माणसांच्या उत्क्रांतीचे टप्पे हे खूप विलक्षण आहेत. मानवी उत्क्रांतीमध्ये घडलेले काही बदल ठळकपणे समोर आले तर काही बदलांकडे फारसं लक्ष दिलेलं नाही आहे. असाच एक बदल आहे तो म्हणजे माणसांच्या अंगावरचे केस.
माणसाची उत्क्रांती ज्या सस्तन प्राण्यांपासून झाली, त्या प्राण्यांच्या अंगावर आपल्याला मोठ्या प्रमाणावर केस पाहायला मिळतात. मात्र, माणसाच्या अंगावरच्या केसाच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. आजही माणसांच्या अंगावर काखेखाली, हातावर, पायावर केस आढळतात. मात्र याचं प्रमाण इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे नाहीये.
हा बदल कोणत्याही कॉस्मेटिक सर्जरीमुळे झाला नाही तर, मानव ज्या वातावरणात राहू लागला त्या वातावरणीय बदलामुळे हा बदल घडला आहे. जाणून घेऊयात हे कधी आणि कसं घडलं.
सस्तन प्राण्यांच्या अंगावर केस का असतात?
सस्तन प्राण्यांच्या अंगावर दाट केस असणं ही निसर्गाने त्याला दिलेली एक संरक्षक ताकद आहे. या दाट केसांमुळे त्यांच्या सुंदरतेमध्ये भर पडते. पण त्याही पलिकडे या केसांमुळे त्याच्या त्वचेचं रक्षण होते. यामुळे त्यांना आजुबाजूच्या वातावरणात मिसळता येतं. तसंच आजुबाजूला घडणाऱ्या बदलांची त्यांना पटकन जाणीव होऊन ते सावध होतात.
माणसांच्या शरीरावरचे केस पूर्णपपणे नाहिसे झालेले नाहीत. मात्र त्याचं प्रमाण कमी झालं आहे. माणसाच्या डोक्यावर दाट केस असतात. त्यामुळे आपलं उन्हापासून संरक्षण होतं. तर काखेखाली आणि मांडीवर असलेल्या केसांमुळे त्वचेचं घर्षण होत नाही. तसंच त्वचेचं उन्हापासून आणि घामापासून रक्षण होऊन शरीर थंड राहतं.
हे ही वाचा : आपल्या विचारांची गती किती?
कमी केस म्हणजे जास्त आयुष्य
अश्मयुगात मानव हे प्राण्यांसोबत जंगलात, गुहेत वास्तव्य करत असत. मात्र, काळाच्या ओघात मानव जंगलातून बाहेर पडून उघड्या मैदानी प्रदेशात स्थिरावू लागले. या भौगोलिक प्रदेशात उन्हापासून बचाव करण्यासाठी त्यांना घनदाट झाडीचा आसरा मिळायचा नाही. अशावेळी माणसाच्या शरीरातून घाम बाहेर पडण्यासाठी ग्रंथी विकसीत झाल्या. या ग्रंथीतून घाम बाहेर पडून शरीर थंड राहू लागलं. घाम व्यवस्थित बाहेर पडावा यासाठी शरीरावर जास्त केसांची गरज नव्हती. त्यामुळे शरीरातला थंडावा आणि ओलावा टिकवण्यासाठी आज माणसाच्या शरीरावर आवश्यक एवढेच केस पाहायला मिळतात.
माणसाच्या अंगावरचे केस कमी झाल्यामुळे त्याला आणखीन एक फायदा झाला तो म्हणजे त्याला ‘पर्सिस्टन हंटिंग’ करता येऊ लागलं. या शिकारी पद्धतीमध्ये मानव हा प्राण्यांचा लांब पल्ल्यापर्यंत पाठलाग करु शकतो. खूप उन्हाच्या तडाख्यामुळे एका टप्प्यावर प्राणी थकतो आणि जागीच कोसळतो. पण मानव त्या प्राण्यांची सहज शिकार करु शकतो. माणसाच्या अंगावर केस कमी असल्याने उन्हामुळे त्याला घाम येतो व हा घाम सहजपणे घामग्रंथीतून बाहेर पडतो. त्यामुळे मानवाला हा थकवा कमी जाणवतो.
कमी केसांमुळे माणसांच्या शरीराचे तापमान संतुलीत राहतं आणि त्यांची क्षमता, ताकद ही वाढते. त्यामुळे शरीरावरचे केसांचं प्रमाण कमी होणं हे माणसाला दीर्घकाळ जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरलं.
केसविरहीत होण्याचं मूळ गुणसुत्रांमध्ये
माणसाच्या अंगावरचे केस कमी होण्याचं कारण माणसाच्या जीन्समध्ये सुद्धा आहे. संशोधकांनी खारूताई ते आर्माडिलो या उंदरासारख्या दिसणाऱ्या सस्तन प्राणी आणि कुत्र्यापासून मानवापर्यंतच्या जवळपास 62 सस्तन प्राण्यांच्या जीन्सचं परिक्षण केलं. या संशोधनातून त्यांनी माणसांच्या शरीरावरील केस कमी करणारी जनुके शोधून काढली. यातून त्यांना समजलं की, माणसाच्या शरीरामध्ये आजही केस निर्माण करणारी सगळी जनुके अस्तित्वात आहेत, मात्र ही जनुके क्रियाशील नाहीत. माणसाच्या शरीरामध्ये केस उत्पादित करणारी ही जनुके मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं आहे.
हे ही वाचा : मेंदू तल्लख ठेवायचा आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला!
केस निर्माण करणारी जनुके जीवंत झाली तर…
माणसाच्या शरीरामधली ही जनूके क्रियाशील झाली तर, प्राण्यांप्रमाणे आपल्या शरीरावरही पूर्ण अंगभर केसांचा जाड थर येऊ शकतो. मात्र, मृतावस्थेत असलेली जनुके जीवंत होण्याची घटना सहज घडत नाही. असं काही घडलं तर त्याला विज्ञानाच्या भाषेत ‘हायपरट्रिकोसिस’ असं म्हटलं जातं. जिथे माणसाच्या शरीरावर अतीप्रमाणात असामान्यरित्या केस येतात. यालाच ‘वेअरवॉल्फ सिंड्रोम’ असंही म्हटलं जातं.
16 शतकात जन्मलेला केसाळ मानव
सोळाव्या शतकामध्ये स्पेनमध्ये ‘हायपरट्रिकोसिस’ केसाळ मुलाचा जन्म झाला होता. त्याचं नाव पीट्रूस गोन्साल्विस असं होतं. या मुलाला तिथल्या स्थानिक लोकांनी प्राण्यांसारखं लोखंडी तुरूंगामध्ये बंद करुन तत्कालिन फ्रान्सचे राजे हेन्री दुसरे (Henry II) यांना भेट म्हणून पाठवलं. पण राजे हेन्री यांना पीट्रूस हा इतर सामान्य मुलांसारखाचं असून तो तसं आयुष्य जगू शकतो याची कल्पना आली. त्यामुळे त्यांनी त्याचं संगोपन करत शिक्षण पूर्ण केलं. पुढे कॅथरिन नावाच्या तरुणीशी त्याचं लग्न झालं. या सत्येकथेपासूनच ‘ब्यूटी अँड द बीस्ट ’ या सिनेमा तयार केला आहे.