आजकाल AI चा वापर सगळेच करतात. आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ChatGPT किंवा असेच एखादं AI टूल असतंच. काहीतरी माहिती शोधायची असेल, निबंध लिहायचा असेल किंवा शाळेचं प्रोजेक्ट असो की एखादं भाषण असो. आपल्यापैकी बरेच जण ChatGPT सारख्या AI टूल्सचा वापर करतोच करतो.
पटापट काम होतंय, मग कशाला जास्त डोकं लावायचं?’ असा आपण विचार करतो. पण एक मिनिट थांबा. ही पटापट मिळणारी सोय आपल्याला काहीसा आळशी तर करत नाहीये ना?
MIT चा अभ्यास काय सांगतो?
अमेरिकेतील MIT (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) या नामांकित संस्थेने नुकताच एक अभ्यास केला आहे. ज्यात ChatGPT वापरणाऱ्या विद्यार्थ्यांवर सखोल अभ्यास करण्यात आला. 4 महिन्यांच्या या अभ्यासात 54 विद्यार्थ्यांच्या मेंदूवर EEG ब्रेन स्कॅन करून पाहिलं गेलं. या स्कॅनमधून मेंदू किती सक्रिय आहे, विचार करताना किंवा काही लक्षात ठेवताना तो कसा काम करतो, हे सगळं तपासण्यात आलं.
काय आढळलं?
- ज्या विद्यार्थ्यांनी लिहिण्याच्या कामांसाठी सतत ChatGPT सारख्या AI टूल्सचा वापर केला, त्यांच्या मेंदूची हालचाल खूप कमी झाली होती.
- त्यांची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता सुद्धा खूप कमी झाल्याचं दिसून आलं.
- याउलट, जे विद्यार्थी माहिती शोधण्यासाठी Google चा वापर करत होते किंवा काहीच साधने न वापरता स्वतःच्या बुद्धीने काम करत होते, त्यांचा मेंदू जास्त सक्रिय होता आणि त्यांची विचार करण्याची क्षमताही चांगली होती.
या अभ्यासाला “द कॉग्निटिव्ह कॉस्ट ऑफ यूजिंग LLMs” असं नाव दिलं आहे. यात असंही आढळलं की, AI वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच लिहिलेलं काम थोड्या वेळानंतर आठवणंही कठीण जात होतं.
मानसिक आळस म्हणजे नेमकं काय?
संशोधकांनी सांगितलं की, जेव्हा आपण सतत AI वर अवलंबून राहतो, तेव्हा आपला मेंदू ‘मला काहीच करायचं नाही’ असा विचार करतो. म्हणजेच विचार न करता सरळ उत्तर घेतलं जातं. आणि त्यामुळे आपला मेंदू सुस्त होतो यालाच त्यांनी ‘मानसिक आळस’ असं नाव दिलं आहे.
ChatGPT मुळे काम पटकन आणि सोपं होत असलं तरी, आपण स्वतः विचार करण्याऐवजी, माहिती गोळा करण्याऐवजी किंवा समस्या सोडवण्याऐवजी AI वर जास्त अवलंबून राहतो. यामुळे आपल्या मेंदूला जास्त काम करावं लागत नाही आणि तो हळूहळू आळशी बनतो.
AI जे उत्तर देतं ते खरंच बरोबर आहे का, हे विचारायची किंवा तपासायची सवयही आपली हळूहळू कमी होते. आपण एकाच प्रकारचे विचार करू लागतो. गंमत म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांनी आधी खूप AI वापरलं, त्यांनी नंतर AI शिवाय काम केलं तरी त्यांच्या मेंदूची सक्रियता कमीच राहिली.
हेही वाचा: एआय तंत्रज्ञानामध्ये बौद्धिक क्षमता नाही !
AI हे ‘मदत’ करण्यासाठी आहे, ‘पर्याय’ म्हणून नाही
या अभ्यासात एक खूप महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. तो म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला कोणतीही मदत न घेता स्वतःच्या बुद्धीने काम केलं, त्यांच्या मेंदूत जास्त सक्रियता होती. पण जेव्हा त्यांना नंतर AI टूल्स दिली गेली, तेव्हा त्यांच्या मेंदूचं काम करण्याची क्षमता आणखी वाढली.
AI हे आपल्या विचारांना मदत करण्यासाठी एक उत्तम साधन आहे, पण ते आपल्या विचारांची जागा घेऊ शकत नाही. जर आपण स्वतः विचार करून, अभ्यास करून आणि आपली बुद्धी वापरून काम केलं आणि AI चा वापर फक्त मदत म्हणून केला, तर ते फायदेशीर ठरू शकतं. पण जर आपण पूर्णपणे AI वर अवलंबून राहिलो, तर त्याचे आपल्या बुद्धीवर आणि शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकाळ वाईट परिणाम होऊ शकतात.