संगीत ही मानवी जीवनातील एक महत्त्वाची कला आहे. ती केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, शरीर आणि मनाच्या समतोल विकासासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. विशेषतः अर्भक (नवजात बाळे) आणि लहान मुलांच्या वाढीच्या टप्प्यावर संगीताचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होतो. वैज्ञानिक संशोधनांनुसार, संगीत ही मुलांच्या बौद्धिक, सामाजिक, भाषिक आणि भावनिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते.
मेंदूच्या विकासात मदत
अर्भकाच्या जन्मानंतर त्याचा मेंदू सतत विकसित होत असतो. या काळात जर संगीत ऐकवले गेले, तर मेंदूतील न्यूरॉन्समध्ये जलद संपर्क तयार होतो. यामुळे लक्ष केंद्रीत करणं, स्मरणशक्ती आणि आकलनक्षमता यामध्ये वाढ होते.
भाषिक विकासाला चालना
मुलं जेव्हा संगीत, गाणी किंवा अंगाई ऐकतात, तेव्हा त्यांना भाषेच्या ध्वनींची ओळख होऊ लागते. उच्चार, लय आणि शब्दांची पुनरावृत्ती यामुळे त्यांना बोलायला लागणारी भाषा शिकायला मदत होते. म्हणूनच बालगीतं आणि गोष्टी सांगताना संगीताचा वापर केल्यास भाषिक विकास अधिक प्रभावी ठरतो.
सामाजिक व भावनिक विकास
संगीताच्या माध्यमातून मुलं आपले भाव व्यक्त करायला शिकतात. गाण्यांच्या भावनिक सुरावटीमुळे मुलं हसतात, कधी रडतात, कधी शांत होतात. यामुळे त्यांच्या भावनिक समजूतदारपणात वाढ होते. तसेच समूहगाण्यांमुळे सामाजिक संवादही निर्माण होतो.
शारीरिक समन्वय व हालचालींचा विकास
गाण्यांवर नाचणं, टाळ्या वाजवणं किंवा ताल धरणं यामुळे मुलांचा शारीरिक समन्वय सुधारतो. त्यांना हालचालींवर नियंत्रण ठेवायला शिकवणं हे संगीताच्या लयीमुळे सहज शक्य होतं.
झोप आणि शांततेसाठी उपयोगी
संगीत बाळाला शांत करणारं आणि झोपेसाठी उपयुक्त ठरतं. सौम्य संगीत, विशेषतः शास्त्रीय संगीत, बाळाच्या झोपेचा दर्जा सुधारतो. त्यामुळे रात्रीची झोप अधिक शांत आणि खोल होते.
संगीतामुळे बालकांच्या मेंदूच्या विकासात लक्षणीय सुधारणा होते, असे अभ्यासातून दिसून आले आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर लर्निंग अँड ब्रेन सायन्सेसच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, संगीत वाजवण्याच्या सत्रात भाग घेतलेल्या नऊ महिन्यांच्या बाळांमध्ये संगीत आणि भाषणाच्या लयींना मेंदूची प्रतिक्रिया अधिक मजबूत दिसून आली.
चार आठवड्यांपर्यंत, अर्भकांनी आणि त्यांच्या पालकांनी ताल-आधारित संगीत नाटकात भाग घेतला. यावेळी ब्रेन इमेजिंग वापरून संशोधकांना असं आढळून की, या संगीत अनुभवांमुळे ध्वनी प्रक्रिया आणि पॅटर्न ओळखण्याशी संबंधित मेंदूच्या क्षेत्रांमध्ये क्रियाकलाप वाढला.
भाषा विकासासाठी आवश्यक कौशल्ये
संगीताच्या संपर्कामुळे सर्वसाधारणपणे ध्वनी नमुने ओळखण्याची मुलांची क्षमता तीक्ष्ण झाल्याचे आढळले. या अभ्यासातून असे दिसून येते की सुरुवातीच्या काळात संगीत वाजवण्याचे मुलांच्या संज्ञानात्मक क्षमतेवर, विशेषतः भाषा शिकण्याशी संबंधित क्षमतांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. ज्या काळात संगीत शिक्षणाला अनेकदा प्राधान्य दिले जात नाही, त्या काळात हे निष्कर्ष केवळ मनोरंजनात्मक क्रियाकलाप म्हणून नव्हे तर विकासात्मक साधन म्हणून संगीत संवादाचे महत्त्व अधोरेखित करतात.
लहान मुलांवर संगीताचा परिणाम
यूएससीच्या ब्रेन अँड क्रिएटिव्हिटी इन्स्टिट्यूटच्या अभ्यासांच्या मालिकेत असे आढळून आले की, केवळ दोन वर्षांच्या संरचित संगीत श्रवण व शिक्षणामुळे मुलांच्या मेंदूच्या रचनेत लक्षणीय बदल झाला.
लॉस एंजेलिसमधील युथ ऑर्केस्ट्रा द्वारे संगीत प्रशिक्षणात भाग घेतलेली मुले आणि खेळ व इतर एक्टिव्हिटिजमध्ये सहभागी नसलेल्या मुलांचा दोन वर्ष अभ्यास करण्यात आला. यामध्ये विविध एक्टिव्हिटी करणाऱ्या मुलांच्या मेंदूच्या ध्वनी प्रक्रिया, भाषा, लक्ष केंद्रित करणे आणि आवेग नियंत्रणाशी संबंधित भागात संरचनात्मक फरक आणि वाढलेली परिपक्वता आढळली.
संगीताचे प्रशिक्षण घेतलेली मुले ही लक्ष केंद्रित करणे आणि एखाद्या गोष्टीकरता स्वनियंत्रण या क्षमतांमध्ये चांगली आढळली. शैक्षणिक यश आणि भावनिक नियमन दोन्हीसाठी ही महत्त्वपूर्ण कौशल्ये असतात.
मुलांच्या विकासास वाव देण्यासाठी आणि मेंदूवरील काही नकारात्मक प्रभावांना तोंड देण्यासाठी सामुदायिक संगीत कार्यक्रम हे शक्तिशाली साधन म्हणून काम करू शकतात. संशोधकांचा असा विश्वास आहे की, मुलांच्या विकासाच्या महत्त्वाच्या वर्षांमध्ये भावनिक आणि बौद्धिक वाढीला चालना देण्यासाठी संगीत महत्त्वाचं ठरू शकतं.