जपानमध्ये भावनिक सोबत व आधाराकरता भाड्यावर माणसे!

Rent people: माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. कितीही एकटं राहायचं म्हटलं तरी सोबत असली की जरा हायसं वाटतं. मग ती सोबत अनोळखी का असेना चालते. जपानमध्ये ज्येष्ठ नागरिक, मित्र, नातेवाईक, जेवणासाठी सोबत अशा सर्वच कॅटेगरीमधील व्यक्ती भाड्यानं देण्याचा व्यवसाय चांगलाच तेजीत आहे.
[gspeech type=button]

जपानमध्ये गेल्या काही वर्षांपासून काम किंवा मनोरंजनासाठी नाही तर एकटेपणातून सुटका व्हावी, आपल्या सोबतही कोणीतरी आहे या भावनिक आधाराकरता व्यक्ती भाड्यानं देण्याचा व्यवसाय खूप तेजीत आहे. अनेक एजन्सीज याकरता माणसं तासानुसार पैसे आकारून माणसं पुरवतात. वाचायला, ऐकायला विचित्र वाटतं असलं तरी एकटेपणा दूर करण्यासाठी जपानमध्ये हा अशा प्रकारचा पर्याय अनेकजण स्वीकारत आहेत. बऱ्याचदा आपल्याला मोकळं व्हायचं असतं. पण बोलायला सोबत कोणीच नसतं. कधीकधी काही विषय असे असतात की, जर ते कोणाला सांगितले तर त्याचा खाजगीपणा जपण्याची खात्री नसते. तर कधी या शेअरिंगचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. आपल्या प्रत्येकाला अशी कोणीतरी व्यक्ती हवी असते की, जी आपल्यासोबत बसेल आणि आपलं ‘म्हणणं’ फक्त ऐकून घेईल.

 

फक्त ऐकून घेणे

सर्विस घेणारी व्यक्ती आपल्या समस्या किंवा ताणतणाव भाड्यानं आलेल्या व्यक्तीसोबत शेअर करते. पण ही भाड्यानं आलेली व्यक्ती यावर आपलं मत किंवा सल्ला देत नाही. ती फक्त ऐकण्याचं काम करते. आपल्याकडं असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे किंवा पेशंटचे केअर टेकर यासर्वापेक्षा ही सर्व्हिस खूप वेगळी आहे. फक्त सोबत यापुरतच हे मर्यादीत आहे.

 

पिपल फॉर रेंट

विकसित देशांमधील सामाजिक एकटेपणा ही समस्या जपानमध्ये सर्वाधिक आहे. अक्षरशः इथं लाखो लोकं एकटे राहतात. कित्येक दिवस किंवा आठवडेही कोणत्याही माणसाच्या संपर्काशिवाय ह्या व्यक्ती एकट्याच असतात. जपानमधील सांस्कृतिक रुढी-परंपरा यामुळंही व्यक्ती पटकन मोकळ्या होत नाही. मानसिक आरोग्य किंवा भावना याबद्दल बोलताना अनेकांना अवघडल्यासारखं होतं. कुटुंबाच्या अपेक्षा, शाळेतील दबाव आणि करिअरमधील पदक्रम या गोष्टींचा ताण लोकांना दिवसेंदिवस असह्य होत आहे. परिणामी हे लोक आतल्याआत कोंडमारा सहन करत राहतात. यासगळ्यातूनच ‘पिपल फॉर रेंट’ ही संकल्पना उदयाला आली. कोणत्याही टिपण्णी, सल्ला, लाज याची कसली फिकिर न करता केवळ ‘सोबत’ हाच एकमेव उद्देश असतो.

 

मोठ्या समस्येवरील शांत तोडगा

एखाद्या अनोळखी व्यक्तीला भाड्यानं घेतलं तर पारंपरिक दबाव, रुढी-परंपरा सर्व गोष्टींना फाटा बसतो. तुम्हांला स्वतःबद्दलची कारणं द्यावी लागत नाहीत. तुमच्या वागण्याबद्दल कसलंही मत तयार केलं जात नाही. माणूस म्हणून आपली स्वतःची जी काही गरज आहे ती भागली जाते. ही सेवा केवळ ज्येष्ठ नागरिकांकरताच नाही तर तरुण, विद्यार्थी, ऑफिसला जाणारे असे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ही सेवा घेतात. मोठ्या प्रश्नावर शांतपणे काढलेला हा तोडगा आहे. ही सेवा मोफत नाहीये. पण वारेमाप पैसे उकळत नाही. क्लाएंट वेळ, लक्ष, तटस्थपणा याकरता पैसे देतात.

 

या एजन्सीजद्वारे पुढील सेवा मिळतात –

  • सोबत चालणे
  • सोबत जेवणे
  • एखाद्या समारंभाकरता सोबत देणे
  • पार्कमध्ये सोबत करणे
  • पालक, लहान भावंड सोबतीला आहेत अशा प्रकारे सोबत करणे

 

शोजी मोरीमोटो यांच्याद्वारे दिली जाणारी सेवा चांगलीच लोकप्रिय आहे. ते स्वतःला काहीच न करण्याकरता भाड्यानं देतात. क्लाएंट शोजी यांचा वेळ आणि उपस्थितीकरता त्यांना पैसे देतात. म्हणजेच आपल्या सर्वांच्या भाषेत केवळ ‘कंपनी देण्याकरता’ शोजी यांना लोकं भाड्यानं घेतात. कोणताही सल्ला नाही, काही काम नाही फक्त शांतपणे त्या क्लाएंटच्या सोबत राहायचं. मोरीमोटा यांना एका व्यक्तीनं त्याचा थिसिस संपेपर्यंत सोबत हवी असल्यामुळंही भाड्यानं घेतलं होतं. रांगेत उभं असताना एकटेपणा वाटू नये याकरताही शोजी यांना भाड्यानं घेण्यात आलं आहे.

 

नव्वदीच्या दशकात सुरूवात  

जपानमध्ये एकटेपणावर मात करण्याचा उपाय म्हणून ही सर्विस साधारण नव्वदीच्या दशकात पहिल्यांदा सुरू झाली. एकटेपणातून बाहेर पडण्यासाठीची गरज ओळखून सात्सूकी ओईवा यांनी 1991 मध्ये जपान एफिशियन्सी कॉरपोरेशनची स्थापना केली. सुरवातीला ते कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत होते. पण क्लाएंटकडून असमाधानकारक प्रतिक्रिया मिळाल्यानं त्यांनी प्रशिक्षित नाट्य कलावंतांना या कामाकरता नेमायला सुरूवात केली. मे 1992  जपान एफिशियन्सी 21 क्लाएंटना सर्विस देत होते तर 484 जण प्रतिक्षायादीत होते. हळूहळू जपानमध्ये ही सर्विस लोकप्रिय होऊ लागली. आणि आता अशी सेवा देणाऱ्या अनेक एजन्सी जोमानं आपला व्यवसाय करत आहेत.

 

टीकाकारांचा समाजाला दोष

या एजन्सी आणि अशा सेवा घ्यायची गरज लागतेय हे तुटलेल्या समाजाचे भीषण वास्तव आहे, अशी टीका काही जण यावर करतात. तर काहींच म्हणणं आहे की येणाऱ्या समस्येवर हा प्रॅक्टिकल तोडगा आहे. लोकांना संपर्क हवा आहे आणि तो त्यांनी या ना त्या प्रकारे मिळवला आहे.

 

रेंट फॅमिली सर्व्हिस

काही एजन्सीने तर आपली सेवा आणखी विस्तारत कुटुंबही भाड्यानं द्यायला सुरूवात केली आहे. एखाद्या कलावंताला पालकाची, जोडीदार, लहान भावंडाची भूमिका करायला नेमलं जातं. त्या व्यक्तीची भावनिक गरज हे कलावंत भागवतात. अगदी सामाजिक समारंभात या कलावंतांच्या रुपातले नातेवाईक सोबतीला असल्यानं या व्यक्तींना एक आधार मिळतो.

 

यावरुन हेच लक्षात येतं की माणसाचा कितीही विकास झाला, त्यानं यशाची कितीही उत्तुंग शिखरं चढली तरी त्याचा ‘सामाजिक प्राणी’ हा मूळ स्वभाव आहे. त्याची सुख-दुःख ऐकायला, त्याची सोबत करायला, त्याला आधार द्यायला कोणीतरी आपलं हवं असतं. हे आपलं माणूस नसेल तर, ही गरज भागवण्याकरता त्याला त्याच्यासोबत अनोळखी का होईना एक व्यक्ती लागतेच.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

postpartum health recovery - वैज्ञानिक अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की, मूलाला जन्म देणाऱ्या ‘आईची रिकव्हरी’ म्हणजे पूर्ण बरी होण्यासाठी
आपण आनंदी असलो की आपल्याला उत्साह येतो आणि दुःखी असलो की सगळी एनर्जी गेल्यासारखं वाटतं. पण एक गोष्ट जी फक्त
Child Birth : काही कुटुंबामध्ये फक्त मुलीच किंवा मुलंच जन्माला येतात हा आपल्याला निव्वळ योगायोग किंवा अनुवांशिक कारणांमुळे होतं असं

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ