आपण सगळ्यांनी पाहिलंय की, एखाद्याचं हाड तुटलं तर ते काही दिवसात औषधोपचार करून पुन्हा जुळवता येतं. आपल्या शरीरात ही नैसर्गिक क्षमता असते. पण दातांच्या बाबतीत तसं होत नाही. कायम आलेला दात पडला किंवा काढावा लागला की तो परत येत नाही. मग दाताच्या डॉक्टरकडे जाऊन खोटे दात बसवावे लागतात. म्हणजे इम्प्लांट्स, ब्रिज किंवा कवळी लावावी लागते. याचा कितीतरी लोकांना त्रास देखील होतो.
पण आता या सगळ्या त्रासावर उपाय मिळाला आहे. जपानमधल्या शास्त्रज्ञांनी एक असं औषध शोधलंय, ज्यामुळे माणसाचे दात नैसर्गिकरीत्या पुन्हा येऊ शकतील. जसं बाळ लहान असताना त्याला वर्षभरात दात यायला लागतात. अगदी तसचं तुमचे दात पुन्हा येणार आहेत. या औषधाची मानवी चाचणी सुरू झाली आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली, तर शास्त्रज्ञांना आशा आहे की, हे औषध 2030 पर्यंत बाजारात येईल. मग दात नसलेल्या सगळ्या लोकांना याचा फायदा होईल
जपानमधील ओसाका शहरात ‘कितानो हॉस्पिटल’ आणि ‘क्योटो युनिव्हर्सिटी’चे शास्त्रज्ञ या औषधावर काम करत आहेत. या औषधामुळे शरीरात लपून बसलेली दात वाढवण्याची क्षमता पुन्हा सक्रीय होते. लहान बाळांना दात येतात तशीच प्रक्रिया मोठ्या माणसांमध्ये घडवून आणली जाते.
प्राण्यांवर यशस्वी चाचण्या
या औषधाची चाचणी आधी उंदीर आणि फेरेट नावाच्या प्राण्यांवर झाली. या प्राण्यांमध्ये दात पुन्हा आले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यावर या औषधाचा कोणताही दुष्परिणाम झाला नाही.
माणसांवर चाचणी कधी सुरू झाली?
सप्टेंबर 2024 मध्ये या औषधाची मानवी चाचणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात 30 ते 64 वयोगटातील 30 पुरुषांवर ही चाचणी करण्यात आली. ज्यांनी किमान एक दात तरी गमावलेला आहे. या चाचणीत औषध IV – Intravenous ने दिलं जातं. 11 महिन्यांच्या या चाचणीदरम्यान औषध किती सुरक्षित आहे, ते किती परिणामकारक आहे हे पाहिलं जात आहे.
कसं काम करेल हे नवीन औषध ?
आपल्या शरीरात काही विशिष्ट प्रोटीन असतात जी दात येण्याची प्रक्रिया थांबवतात.या प्रोटीनवर उपाय केला तर शरीर पुन्हा दात तयार करू शकतं. USAG-1 हे प्रोटीन दातांची वाढ थांबवण्याचं काम करतं. शास्त्रज्ञांनी यामध्ये अडथळा आणणारी अँटीबॉडी तयार केली. यामुळे शरीर पुन्हा दात तयार करायला सुरूवात करतं.
जर या चाचण्या यशस्वी झाल्या, तर कितानो हॉस्पिटल 2 ते 7 वयोगटातील अशा रुग्णांवर उपचार सुरू करेल ज्यांचे किमान 4 दात पडलेले आहेत.
आजकाल अनेक लोक बनावट दात वापरतात. काहींचे ब्रिज असतात, काहींनी इम्प्लांट्स बसवलेले असतात, तर काही जण कवळी लावतात. पण या सगळ्यांना आता नैसर्गिक पर्याय मिळू शकतो. हे औषध जर यशस्वी ठरलं, तर भविष्यात माणसांचे स्वतःचे नैसर्गिक दात पुन्हा उगवू शकतील.
या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. कात्सु ताकाहाशी म्हणतात, “आजपर्यंत दात गमावल्यावर कायमस्वरूपी उपाय नव्हता. लोकांना फक्त कृत्रिम पर्यायांवरच अवलंबून राहावं लागायचं. पण आता लोकांना नैसर्गिक दात पुन्हा मिळू शकतात, अशी आशा आहे.”