दाखवून दिले की, आनुवंशिक बदल केलेल्या गाईंमध्ये मोठ्या प्रमाणात इन्सुलीन तयार करण्याची क्षमता आहे. संशोधकांनी मानवी डीएनएचा एक भाग, जो प्रोइन्सुलीन तयार करण्यासाठी आवश्यक आहे तो गायीच्या गर्भामध्ये टाकला. यातून जन्म झालेल्या गाईच्या वासराने मोठं झाल्यावर, आपल्या दुधात मानवी इन्सुलिन तयार केले.
गाईच्या दुधाच्या तपासणीत मानवी प्रोइन्सुलीन आणि इन्सुलीन सारखेच गुणधर्म असलेल्या प्रथिनांचे अस्तित्व आढळून आले. तसेच, गाईच्या दुधात प्रोइन्सुलीनचे इन्सुलीनमध्ये रूपांतर झाले असावे, असे संकेतही मिळाले आहेत.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, एक लिटर दुधात इतके इन्सुलिन असते की, त्याने मधुमेह रुग्णाची अनेक वर्षांची गरज भागू शकते. यामुळे भविष्यात विशेष गाईंच्या लहान कळपांमधून मोठ्या प्रमाणात इन्सुलीन उत्पादन करता येईल आणि यासाठी लागणारा खर्च देखील कमी होईल.
सध्याच्या बॅक्टेरियाच्या उत्पादन पद्धतींपेक्षा, या नवीन पद्धतीसाठी अत्याधुनिक सुविधा लागणार नाहीत. मात्र आणखी संशोधन आणि कायदेशीर मान्यता आवश्यक आहेत, तरीही शास्त्रज्ञांना याबाबतीत पूर्ण विश्वास आहे. यामुळे इन्सुलीनचा पुरवठा सहज होईल आणि मधुमेह रुग्णांसाठी औषध सहज उपलब्ध होतील.
व्हीलर यांनी सांगितले, “दुधातून मोठ्या प्रमाणात इन्सुलीन तयार करण्यासाठी गाईंची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. गाईंबद्दल आम्हाला चांगली माहिती आहे आणि हे दुधपालन व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन नाही.”
गाईंच्या दुधातून मिळणाऱ्या इन्सुलीनला शुद्ध करून वापरण्यासाठी योग्य पद्धतीचा उपयोग करणे गरजेचं आहे. तसेच, यासाठी अमेरिकेतील औषध प्रशासनाची मान्यता देखील मिळवणं गरजेचं आहे. त्यानंतरच या इन्सुलीनचा उपयोग जगभरातील मधुमेह रुग्णांसाठी होऊ शकतो.



