गोड पदार्थ सहसा सर्वांनाच आवडतात. मूड खराब असो किंवा एखादं सेलिब्रेशन; विविध मिठाया, केक, पेस्ट्री, चॉकलेट्स आणि थंडगार कोल्ड्रिंक्स याशिवाय आपल्याला आनंद पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की ही ‘गोड’ चव आपल्या शरीरासाठी किती ‘कडू’ आणि विषारी ठरू शकते? खासकरून आपल्या लिव्हरसाठी.
नवीन संशोधनातून समोर आलेली माहिती ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सोडा, शीतपेयं आणि पॅकेटमधल्या पदार्थांमध्ये जी साखर असते, ती आपल्या लिव्हरसाठी विषारी असते. पण यावर एक सोपा उपाय देखील आहे. तुम्ही फक्त 9 दिवस ही साखर खाणं बंद केले, तर तुमच्या लिव्हरला झालेलं नुकसान भरून काढता येतं.
कॅलिफोर्नियातील Touro University आणि UC San Francisco च्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे. या अभ्यासात लहान मुलं आणि किशोरवयीन तरुणांना फक्त 9 दिवसांसाठी त्यांच्या आहारातली अतिरिक्त साखर ज्याला फ्रुक्टोज म्हणतात ते न खाण्यास सांगितलं.
फ्रुक्टोज ही साखर साधारणपणे सोडा, फळांचे रस आणि इतर पॅक केलेल्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात असते. मुलांना फक्त फ्रुक्टोज खायला मनाई केली होती. पण त्यांना एकूण कॅलरीजची पातळी तशीच ठेवण्याची परवानगी होती. त्यांनी साखरेऐवजी भात, बटाटे किंवा इतर स्टार्च असलेले पदार्थ खाल्ले. यामुळे त्यांच्या वजनात कोणताही मोठा बदल होणार नव्हता. 9 दिवसांनंतर जेव्हा त्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांच्या लिव्हरमध्ये साठलेली चरबी (फॅट) 20% पेक्षा जास्त कमी झाली होती. खूप चांगला सकारात्मक निष्कर्ष समोर आला.
हेही वाचा : तुम्ही दारू पीत नसलात तरी, तुम्हाला होऊ शकतो ‘नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर’ आजार!
तरुणांमध्ये वाढती समस्या
तुम्ही विचार करत असाल की हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण, गेल्या 20 वर्षांत तरुण मुलांमध्ये फॅटी लिव्हरचा आजार खूप वेगाने वाढला आहे. हा आजार पुढे जाऊन इन्सुलिन रेझिस्टन्स, टाईप-२ मधुमेह आणि हृदयरोगांसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देतो.
पूर्वी फॅटी लिव्हर हा आजार फक्त जास्त दारू पिणाऱ्या लोकांमध्ये आढळत असे. पण आता तो लहान मुलांमध्येही दिसतोय, कारण त्यांचा आहार खूप बदलला आहे. बर्गर, पिझ्झा, चिप्स आणि शीतपेये हे त्यांच्या रोजच्या जेवणाचे भाग झाले आहेत. या सर्व पदार्थांमध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण खूप जास्त असते.
आपल्या शरीरातील पेशी ग्लूकोजचा वापर ऊर्जा मिळवण्यासाठी करतात. पण फ्रुक्टोज फक्त लिव्हरमध्येच पचतो. जेव्हा आपण खूप जास्त फ्रुक्टोज खातो, तेव्हा लिव्हरला ते पचवणं कठीण जातं. परिणामी, फ्रुक्टोजचे रुपांतर चरबीत होते आणि ही चरबी लिव्हरमध्ये साठायला लागते. यालाच ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ म्हणतात.
संशोधकांच्या अभ्यासात हे स्पष्ट झालं आहे की, आहारामध्ये केलेला छोटासा बदल सुद्धा आपल्या लिव्हर आणि चयापचय (metabolism) आरोग्यावर किती लवकर सकारात्मक परिणाम करू शकतो.
तुम्ही म्हणाल, ‘पण साखर पूर्णपणे कशी सोडायची?’ तर, तुम्ही ‘अतिरिक्त साखर’ खाणं कमी करा. तुमच्या चहा-कॉफीमध्ये साखर कमी करा, शीतपेयं पिणं बंद करा. पॅकेज केलेल्या ज्यूसऐवजी फळांचे ताजे ज्यूस घ्या.
आजकाल पॅकेज केलेल्या पदार्थांच्या लेबलवर ‘नो ॲडेड शुगर’ असं लिहिलं असतं. पण त्यातही फळांच्या रसातील नैसर्गिक फ्रुक्टोज असते, ज्यामुळे ते गोड लागतात.
जर तुम्हाला तुमच्या लिव्हरला निरोगी ठेवायचं असेल तर, हा 9 दिवसांच्या उपायाचा प्रयोग नक्कीच करून बघा.