कधी कधी आपल्याला अशा काही गोष्टी समजता ज्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण जातं. रशियामध्ये दूध खराब होऊ नये म्हणून तिथले लोक दुधात चक्क बेडूक ठेवायचे. वाचून थोडं विचित्र वाटतं ना? पण हो, रशियामध्ये अशी एक जुनी पद्धत होती. आणि तिथल्या लोकांना वाटायचं की बेडूक दुधात ठेवला की दूध जास्त दिवस ताजं राहतं. चला तर मग, या इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल जाणून घेऊया..
बेडकाची अँटीबायोटिक शक्ती
अमेरिकेतील काही मोठ्या शास्त्रज्ञांनी या जुन्या रशियन पद्धतीवर संशोधन करायचं ठरवलं. त्यांना जाणून घ्यायचं होतं की यामागे खरंच काही कारण आहे की ही फक्त अंधश्रद्धा आहे. त्यांनी संशोधन केलं तेव्हा त्यांना कळलं की रशियामध्ये एक विशिष्ट प्रकारचा ‘ब्राऊन बेडूक’ (Brown Frog) असतो. या बेडकाच्या त्वचेवर काही खास घटक असतात.
बेडूक हा जिथे ओलसर आणि दमट जागा असते तिथेच असतो. अशा ठिकाणी बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात असतात. हे बॅक्टेरिया बेडकाला आजारी पाडू शकतात, पण या बेडकाच्या त्वचेवरील खास घटक त्याला या जिवाणूंपासून वाचवतात. हे पदार्थ एकप्रकारे नैसर्गिक अँटीबायोटिक असतात. म्हणजे जशी आपण आजारी पडल्यावर औषधं घेतो, तसंच हे बेडकाचं नैसर्गिक संरक्षण कवच असतं.
बेडकाच्या त्वचेत दडलेली 100 औषधं!
शास्त्रज्ञांनी फक्त हे वरवरचं संशोधन केलं नाही, तर त्यांनी अत्याधुनिक यंत्रं वापरून बेडकाच्या त्वचेचा बारकाईने अभ्यास केला. यावेळी त्यांना बेडकाच्या त्वचेमध्ये 76 असे पदार्थ सापडले जे याआधी कोणालाच माहिती नव्हते. आणि आधीचे औषधी घटक मिळून आता जवळजवळ 100 वेगवेगळे औषधी घटक या बेडकाच्या त्वचेत आहेत असं या संशोधनातून कळलं आहे.
हेही वाचा : डासांच्या विनाशासाठी ‘चतुरां’ची मोठी मदत
या औषधांचं वैशिष्ट्य काय?
या 100 पदार्थांपैकी काही पदार्थ तर इतके शक्तिशाली आहेत की, ते आपल्या नेहमीच्या डॉक्टरकडून मिळणाऱ्या अँटीबायोटिक औषधांप्रमाणेच काम करतात. उदाहरणार्थ, ‘सॅल्मोनेला’ (Salmonella) आणि ‘स्टॅफिलोकोकस’ (Staphylococcus) नावाचे जिवाणू हे संसर्गजन्य आजार पसरवतात ते खूप धोकादायक असून त्यांच्यामुळे खूप गंभीर आजार होतात. मात्र या बेडकाच्या त्वचेतील काही घटकांनी या धोकादायक जिवाणूंनाही हरवून दाखवलं असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
‘अँटीबायोटिक रेझिस्टन्स’वर उपाय
सध्या जगभरात एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे ‘अँटीबायोटिक रेझिस्टन्स’ (Antibiotic Resistance) म्हणजे काही जिवाणूंवर आताची अँटीबायोटिक औषधं काम करत नाहीत. कारण ते जिवाणू त्या औषधाविरोधात लढायला शिकले आहेत.
पण या बेडकाच्या त्वचेतील हे नवीन घटक या ‘रेझिस्टन्स’वर मात करू शकतात. आणि भविष्यात या बेडकाच्या त्वचेतून मिळणाऱ्या घटकांमुळे अनेक गंभीर आजारांवर उपचार करणे शक्य होऊ शकते.