आईचं दूध हे पोषणाने परिपूर्ण असं अन्न म्हणून ओळखलं जातं. सस्तन प्राण्यांमध्ये असलेल्या स्तन ग्रंथी आणि प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे दूध निर्माण होत असते. त्यामुळे सस्तन प्राणी आपल्या नवजात पिल्लांना दूध पाजतात. आणि पक्ष्यांमध्ये या ग्रंथी नसतात. म्हणून पक्षी आपल्या पिल्लांना दाणे किंवा लहान कीटक भरवतात. मात्र तीन पक्षी याला अपवाद आहेत.
दूध निर्माण होणं आणि ते आपल्या पिल्लांना पाजता यावं यासाठी शरीरात स्तन ग्रंथी असावी लागते. मात्र, कबूतर, फ्लेमिंगो आणि पेग्विंन या तीन पक्ष्यांना स्तन ग्रंथी नसूनही ते आपल्या नवजात पिल्लांना दूध पाजतात. याला ‘क्रॉप मिल्क’ असं म्हणतात.
या पक्ष्यांचं दूध हे सस्तन प्राण्यांच्या दूधाप्रमाणे नसतं. या द्रव पदार्थामध्ये सस्तन प्राण्याच्या दूधामध्ये जो लॅक्टोज घटक आढळतो, तोही नसतो. पण तरीही या पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषणमूल्ये असतात. हे तीन पक्षी जेव्हा सुरूवातीच्या दिवसात अंडी उबवत असतात, तेव्हा त्यांच्या अन्ननलिकेजवळ असलेल्या या क्रॉप ग्रंथीमध्ये चरबी आणि प्रथिने तयार होतात. पुढे पिल्लांना जन्म दिल्यावर यातूनच ते दूध निर्माण करुन आपल्या पिल्लांना पाजतात.
कबूतर
कबूतर या पक्ष्याच्या जातीमध्ये नर आणि मादी दोघंही आपल्या नवजात पिल्लांना जवळपास 1 आठवडा दूध पाजतात. कबूतरची पिल्लं ही जन्माला येताच केवळ द्रव्य पदार्थाचंच पचन करु शकतात. त्यामुळे त्यांना दाणे न भरवता दूध पाजलं जातं.
हे दूध जाड, पिवळसर – पांढरा द्रव्य घटक असतो. या दूधामध्ये 60 टक्के प्रोटिन आणि फॅट्स असतात. दोन्ही नर आणि मादी फक्त दोन पिल्लांना पुरेल एवढंच दूध निर्माण करु शकतात. पहिला एक आठवडा दूध पाजल्यावर त्यांना दाणे भरवायला सुरुवात केली जाते.
हे ही वाचा : हत्ती एकमेकांशी संवाद साधतात!
फ्लेमिंगो
नर आणि मादी फ्लेमिंगोही जवळपास दोन महिने आपल्या पिल्लांना दूध पाजतात. फ्लेमिंगोच्या आहारामध्ये कॅरोटीनॉइड रंगद्रव्य असतं. त्यामुळे या रंगद्रव्यामुळे क्रॉप मिल्क हे लाल- गुलाबी रंगाचं असतं. या दूधामध्ये प्रोटिन्स आणि फॅटचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे या पिल्लांमध्ये चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होते. नवजात पिल्लांना दोन महिन्यापैकी सुरुवातीचे काही आठवडे फक्त दूध दिलं जातं. त्यानंतर त्यांना बाहेरील अन्न द्यायला सुरुवात केली जाते. अशाप्रकार दूध निर्मितीमुळे या काळात फ्लेमिंगो नर आणि मादीचं वजन जवळपास 10 टक्के कमी होतं.
पेग्विंन
पेग्विंन पक्ष्याची प्रजनन प्रक्रिया आणि पिल्लांना वाढवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. मादी पेग्विंन पक्षी अंडी घालते आणि शिकारीसाठी बाहेर पडते. तर नर पेग्विंन तब्बल दोन महिने काहीही न खाता अंडी उबवत असतो.
जर मादी पेग्विंन येईपर्यत अंड्यातून पेग्विंगचं पिल्लू बाहेर आलं तर त्याचं पोषण करण्यासाठी नर पेग्विंन आपल्या अन्ननलिकेतून दुधासारखा स्त्राव तयार करुन पिल्लांना भरवतो.
त्यानंतर मादी पेग्विंन आल्यावर ती आपल्यासोबत आणलेली शिकार पिल्लांना भरवून त्यांची काळजी घेते.