आपल्या डोक्यासाठी हेलमेट एक मजबूत सुरक्षा कवच आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये, जिथे बांधकाम सुरू आहे किंवा जिथे अपघातांचा धोका जास्त असतो, तिथे हेलमेट घालणं गरजेचं असतं. बांधकाम साईटवर काम करताना, हेलमेट हे आपल्या डोक्याचं संरक्षण करणारं एक महत्त्वाचं साधन आहे. हेलमेटमुळे फक्त अपघातच टळत नाहीत, तर कामाच्या ठिकाणी कोण काय काम करतंय हे ओळखायलाही मदत होते. हेलमेटच्या वेगवेगळ्या रंगांमुळे कामाच्या ठिकाणी शिस्त आणि सुरक्षितता राखली जाते. बाईक चालवताना किंवा बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षा उपकरणं (PPE – Personal Protective Equipment) वापरणं खूप महत्त्वाचं आहे.
तुम्ही अनेकदा कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांची हेलमेट घातलेली लोकं पाहिली असतील. हे वेगवेगळे रंग फक्त दिसायला चांगले वाटावेत म्हणून नसतात, तर त्यामागे काही खास अर्थ दडलेले आहेत. प्रत्येक रंगाचं हेलमेट कोण वापरतं आणि त्याचं काम काय आहे, हे या रंगांमुळे लगेच कळतं. यामुळे कामाच्या ठिकाणी शिस्त आणि सुरक्षितता राखायला खूप मदत होते. चला, जाणून घेऊया या रंगांचा अर्थ.
कोणत्या रंगाचं हेलमेट कोण वापरतं?
पिवळं हेलमेट :
हे हेलमेट तुम्हाला बांधकाम साईटवर काम करणारे मजदूर, जड मशीनरी चालवणारे ऑपरेटर आणि खोदकाम करणारे कामगार किंवा इतर जड काम करणारे कामगार घालताना दिसतील.जे लोकं शारीरिक मेहनत जास्त करतात, ते पिवळं हेलमेट वापरतात.
निळं हेलमेट :
इलेक्ट्रिशियन, सुतार आणि इतर तांत्रिक काम करणारे किंवा तात्पुरते कामं करणारे कामगार हे हेलमेट वापरतात. .
तपकिरी हेलमेट :
वेल्डिंगचं काम करणारे किंवा खूप उष्णता असलेल्या ठिकाणी काम करणारे लोक हे हेलमेट घालतात. जिथे आगीशी किंवा जास्त उष्णतेशी संबंध येतो, तिथे ब्राऊन हेलमेट वापरलं जातं.
हिरवं हेलमेट :
कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची तपासणी करणारे सेफ्टी इन्स्पेक्टर हे हेलमेट वापरतात. कधीकधी नवीन प्रशिक्षणार्थी असलेले कामगार देखील हिरवं हेलमेट घालतात.
पांढरं हेलमेट :
हे हेल्मेट सहसा सुपरवायझर, आर्किटेक्ट, इंजिनियर आणि मॅनेजर वापरतात. हा रंग त्यांच्या जबाबदार पदाची ओळख करून देतो. म्हणजे, जे लोक कामाचं नियोजन आणि व्यवस्थापन करतात, ते पांढरं हेलमेट घालतात.
लाल हेलमेट :
अग्निशमन दलाचे जवान आणि आणीबाणीच्या परिस्थितीत काम करण्यासाठी प्रशिक्षण घेणारे लोक लाल हेलमेट वापरतात.
राखाडी हेलमेट :
कामाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी, कामं पाहण्यासाठी , माहिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना हे हेलमेट दिलं जातं. म्हणजेच, तुम्ही जर एखाद्या बांधकाम साईटवर पाहुणे म्हणून गेलात, तर तुम्हाला राखाडी हेलमेट दिलं जाईल.
गुलाबी हेलमेट :
गुलाबी रंगाचे हेलमेट बांधकाम साइटवर सहसा दिसत नाहीत, पण काही कंपन्यांमध्ये महिला कामगार हे हेलमेट वापरतात. गुलाबी रंग महिलांशी संबंधित मानला जातो, त्यामुळे गुलाबी हेलमेट महिला कामगारांसाठी बनवलेले असते. कधीकधी, जर कोणी कामगार त्याचं हेलमेट घरी विसरले असतील किंवा हरवले असेल, अशावेळी ते काही काळासाठी गुलाबी हेलमेट वापरू शकतात.
हेही वाचा : माणसांच्या अंगावरील केस कसे नाहिसे झाले?
कलर कोड्सचे फायदे
- सुरक्षा हेलमेट च्या रंगामुळे कामाचा ठिकाणी असलेले कर्मचारी कोणत्या पदावर आहेत, ते कोणते काम करतात हे ओळखायला खूप मदत होते.
- एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला शोधायचे असेल तर , या रंगावरून ते लगेच कळते. उदाहरणार्थ, आग लागल्यास लाल हेलमेट वापरणारे अग्निशमन दलाच्या व्यक्तींना शोधणे सोपे होते.
- कोणत्या ठिकाणी कोणता गट काम करत आहे, हे व्यवस्थापकांना हेलमेटच्या रंगावरून पटकन ओळखता येते.
- प्रत्येक कामगाराला आपल्या हेलमेटच्या रंगानुसार आपलं काम कोणतं आहे, याची स्पष्ट कल्पना असते.
हेलमेट खरेदी करताना काय पाहावं?
हेलमेटचा रंग महत्त्वाचा असला तरी, फक्त रंगाकडे पाहून हेलमेट खरेदी करणे पुरेसे नाही. हेलमेट घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
सुरक्षा हेलमेटमध्ये योग्य सुरक्षितता पाहण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे चांगल्या क्वालिटीचे हेलमेट आहे का हे पाहणं आवश्यक आहे. हेलमेट वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंपासून बनवलेले असतात. तुम्ही जे काम करणार आहात, त्यानुसार हेलमेटचा दर्जा तपासा. जर तुम्ही फक्त रंग पाहून हेलमेट घेतले आणि त्याची क्वालिटी चांगली नसेल, तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
अनेकांना हे माहीत नसते की, सुरक्षा हेलमेट्सला देखील एक्सपायरी डेट असते. हेलमेट बनवण्यासाठी वापरलेले साहित्य काळानुसार खराब होते. त्यामुळे हेलमेट्स वेळेवर बदलणे आणि त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जुनं, खराब झालेलं हेलमेट वापरणं टाळावे.
बांधकाम साईटवर वापरल्या जाणाऱ्या हेलमेटच्या रंगांचा अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे रंग केवळ कामाची ओळख करून देत नाहीत, तर सुरक्षितता आणि शिस्त राखण्यासाठीही मदत करतात.