उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, अमेरिकेतील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही समस्या थेट त्यांच्या मक्याच्या शेतांशी संबंधित आहे. तिथली कोट्यवधी एकर मक्याची शेतं केवळ पीक देत नाहीत, तर ती हवामानावरही परिणाम करतात. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ज्याला ‘कॉर्न स्वेट’ म्हणतात. चला तर मग, समजून घेऊया काय आहे हे ‘कॉर्न स्वेट’.
‘कॉर्न स्वेट’ म्हणजे काय?
तुम्ही पाहिलं असेल की खूप घाम आल्यावर आपल्याला कसं गरम आणि चिकट वाटतं. त्याचप्रकारे, अमेरिकेतल्या प्रचंड मोठ्या मक्याच्या शेतातूनही ‘घाम’ येतो. पण हा घाम माणसांसारखा नाही, तर मक्याची झाडं जमिनीतून शोषून घेतलेलं पाणी वाफेच्या रूपात हवेत सोडतात. या प्रक्रियेला बाष्पीभवन (Evaporation) आणि बाष्पोत्सर्जन (Transpiration) असं म्हणतात.
हे कसं होतं? तर, हे झाडांच्या पानांमधून होतं. जेव्हा खूप ऊन पडतं, तेव्हा झाडं जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि पानांमधून ते वाफेच्या रूपात बाहेर टाकतात. जसं आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी घाम येतो, तसंच झाडंही स्वतःला थंड ठेवण्यासाठी ही प्रक्रिया करतात.
जसजशी उष्णता वाढते, तसतशी ही प्रक्रिया अधिक वेगाने होते आणि हवेतील आर्द्रता वाढवते. यामुळे हवा अधिक गरम आणि दमट होते.
अमेरिकेतील ‘कॉर्न बेल्ट’ मध्ये वाढतो दमटपणा
अमेरिकेतल्या ‘कॉर्न बेल्ट’ नावाच्या प्रदेशात मक्याची शेती खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे तिथे ही समस्या अधिक जाणवते. उदाहरणार्थ, आयओवा (Iowa) राज्यात रोज सुमारे 49 ते 56 अब्ज अब्ज गॅलन पाणी बाष्पीभवन स्वरूपात हवेत मिसळतं. इलिनॉय (Illinois) मध्ये तर 12 कोटी एकर मक्याची शेती 48 अब्ज गॅलन पाणी वातावरणात सोडते. यामुळे इथे जास्त दमटपणा असतो.
हेही वाचा : फोटो एडिटिंग आणि फिल्टर्सची जादू इसवी सन 1800 पासूनच !
‘कॉर्न स्वेट’ चे परिणाम काय ?
हवेतील वाढत्या बाष्पामुळे अमेरिकेच्या ‘मिडवेस्ट’ भागात उष्णतेची लाट अधिक तीव्र जाणवते. यामुळे तापमानात 5 ते 10 अंशांनी वाढ झाल्यासारखं जाणवतं. याचा परिणाम फक्त माणसांवरच नाही, तर तिथल्या पर्यावरणावरही होतो. यामुळे अचानक पाऊस पडण्याची शक्यता वाढते आणि कधीकधी तर रात्रीच्या वेळीही तापमान कमी होत नाही.
‘कॉर्न स्वेट’मुळे मानवाला उष्णतेचा त्रास होत असला तरी, शेतीसाठी आणि पिकांसाठी ही प्रक्रिया आवश्यक असते.