तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपल्या डोक्यात चालणाऱ्या विचारांचा आपल्या शरीरावर किती मोठा परिणाम होतो? आपण आनंदी असलो की आपल्याला उत्साह येतो आणि दुःखी असलो की सगळी एनर्जी गेल्यासारखं वाटतं. पण एक गोष्ट जी फक्त विचार नाही, तर आपल्या मेंदूची रचनाच बदलू शकते आणि आपल्याला अधिक आनंदी, शांत आणि सक्षम बनवू शकते, ती गोष्ट म्हणजे ‘कृतज्ञता’.
कृतज्ञता आणि आपला मेंदू
आपल्या मेंदूमध्ये अनेक भाग असतात. त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘प्रीफ्रंटल कॉर्टेक्स’. जो आपल्याला विचार करायला, निर्णय घ्यायला मदत करतो. दुसरा एक भाग म्हणजे ‘लिम्बिक रिजन’, जिथे आपल्या भावना तयार होतात. आपला मेंदू हा एक मोठं नेटवर्क आहे, जिथे अनेक तारा एकमेकांना जोडलेल्या आहेत.
जेव्हा आपण कोणाचे आभार मानतो किंवा आपल्याला मिळालेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल विचार करतो. तेव्हा मेंदूच्या या दोन भागांमधील तारा अधिक मजबूत होतात. याचा फायदा काय होतो? तर, जेव्हा आपल्याला ताण येतो, भीती वाटते किंवा काहीतरी वाईट होतं. तेव्हा आपण लगेच घाबरून न जाता, अधिक शांतपणे विचार करू शकतो. अशावेळी आपला मेंदू नकारात्मक विचारांना लगेच बळी पडत नाही.
उदाहरणार्थ, समजा तुम्हाला परीक्षेचा खूप ताण आला आहे. अशा वेळी तुम्ही कृतज्ञतेचा सराव केला, म्हणजे “माझ्याकडे चांगले शिक्षक आहेत, अभ्यास करायला शांत जागा आहे, माझ्या आई-वडिलांचा मला पाठिंबा आहे” असा विचार केला, तर तुमच्या मनावरचा ताण कमी होतो. भीती कमी होते आणि तुम्हाला सकारात्मक वाटायला लागतं.
कृतज्ञता फक्त मेंदूसाठी नाही तर पूर्ण शरीरासाठी
तुम्ही म्हणाल की, फक्त आभार मानल्याने एवढं कसं होईल? पण विज्ञान सांगतं की कृतज्ञतेचा परिणाम फक्त मेंदूवर नाही, तर पूर्ण शरीरावर होतो.
चांगली झोप: कृतज्ञता तुमच्या मनाला शांत करते, यामुळे तुम्हाला रात्री शांत आणि गाढ झोप लागते.
कोर्टिसोल कमी होतं: ‘कोर्टिसोल’ हे एक ‘स्ट्रेस हॉर्मोन’ आहे. जेव्हा आपण तणावात असतो, तेव्हा हे हॉर्मोन वाढतं. कृतज्ञतेमुळे हे हॉर्मोन कमी होतं.
कार्यक्षम हृदय: कृतज्ञता आपल्या हृदयाच्या ठोक्यांमधील स्थिरता वाढवते. याचा अर्थ आपलं हृदय अधिक कार्यक्षम बनतं आणि शरीराची लवचिकता वाढते.
दररोजची 5 मिनिटे
तुम्हाला वाटत असेल की हे सगळं खूप अवघड आहे. पण तसं नाहीये, कृतज्ञता ही एक अशी सवय आहे जी आपण दररोजच्या आयुष्यात अगदी सहजपणे जोडू शकतो. कसं?
1. रात्री झोपण्यापूर्वी रोज फक्त 5 मिनिटे एका वहीमध्ये आजच्या दिवसातील अशा तीन गोष्टी लिहा, ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटतं. उदाहरणार्थ, ‘आज माझ्या मित्राने मला मदत केली’, ‘मला आज खूप चविष्ट जेवण मिळालं’, ‘आज मी पूर्ण अभ्यास करू शकलो’.
2. तुम्हाला ज्या व्यक्तीने मदत केली, त्यांचे मनापासून आभार माना. ‘थँक्स’ म्हणताना फक्त ओठातून शब्द बाहेर पडू देऊ नका, तर भावनाही व्यक्त करा.
3. सकाळी उठल्यावर लगेच, आजचा दिवस चांगला जाईल आणि आज माझ्याकडे कोणत्या गोष्टी आहेत, ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असा विचार करा.
या छोट्या – छोट्या प्रयत्नांमुळे तुमच्या मेंदूला सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायची सवय लागते. भीती, काळजी किंवा नकारात्मक विचारांपेक्षा तुमचा मेंदू आपोआप चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींकडे वळायला लागतो. कृतज्ञता ही फक्त एक भावना नाही, ती एक शक्तिशाली ‘ट्रेनिंग टूल’ आहे. प्रत्येक वेळी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तुमचा मेंदू खऱ्या अर्थाने बदलतो आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी तयार होतो.



